Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे?

Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे?

Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे? या विषयावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. खूप दिवसांपासून आंबेडकरवाद्यांचे फेसबुक स्टेटस, आणि पोस्ट बारकाईने वाचतोय. आंबेडकरवादी तरुण जो अनेक गटातटात विभागलेला आहे. किंवा उच्चशिक्षणा मुळे त्यांनी स्वत:चीच स्वतंत्र विचारधारा विकसित केली आहे. असा तरुण आपला गट सोडून इतर गटांना आंबेडकरद्रोही ठरवू लागला आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे.

वास्तविक प्रत्येक संघटनेची स्वत:ची अशी एक स्वतंत्र विचारधारा आणि रणनीती असते. त्यांनी स्विकारलेल्या मुद्यांना न्याय देण्यासाठी त्यांची रणनीती सुसंगत असते. याचा अर्थ इतर संघटनांना ती रणनीती सूट होईलच असे नाही. बहुदा सूट होतच नाही. त्यामुळे स्वत:च्या संघटनेच्या चष्म्यातून इतर संघटना किंवा नेते, गट यांकडे पाहिल्यास ते लोक आंबेडकरद्रोही असल्याचा त्यांना भास होतो. मात्र प्रत्येकाची भूमिका आपआपल्या जागेवर बरोबर असते. जरी एकमेकांमध्ये वैविध्य किंवा विसंगती असली तरी. हे कोणी समजून घेत नाही.

माझे तेच बरोबर आणि इतरांचे ते चूकच आहे. असे समजून अन्य नेते, संघटना, कार्यकर्ते यांच्यावर खालच्या पातळीवर उतरून भाष्य करणे. किंवा त्यांना सरळ आंबेडकरद्रोही ठरविणे. त्यांना चळवळीसाठी घातक, धोकादायक मानणे. आणि त्यांचा द्वेष करणे. स्वत:ला त्यांच्या पासून दूर ठेवणे. इतरांना दूर राहण्याचा किंवा त्यांना दूर ठेवण्याचा सल्ला देणे. या बाबी म्हणजे एक प्रकारचा इंटेलेक्चूअल फॅसिझम आहे. आणि अशा फॅसिझमची बाधा होण्यापासून कार्यकर्त्यांनी स्वत:ला रोखले पाहिजे. अशा इंटेलेक्चूअल फॅसिझमचे प्रकार या लेखात आपण समजून घेणार आहोत.

कम्युनिस्टांचा द्वेष

काही आंबेडकरवादी लोक कम्युनिस्ट लोकांचा द्वेष करतात. एखाद्या आंबेडकरवाद्यास बाद करायचे असल्यास त्यास कम्युनिस्ट ठरवायचे. मग तो चळवळीतून हमखास बाद होतो. असा अनुभव आहे. चळवळीचे नेतृत्व त्यांच्या हातातून काढायचे असल्यास त्यास कम्युनिस्ट ठरवून मोकळे व्हायचे. त्यामुळे समाज त्यांना आंबेडकरद्रोही समजू लागतो. त्यामुळे आपोआप तो माणूस दलित चळवळीतून बाद होतो. हा खेळ खेळून आंबेडकरवाद्यांनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. दादासाहेब गायकवाड असुदेत किंवा नामदेव ढसाळ यांनाही या दिव्यातून जावेच लागले.

ब्राह्मण नेत्यांच्या संघटनांचा द्वेष

समाजवादी आणि कम्युनिस्टांच्या काही संघटना आहेत. त्या संघटनांचे नेते हे ब्राह्मण आहेत. अशा संघटना आंबेडकरवादी विचारधारेशी साम्य असणाऱ्या आहेत. त्यांच्या कार्यामुळे चळवळ पुढे जाते. गतिमान होते. समाजात प्रबोधन होते. तरीही त्यांचे नेते केवळ ब्राह्मण आहेत. म्हणून अशा संघटनांना आंबेडकरद्रोही ठरविण्यात येते. या संघटनामध्ये काम करणाऱ्या बहुजन कार्यकर्त्यासही आंबेडकरद्रोही ठरविण्यात येते. असे करून आंबेडकरवादी कार्यकर्ते चळवळीचेच नुकसान करून घेत आहेत.

सर्वच समाजवादी वाईट

काही जण तर सर्वच समाजवादी हे वाईट असतात असे समजू लागले आहेत. कम्युनिस्ट हे आंतरराष्ट्रीय समाजवादी, तर हिटलर हा राष्ट्रीय समाजवादी. आणि या दोन्ही समाजवाद्यांपासून आपणास धोका आहे. अशी हे मांडणी करतात. आणि भाजप हा हिटलरचा समर्थक म्हणून उजवा समाजवादी तर कम्युनिस्ट हे डावे समाजवादी आहेत. आणि समाजवादी व्यक्ती हा आंबेडकरद्रोही असतो. असे ते समजू लागले आहेत.या दोघांच्या नादी न लागता आपण आंबेडकरवाद्यांनी मध्येच असलेले बरे असे ते म्हणत आहेत. यावेळी आंबेडकरवाद हे एक समाजवादी तत्वज्ञान आहे. हे समजून घेतले जात नाही.

समाजवादी लोक खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण या भांडवलदार धार्जिण्या धोरणांना विरोध करतात. म्हणून त्यांना मागास विचारधारेचे आणि विकासातील अडथळे समजले जाते. मात्र बाबासाहेबांचे तत्वज्ञान निट समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि आपल्या भूमिका दुरुस्त करण्याचा प्रयत्न तर सोडाच विचारही केला जात नाही.

प्रकाश आंबेडकरांचा द्वेष

डाव्यांना आणि कम्युनिस्टांना सोबत घेतात. म्हणून प्रकाश आंबेडकरांना कम्युनिस्ट धार्जिणे म्हटले जाते. कम्युनिस्ट हे आंबेडकरी चळवळीचे दुश्मन आहेत. असा समज या लोकांनी उगाच करून घेतलेला असतो. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर यांना देखील चळवळीचे दुश्मन असे हे लोक समजू लागतात. आणि तसा प्रचार करू लागतात. तसेच त्यांची बायको ब्राह्मण आहे म्हणून ते भटाळलेले आहेत. आणि ब्राह्मणी पध्दतीने विचार करतात. ते मंदिरात जातात. तसेच ते आरएसएस ला सहकार्य करणारे आंबेडकरद्रोही आहेत. अशी कडवी टीका काही लोक करतात. अर्थात बाळासाहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यामुळे अशा प्रचाराचा त्यांच्यावर काही फरक पडत नाही. खरेतर हे कार्यकर्तेच आंबेडकरद्रोही आहेत असे म्हणावेसे वाटते.

बामसेफचा द्वेष

बामसेफ चे विचार काही लोकांना पटत नाहीत. जय मूलनिवासी हा शब्द जयभीम ला संपवण्यासाठी आणला आहे. असा गैरसमज करून हे लोक सतत बामसेफ चा विरोध करत राहतात. आणि त्यासोबत कांशीराम, मायावती आणि वामन मेश्राम यांच्या कार्याला कमी लेखण्याचा खटाटोप सतत करत राहतात. कसेही असली तरी नॉन दलित किंवा आणि नॉन महार लोकांमध्ये बाबासाहेब घेवून जाण्याच्या बाबतीत त्यांचे योगदान आपणास नाकारता येणार नाही. आज त्यांच्या मुळेच ओबीसी, आदिवासी आणि मुस्लीम तरुण हातात निळा झेंडा घेवून रस्त्यावर उतरताना दिसतो. आणि जयमूलनिवासी सोबत आता जयभीम म्हणायला लागला आहे. मात्र बामसेफ ही आंबेडकरी चळवळ संपविण्याचा कसा प्रयत्न करत आहेत. हे पटवून देण्याच्या नादात असे तरुण त्या लोकांचा कडवा द्वेष करू लागले आहेत. तसेच त्यांना आंबेडकरद्रोही ठरवू लागले आहेत असे दिसून येते.

बहुजन समाज पार्टीचा द्वेष

ज्या प्रमाणे बामसेफचा द्वेष केला जातो. त्याच प्रमाणे बहुजन समाज पार्टी कांशीराम आणि मायावती यांचा देखील काही लोक द्वेष करत आहेत. नेत्यांवर व्यक्तिगत टीका करण्यापासून ते बसपाच्या ध्येय धोरणांना विरोध करे पर्यंत हे चालू असते. त्यांनी त्यांच्या कार्यकालात प्रचंड कामे केली आहेत. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळ पुढे जाण्यास मोलाची मदत झाली आहे. हे समजून घेतले जात नाही. यामध्ये महार की चमार असा जातीय वाद देखील द्वेष करण्यासाठी काही वेळा असतो. असे वागून बसपा नव्हे तर आपणच खरे Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही असल्यासारखे वागत आहोत हे लक्षात घेतले जात नाही.

सुषमा अंधारेचा द्वेष

सुषमा अंधारेंची वैचारिक मांडणी, त्यांची भाषणे, त्यांचे कार्य याकडे संपर्ण दुर्लक्ष काही आंबेडकरवादी मंडळी करतात. आणि केवळ कधी काळी प्रकाश आंबेडकर आणि रत्नाकर गायकवाड यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी रत्नाकर गायकवाड यांची बाजू घेतली. म्हणून त्यांना लगेच आंबेडकरद्रोही ठरवले जाते. तेंव्हा फार दु:ख होते. व्यक्तीची व्यक्तिगत मते आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आपण मान्य करणार आहोत की नाही? आपल्यापेक्षा भिन्न मत असणारी व्यक्ती आंबेडकरद्रोही असते. असे कसे काय आपण ठरवू शकतो?

रत्नाकर गायकवाड यांचा द्वेष

आपल्या अधिकाराचा वापर करून आंबेडकर भवनच्या जागेवर १७ मजली इमारत बांधण्याचा त्यांनी प्लॅन रचला. आणि त्यासाठी आंबेडकरभवन पाडले. यावेळी हा अधिकाराचा वापर की गैरवापर.यामध्ये मला पडायचे नाही. मात्र त्यांना सरळ आंबेडकरद्रोही ठरवणे पटत नाही. अशा वेळी त्यांनी केलेले महान कार्य, आंबेडकरी चळवळ उभी करण्याचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केलेला प्रयत्न. यांकडे आपण सहज कानाडोळा कसा काय करू शकतो? आणि त्यांच्यावर झालेल्या मारहाणीचे समर्थन कसे काय करू शकतो?

संस्कृत अभ्यासकांचा द्वेष

काही तरुण पाली आणि ब्राह्मी या भाषेचा अभ्यास करत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि या द्वारे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, धर्म, समाजव्यवस्था, राज्य व्यवस्था, अर्थशास्त्र इ. चा देखील अभ्यास ते करत आहेत. मात्र त्यांना या भाषांच्या अभ्यासाचा इतका अहंकार चढला आहे. की संस्कृत भाषेचा अभ्यास करून इतिहासाची आणि संस्कृतीची पुनर्मांडणी करू पहाणारे आ. ह. साळुंखे. त्यांना आता शत्रू वाटू लागले आहेत. संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे. त्या भाषेचा अभ्यास करणारी व्यक्ती ही ब्राह्मणधार्जिणी असते. आणि त्या व्यक्तीचे लिखाण हे देखील तसेच असते. असे समजून काही महाभाग त्यांना विरोध करत आहेत. आणि आ. ह. साळुंखे आंबेडकरद्रोही आहेत असे म्हणत आहेत. अशा लोकांची कीव करावीशी वाटते.

फॅसिझम कडे वाटचाल

कोणत्याही कारणावरून स्वत:ला इतरांपेक्षा उच्च समजणे. आणि इतरांना नीच समजणे. याला फॅसिझम म्हणतात. असे मी समजतो. हिटलर ज्यूना नीच समजून त्यांचा द्वेष करत असे. तसेच आपल्याकडे उच्च वर्णीय स्वत:ला उच्च समजून शुद्र, अतिशुद्रांना नीच समजतात. म्हणून तेही फॅसिस्टच. तसेच स्त्रियांना नीच समजून स्वत:ला उच्च समजणारे पुरुष देखील फॅसिस्टच आहेत.

याच आधारावर जर कोणी आपल्या उच्चशिक्षणाच्या आधारे किंवा आपल्या डिग्री किंवा ज्ञानाच्या आधारे चळवळीतील कार्यकर्ते किंवा अन्य सामान्य लोकांना नीच समजत असतील. तर असे लोक सुद्धा फॅसिस्टच आहेत. तसेच आपल्या संघटनेची किंवा आपल्या नेत्याचीच विचारधारा इतर नेत्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि इतरांची जणू घातकी आहे. असा समज करून एकमेकांचा द्वेष करणारे लोक देखील फॅसिस्टच आहेत. अशा मूर्ख आणि अहंकारी लोकांपासूनच खरा समाजास आणि चळवळीस धोका आहे. तिकडे मोदी, आरएसएस, भाजपला विरोध करणाऱ्याना राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. तर इकडे उठसुठ प्रत्येकास  Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही ठरवले जात आहे. दोन्हीकडे एकाच प्रकारचा फॅसिझम आहे असे वाटत आहे.

वास्तविक एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या नादात आपण स्वत:च कसे पक्के आंबेडकरवादी आहोत. हे सर्व जन पटवून देवू लागले आहेत. हरकत नाही. मात्र इतरांना Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही ठरवून आपण सच्चे आंबेडकरवादी कसे काय होऊ शकतो?

या सगळ्यां आंबेडकरवादी गटतटांच्या प्रतिक्रिया आपण समजून घेतल्या.आणि असा प्रश्न पडला आहे की आता कोण शिल्लक उरला आहे? या जगी Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे?

Anti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे?

Writer : Anti Ambedkar - आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे?

लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *