आंबेडकर जयंती

आंबेडकर जयंती : काय चूक काय बरोबर

आंबेडकर जयंती : काय चूक काय बरोबर

दिवसेंदिवस आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर आता महाराष्ट्रा बाहेर आणि देशाबाहेरही आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका निघत आहेत. सर्व जाती धर्म आणि सर्व जगभरातील लोक बाबासाहेबांना स्वीकारत आहेत. ही खूप समाधानाची बाब आहे. नेहमीचे जयंतीला दिसणारे स्वरूप म्हणजे डीजे, आंबेडकरी गाणी, पताका, लाईटच्या माळा, मंडप, नीळ, निळे झेंडे, बॅनर्स आणि या सर्वांसमवेत बेभान होऊन नाचणारी तरुण पिढी. मिरवणूक म्हणजे दमछाक होईपर्यत रस्त्यांवर नाचणे. बेभान होणे. प्रचंड हर्षोल्लास. आनंदाचा महापूर. उत्साहाला उधाण. आणि बरंच काही. १३ एप्रिलच्या रात्री १२ पासून ते १४ एप्रिलच्या रात्री १२ पर्यंत चाललेला हा जयंतीचा डामडौल. त्यासाठी कित्येक दिवस आधी पासून चाललेली तयारी. आणि बरंच काही…

मुक्तीदात्याचा जन्म दिवस.

कित्येक घरात आंबेडकर जयंती दिवाळी सारखी साजरी करतात. फटाके, फराळ, नवे कपडे, नव्या वस्तूंची खरेदी. जणू काही हा बौद्धांचा सण. अर्थात सण आहेच. ज्या समाजाला हजारो वर्षांपासून गुलामीचे जिणे जगावे लागले. त्यांच्या मुक्तीदात्याचा हा जन्म दिवस.

कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

ज्यांच्यामुळे संपूर्ण अस्पृश्य समाज की जो पूर्वी जनावरांपेक्षाही अधिक वाईट जीवन जगण्यास मजबूर होता. ज्यांच्या सावलीचाही सवर्णांना विटाळ होत होता. ज्यांच्या गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधण्यात आलेला होता. ज्यांना पिण्यासही पाणी मिळू शकत नव्हते. जगण्यासाठी गलिच्छ कामे करणे आणि लाचार होऊन भिक मागणे याशिवाय ज्यांच्या जवळ पर्याय नव्हता. शिक्षणास बंदी आणि जीवन विकासाच्या सर्व क्रियांमध्ये बंदी होती.

अशा समाजास जीवनउद्धाराची सर्व दारे खुली होतात. दिवसेंदिवस अधिकाधिक शिक्षित बनणारी. आर्थिक बाबतीत विकसित होणारी. आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात पुढे जाणारी पिढी निर्माण झालेली आहे. त्यांनी आपल्या बापाबद्दल कृतज्ञता न बाळगली तरच नवल. आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आंबेडकर जयंती.

नाचणे बंद आणि वाचणे सुरु ही हाक…

आंबेडकर जयंती कशी साजरी करावी? आणि कशी साजरी करू नये? यावर अनेकांनी मते मांडली आहेत. यामध्ये नाचणे बंद आणि वाचणे सुरु. ही हाक अनेक सुजाण कार्यकर्त्यांनी दिली. ही हाक देण्यामागे काही कारणे आहेत. आजही मोठ्या प्रमाणात अस्पृश्य आणि बौद्ध समाज हा झोपडपट्ट्यात राहण्यास मजबूर आहे. असंख्य अन्याय आणि अत्याचारांनी ग्रस्त आहे.आंबेडकर हे एका जातीच्या उद्धारासाठीचे नेते नाहीत. समस्त मानवमुक्तीचा विचार आणि कृती कार्यक्रम कवेत घेणारे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. अशा परिस्थितीत त्यांची जयंती साजरी होताना दारू पिऊन नाचणे. आणि धिंगाणा करणे. हे त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वास शोभनीय वाटत नाही.

बाबासासाहेबांचे स्वप्न पैशावाचून अधुरे…

दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्थांची उद्दिष्ट्ये आजदेखील जराही पूर्ण झालेली नाहीत. बाबासासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न तर अधुरेच राहिलेले आहे. बाबासाहेब म्हणाले होते. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून गावोगावी बौद्ध विहारे बनवावीत. त्याठिकाणी शाळा / कॉलेज आणि हॉस्पिटल्स असावीत. भारत बौद्धमय करण्यासाठी अनेक प्रशिक्षित पूर्ण वेळ कार्यकर्ते, ठीकठिकाणी ग्रंथालये असण्याची गरज आहे. प्रभावी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया निर्माण होण्याची गरज आहे.

पण यासाठी चळवळीकडे, संघटनांकडे पैसा नाही. म्हणून कित्येक कामे कित्येक दिवसांपासून रखडलेली आहेत. ज्या नेत्यांनी पैशासाठी प्रस्थापितांशी तडजोडी केल्या. ते आज त्यांच्या वळचणीला जावून बसलेले आहेत. जर समाजाने पैसा उभा केला असता. तर प्रस्थापितांच्या पायाशी बसण्याची दलित नेत्यांना गरज भासली नसती.

आंबेडकरी समाज प्रस्थापितांच्या दावणीला

बाबासाहेबांनी आपल्या उत्पन्नातील २० % रक्कम चळवळीला देण्याचे आवाहन जनतेला केले होते. मात्र असे योगदान देणारे कमी लोक आहेत. याउलट आंबेडकर जयंतीला मात्र मोठ्या प्रमाणात वर्गणी वसूल केली जाते. व्यापारी, पर्यटक, प्रवासी यांच्याकडूनही वर्गणी वसूल केली जाते.  शिवाय बऱ्याचदा आंबेडकरी विचारांच्या विरोधातील पक्ष संघटनांकडून देखील वर्गणी स्वीकारली जाते. आणि त्यामुळे आंबेडकरी समाज प्रस्थापितांच्या दावणीला बांधण्याचे कार्य केले जाते.

व्यक्तिपूजेच्या विळख्यात आंबेडकर जयंती

वास्तविक बाबासाहेब व्यक्तीपूजा आणि विभूतीपूजेच्या विरोधात होते. आंबेडकर केवळ विद्वान होते. म्हणून ते बाबासाहेब आहेत असे नव्हे. तर त्यांनी केलेले सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि रचनात्मक असे प्रचंड मोठे कार्य त्यांना बाबासाहेब बनविते.

त्यांनी बनविलेल्या राज्यघटनेनुसार आणि कायद्यानुसार हा देश चालतो. त्यामुळे दलित, आदिवासी, ओबीसी, महिला, शेतकरी, कामगार, बेरोजगार, विद्यार्थी इ. घटकांचे फार मोठे कल्याण होऊ शकले. पूर्वी त्यांचे कार्य नॉन दलित समाजास फारसे माहित नव्हते. मात्र आज ते माहित झाले आहे. आणि त्यांना मानणार एक मोठा वर्ग आज भारतात आहे.

गैरदलित आणि आंबेडकर जयंती

मात्र आंबेडकर जयंती फक्त त्यांचे जातभाईच साजरे करतात. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आणि हे लोक दारू पिऊन नाचतात, धिंगाणा करतात. म्हणून आम्ही तिकडे जात नाही असे गैरदलित बोलतात. मात्र तुम्हाला तिकडे कुणी जायला सांगितलेय? तुम्ही तुमच्या पातळीवर स्वतंत्रपणे जयंती साजरी करायला काय हरकत आहे? आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांचे कार्य, विचार इ. बाबी समजून घ्यायला कुणी अडवलय? पण ते होत नाही.

गाणी फक्त बाबासाहेबांचीच

दुसऱ्या बाजूला दलित लोक मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करतात. त्यामध्ये पूर्वी लाउडस्पीकर, बेंजो च्या तालावर आणि पिक्चरच्या गाण्यांवर रस्त्यांवर नाचणारी पोरे. असे त्यास स्वरूप होते. आज त्याला डीजे ची जोड मिळालीय. गाणी फक्त बाबासाहेबांचीच असतील. यावर तरी किमान बहुतांशी सर्वजण सहमत आहेत. आणि पिक्चरच्या गाण्यांना मागे सारायला लावतील अशी उडत्या चालींची, थिरकायला लावणारी बाबासाहेबांची गाणी बनू लागली आहेत. त्यामुळे किमान आपण थोडे पुढे गेले आहोत.

धिंगाणा

पण दारू पिऊन नाचणे, धिंगाणा करणे, पैशाची नासाडी इ. बाबी आजही आहेतच. एक तर काही जण दारू पिऊन नाचतात. त्यांना कोणी अडवू शकत नाही. त्यामुळे ते पाहणाऱ्या लोकांना चांगले वाटत नाही. आणि सहभागी व्हावेसे वाटत नाही. नाचून थोडे दमले की मध्येच गुटख्याच्या पुड्या तोंडात रिकाम्या करणे. किंवा बाजूला जावून सिगारेटींचे झुरके मारणे. हे करताना गळ्यात निळे झेंडे, पंचाशिलाचे झेंडे आहेत. याचेही भान मग कोणी ठेवत नाही.

गाण्यांमध्ये प्रबोधन कमी, व्यक्ती पूजा जास्त

उडत्या चालीची आणि थिरकणाऱ्या चालीच्या गाण्यांना आता मागणी वाढत आहे. म्हणून तशीच गाणी गायली जावू लागली आहेत. एक काळ होता ज्या काळामध्ये बाबासाहेब म्हणत असत, माझे एक भाषण आणि कलाकारांचे एक गाणे एकाच तोडीचे आहे. कारण कलाकार माझ्या भाषणाला गाण्याद्वारे सोप्या पध्दतीने जनमानसात रुजवतात. पण आताची गाणी प्रबोधनासाठी कमी पण बाबासाहेबांच्या व्यक्तीपूजेसाठी जास्त आहेत असे वाटत आहे. अनेक कलाकारांची कॅसेट / सीडी विक्रीची स्पर्धा आहे. यामध्ये एकप्रकारे दिखाऊपणा आणि बाजारूपणाचे स्वरूप आलेले आहे.

गणपती उत्सवाशी स्पर्धा

काही काही वेळा तर गणपती उत्सव वाटावा असे स्वरूप आंबेडकर जयंतीला आणले जाते. त्यामध्ये जसे करतात तसेच सर्व करण्याचा खटाटोप. मग स्टेज आणि मुला मुलींच्या नाचण्याच्या स्पर्धा. दारू पिऊन पिक्चरच्या गाण्यांवर मिरवणूक. घोषणांमध्येही १२३४ बाबासाहेबांचा जयजयकार, ५६७८ बाबासाहेबांचा थाटमाट अशा घोषणा दिल्या जातात. तेंव्हा आपण नेमके कोणत्या जत्रेत सामील झालोय असा प्रश्न पडतो.

आंबेडकर जयंती हा एक इव्हेंट झाला आहे.

आंबेडकर जयंती हा एक इव्हेंट झाला आहे. अशीही टीका अनेक लोकांकडून आता होत आहे. यामध्येही काही प्रमाणात तथ्य आहे. यानिमित्ताने लोक कार्यक्रमाला जमतात. आणि यावेळी आपणास हार तुरे, मान सन्मान मिळावा म्हणून विविध पक्षांचे लोक जयंती अक्षरश: स्पाँसर करतात. भाजप, राष्ट्रवादी अशा पक्षांकडून हे होत असल्याच्या बातम्या कानावर येत आहेत.

गावात पाटील लोक सुद्धा आपले राजकीय स्थान दलितांमध्ये बळकट करण्यासाठी जयंतीचा वापर करतात. आणि त्यांचे मांडलिकत्व पत्करलेले दलित नेते हा पैसा घेवून जयंत्या साजऱ्या करतात. निवडणुकी वेळी सर्व चित्र स्पष्ट होते. मात्र जयंतीमध्ये नाचणाऱ्या तरुणपिढीस आपण कोणाच्या पैशाने आलेल्या डीजे आणि मंडपामध्ये नाचतोय? यामागे काय राजकारण आहे याचे भान नसते. आणि त्याची पाठराखण करणाऱ्या तथाकथित उच्चशिक्षित दलित तरुणांना तरी याचे भान किती असते हेच समजत नाही.

काही स्तुत्य उपक्रम

काही जण मात्र १८ तास वाचन करून आंबेडकर जयंती साजरी करतात. काही शिक्षण संस्थानीही त्यामध्ये पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून गरीब मुलांना वह्या वाटप करतात. काही मंडळांनी वाचलेल्या पैशातून डॉक्टर, इंजिनियर इ. बनू पहाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली.

थोडं पैशांबद्दल…

आता थोडं पैशांबद्दल बोलू. पैशाच्या भ्रष्टाचाराबद्दल तूर्तास मी काही बोलत नाही. अलीकडे तसे खूप दिवसांपासून फारसे कानावर आले नाही. पण याचा अर्थ भ्रष्टाचार होत नाही असा नाही. असो. काही दलित खूप श्रीमंत बनले आहेत. काहींची गणना आज मध्यमवर्गात होऊ घातलेली आहे. पण अद्यापही असंख्य जण गरिबी आणि दारिद्र्यात पिचत आहेत. ओव्हर टाइम करून त्यांना घर चालवावे लागते. पण आंबेडकर जयंतीला कोणी पैसा कमी पडू देत नाही.

असे असले तरी गरीब, दलित, आदिवासींच्या उद्धाराकरिता, आंबेडकर विचार घरोघरी पोहोचण्याकरिता पैसा कमी पडतो आहे.धम्म गतिमान करण्याकरिता, बाबासाहेबांचे रचनात्मक कार्य पुढे घेवून जाण्याकरिता आणि एकूणच आंबेडकरी चळवळी करिता पैसा कमी पडतो आहे.

आंबेडकरी संस्थांना पैशाची कमतरता

आंबेडकरी विचारांच्या व्यक्तींच्या काही सामाजिक / शिक्षण संस्था आहेत. या संस्थाना नेहमीच पैशाची चणचण भासते. त्यामुळे कित्येक संस्थांचे कार्य रखडले आहे. कित्येक संस्था, व्यक्तीनी आपले कार्य पैशा अभावी थांबविलेले आहे. या सगळ्यांना योग्य प्रमाणात पैसा मिळाला असता तर आज फार मोठे रचनात्मक कार्य उभे राहिले असते. यातील काही संस्था फंडिंग एजन्सी किंवा सरकार कडून फंड घेतात. पण मग काय त्यांना स्वत:चे अजेंडे राबविता येतात?

बाबासाहेबांच्या संस्थांची काय स्थिती आहे?

बाबासाहेबांनी स्वत: सुरु केलेल्या संस्थांची आज काय स्थिती आहे? भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी अशा काही संस्था बाबासाहेबांनी स्वत: सुरु केल्या. यांमध्ये किती नवीन शाळा कॉलेज आपण सुरु करू शकलो आहोत? किती हॉस्पिटल्स आपण सुरु करू शकलो आहोत? किती ग्रंथालये आपण सुरु करू शकलो आहोत? जी सुरु केलीयत ती व्यावसायिक पद्धतीने चालतात का? किती पुस्तके तिकडे आहेत? किती बौद्ध विहारे आपण बनवू शकलो आहोत?

विहारांची काय स्थिती आहे?

जुन्या तक्क्यानाच आपण बौद्ध विहार बनविले. सरकारने बांधून दिलेल्या समाज मंदिरास आपण विहार बनविले. आपण काय करतोय? स्वखर्चाने मुर्त्या सुद्धा आपण कित्येक दिवस खरेदी करू शकलो नाही. आणि कसेही करून जर आपण ही विहारे बनवलीच आहेत. तर ती विहारांप्रमाणे चालतात का? त्याठिकाणी शिक्षण, आरोग्य यावर शाळा कॉलेज, हॉस्पिटल सोडा साधे दवाखाने किंवा बालवाड्या तरी आपण सुरु करू शकलोय का?

धम्म प्रसाराची काय स्थिती आहे?

बाबासाहेबांना मदरश्याप्रमाणे बौद्ध शाळा हव्या होत्या. आपण किती उभ्या करू शकलो? ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे बौद्ध धम्म प्रसाराचे कार्य त्यांना अपेक्षित होते. काय आपण त्यांच्या प्रमाणे पूर्ण वेळ कार्यकर्ते नेमू शकतो का? त्यांचे मानधन आपण देवू शकतो का? जर देवू शकलो असतो तर हजारो बौद्ध तरुण MSW पदवी संपादन करून ब्राह्मणांच्या संस्थात काम करायला कशाला गेले असते? आणि बौद्धेतर जाती बौद्ध धम्म प्रक्रियेत सामावली गेली नसती का? आपले संशोधन कार्यही अपुरे आहे. सम्राट अशोक, सम्राट कनिष्क, सातवाहन इ. नी बनविलेले हजारो विहारे, स्तूपे, लेण्या आपण संरक्षित करू शकलो असतो.

हे सर्व स्वयंसेवी पद्धतीने चालू आहे हे मी नाकारत नाही. पण हे कार्य आपआपल्या नोकऱ्या, कामधंदा आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आणि त्यातून पदरमोड करून करण्यात मर्यादा आहेत. बाबासाहेबांनी स्वत: खरेदी केलेली जागा, इमारती यांवर अतिक्रमण होत आहे. झालेले आहे. ते सुद्धा स्वयंसेवी पद्धतीने काही लोक सोडवू लागले आहेत. आता त्या वास्तूवर काम उभे राहणे हा अजून दुसरा टप्पा आहे.

आंबेडकरी कार्यकर्त्यांना पैशाची कमतरता

सामाजिक, राजकीय कार्य करायचे तर काही सर्वे आणि संशोधन कार्य आपणास हाती घ्यावे लागेल. काय आपण ते करू शकलोय? सामाजिक पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना कधी कधी गाडीखर्चालाही पैसे नसतात. मग नाइलाजास्तव त्यांना एखाद्या श्रीमंत माणसाच्या ताटाखालचे मांजर व्हावे लागते. किंवा सामाजिक पैसा मजबुरीने व्यक्तिगतरीत्या वापरला जातो. तो वापरला की पैसे खाल्याच्या बदनामीला तोंड द्यावे लागते. काही जण त्यालाच पैसे कमावण्याचा मार्ग समजू लागलेयत. याचा जयंतीत नाचणारे कधी विचार करतात?

काटकसर महत्वाची

या पार्श्वभूमीवर जयंतीमध्ये होणाऱ्या खर्चापैकी मोठी रक्कम ही नाहक खर्च आहे असे वाटत नाही का? पै नी पै आपण योग्य कारणासाठी आणि काटकसरीने वापरायला नको का? विशेषत: जी चळवळ गरीब, दु:खी, शोषितांच्या मुक्तीसाठी प्रयत्नशील आहे. ज्या चळवळीला फार मोठी उद्दिष्ट्ये गाठायची आहेत. त्यांना ही चैन परवडणार आहे का? जे माझ्या मताशी सहमत नाहीत. त्यांच्या जवळ या चळवळीच्या उद्दिष्टांना पूर्तता मिळावी. यासाठी आवश्यक पैसा उभा करण्याचा काय पर्यायी अजेंडा आहे? त्यांनी त्यासाठी काय प्रयत्न सुरु केले आहेत?

मी नाचण्याच्या विरोधात नाही. नाचल्या शिवाय तरुणांना जयंतीसारखे वाटत नाही हे अगदी खर आहे. सभ्यतेचे आणि कायदा सुव्यवस्थेचे संकेत सांभाळून प्रत्येकाने आपला आनंद नाचून गाऊन व्यक्त करावा. मी फक्त पैसा काटकसरीने वापरून तो पैसा चळवळीकडे वळावा या मताचा आहे. मला असे का वाटते त्याचे कारण मी वर स्पष्ट केले आहे.

दलितामधील ब्राह्मणवाद

काही उच्चशिक्षित मंडळी बड्या बाता मारून, नाचणे बंद वाचणे सुरु या अभियानावर कडवी टीका करतात. तेंव्हा या ज्ञानी लोकांच्या अज्ञानाची किव करावीशी वाटते. वर्षातले ३६४ दिवस वाचणे आणि १ दिवस नाचणे असे प्रतिवाद केले जातात. ‘तुम्ही आमच्या नाचण्यावर जळता, झगमगाटावर जळता, कारण तुम्ही मनुवादी आहात, सवर्ण आहात, जातीवादी आहात, स्वत:ला शहाणे समजणारे आहात, शहाणपणा शिकवू पाहताय.’ असा प्रतिवाद करून चर्चेला बगल देवू पहातात. काही महाभाग तर ‘तुमच्या वयाच्या ३० पट पुस्तके माझ्याकडे आहेत.’ असं उद्धट उत्तर आपल्या बापाच्या वयाच्या माणसांना द्यायला लाज बाळगत नाहीत. अशा काही उच्चशिक्षित अंधभक्तांच्या पैसा आणि ज्ञानाच्या अहंकाराची नशा एकदा उतरवलीच पाहिजे. असो.

एकूणच व्यक्तिपूजा, धिंगाणा, बाजारूपणा, इव्हेंट, व्यसन, नाहक खर्च, स्पर्धा, राजकारण इ. च्या विळख्यात अडकलेल्या आंबेडकर जयंतीला यातून सोडवून नवीन पायावर आंबेडकर जयंती व्हायला हवी. उद्याच्या काळात आंबेडकरी चळवळीला शोभेल अशी जयंती ठिकठीकाणी साजरी होईल. अशी आशा वाटते.

आंबेडकर जयंती : काय चूक काय बरोबर
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *