अस्पृश्य मुळचे कोण

अस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले?

अस्पृश्य मुळचे कोण?

अस्पृश्य मुळचे कोण हे पुस्तक बाबासाहेबांनी १९४८ मध्ये प्रसिद्ध केले. त्यांच्या ‘आजचे शुद्र पूर्वीचे कोण?’ या प्रबंधाचाच हा उत्तरार्ध होय. बऱ्याचदा वाचक दोन्ही पुस्तकांना एकच समजतात. मात्र शुद्र म्हणजे आजचा ओबीसी वर्ग होय. आणि अस्पृश्य म्हणजे दलित किंवा अनुसूचित जाती होय. अस्पृश्य मुळचे कोण? पुस्तक वाचण्यापूर्वी हे समजून घेणे गरजेचे आहे.

भूमिका

शुद्र हा हिंदू संस्कृतीतील चौथा वर्ण होय. त्या व्यतिरिक्त गुन्हेगार जमाती, आदिवासी जमाती आणि अस्पृश्य मानलेल्या जाती असे अजून तीन वर्ग या संस्कृतीत आहेत की जे अत्यंत तिरस्करणीय बाब आहेत. असे बाबासाहेब म्हणतात. अस्पृश्यतेच्या दोन कारणांवर त्यांनी इथे प्रकाश टाकला आहे. १. ब्राह्मण लोक बौद्धांचा जसा तिरस्कार करतात तसाच तिरस्कार अस्पृश्य जातींचा देखील करतात. २. इतरांनी गोमांस भक्षणाचा त्याग केला तरी अस्पृश्य जातींनी गोमांस भक्षण सुरु ठेवले.

भाग – १

१. अहिंदूतील अस्पृश्यता

विटाळ, भ्रष्टता, बाटणे आणि अशा विटाळातून मुक्त होण्याची भावना अस्पृश्यतेमध्ये अंतर्भूत असल्याचे बाबासाहेब या ठिकाणी मांडतात. या प्रकरणामध्ये आदिम आणि पुरातन समाजाच्या विटाळाच्या भावनेसंबंधी आणि तो विटाळ किंवा अशुद्धता घालविण्याच्या त्या काळातील प्रचलित पध्दती विषयी विविध उदाहरणे देण्यात आलेली आहेत. अस्पृश्य मुळचे कोण? या पुस्तकातील अहिंदू संबंधी या प्रकरणामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील उदाहरणे देण्यात आलेली आहेत.

२. हिंदुतील अस्पृश्यता

अहिंदू आणि हिंदूंची अपवित्रतेची कल्पना एकसारखी आहे. मात्र ब्राह्मण सदैव पवित्र असतो हे मनुचे मत बाबसाहेब इथे अधोरेखित करतात. ब्राह्मणास अशुद्धतेच्या अनेक आज्ञा पाळाव्या लागत असत. अन्यथा तो अपवित्र बनत असे. मात्र केवळ गाईला स्पर्श केल्यामुळे किंवा केवळ पाण्याचे आचमन करून सूर्याकडे पाहिल्याने ब्राह्मणांची अपवित्रता निघून जात असे.

मात्र अस्पृश्य समाजाला कायमचे अस्पृश्य मानण्यात आलेले असून त्यांना शुद्ध करण्याचे कोणतेही साधन नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत ते सदैव अपवित्र आणि अस्पृश्यच राहतात. अहिंदूमध्ये मात्र अशी कायमस्वरूपी अशुद्धता किंवा अस्पृश्यता नाही. काही विधी करून अस्पृश्यता घालविण्याचे मार्ग सर्व समाजास सारखे आहेत.

१९३५ साली भारत सरकारने अस्पृश्य जातींची यादी बनवलेली आहे. ती संपूर्ण यादी या प्रकरणामध्ये आपणास पहाण्यास मिळेल. ४२९ जातींची ही यादी असून तिची लोकसंख्या जगातील अनेक देशांपेक्षा मोठी असल्याचे बाबासाहेब अस्पृश्य मुळचे कोण? या पुस्तकात अधोरेखित करतात.

भाग – २

३. अस्पृश्य लोक गावाबाहेर का राहतात?

१.हिंदू शास्त्रांचा असा निर्देश आहे की अंत्यजानी गावाबाहेर घर बांधून राहावे. २.अस्पृश्यांना गावातून हाकलून देवून त्यांना गावाबाहेर वस्ती करण्यास लावण्याची प्रक्रिया करणारा अवाढव्य सम्राट राजा भारतात झालेला नाही. खरेतर अस्पृश्यतेचा शिक्का लागण्यापूर्वीच अस्पृश्य लोक गावाबाहेर रहात होते.

इतिहासामध्ये प्रारंभिक समाजाचे रुपांतर आधुनिक समाजामध्ये झालेले आहे. दोन्हींमध्ये फरक असा. प्रारंभिक समाज हा भटक्या जमातींचा होता. तर आधुनिक समाज हा स्थायी जमातींचा होता. आदिम जमाती या रक्ताच्या नात्यावर आधारलेल्या होत्या. उत्क्रांतीमध्ये भटक्या जमातीतूनच प्रादेशिक जमातींचा उदय झाला.

प्रारंभिक समाजाची मुख्य संपत्ती गुरे होती. गुरांमुळे त्याला नवनवीन कुरणांचा शोध घेत स्थलांतर करत राहणे भाग होते. शेतीची कला अवगत झाल्यानंतर जमीन हा संपत्तीचा दुसरा प्रकार त्याला मिळाला. आणि त्यामुळे तो एके जागी स्थिर झाला.

भटक्या टोळ्यांची समस्या

सर्व भटक्या जमातींनी एकाच वेळी स्थायी जीवन स्वीकारले नाही. ज्या जमाती अद्याप भटक्या होत्या त्यांच्यामध्ये नेहमीच लढाया होत असत. त्यामध्ये एखाद्या टोळीचा संपूर्ण नाश होण्याऐवजी तिचा पराभव होवून तिची वाताहत होत असे. आणि त्यांचे लहान लहान गट तयार होत असत. टोळ्यांचे संघटन हे रक्त आणि नाते संबंधांवर आधारलेले होते. त्यामुळे एका टोळीत जन्मलेली व्यक्ती दुसऱ्या टोळीत सामील होऊन तिचा सभासद बनणे शक्य नव्हते. अशा एकट्या दुकट्या व्यक्तींना हल्ला होण्याचा नेहमीच धोका होता. यामुळे आश्रयस्थान व स्वसंरक्षण हीच या वाताहत झालेल्या लोकांची समस्या होती.

स्थायी जमातीची समस्या

तर दुसऱ्या बाजूला स्थायी जमातींशी युध्द करणे हे भटक्या जमातींना अधिक फायद्याचे होते. कारण त्यांच्याकडून त्यांना धान्य मिळत असे. स्थायी जमातींना नांगर सोडून सारे दिवस तलवारी घेवून लढणे शक्य नव्हते किंवा घरेदारे सोडून भटक्या जमातींचा पाठलाग करणेही शक्य नव्हते. त्यामुळे स्वसंरक्षणाची समस्या त्यांना भेडसावू लागली.

समस्या निवारण

अशावेळी स्थायी जमातींना भटक्या जमातींच्या हल्ल्यापासून रक्षण आणि टेहेळणी करण्यासाठी काही माणसे हवी होती. तर पराभूत लोकांना आश्रय आणि निर्वाहाच्या गरजा प्राप्त करणे गरजेचे होते. यामुळे दोन जमातींमध्ये करार झाला. संरक्षण आणि टेहेळणी करण्याच्या बदल्यात पराभूत लोकांना अन्न आणि आश्रय देण्याचे स्थायी जमातींनी मान्य केले.

प्रारंभिक समाजाच्या श्रद्धेनुसार एका रक्ताचे म्हणजेच एका टोळीचेच लोक एकत्र राहू शकत होते. हे वाताहत झालेले लोक परके आणि दुसऱ्या टोळीचे होते त्यामुळे एकत्र वस्ती करण्यास अनुमती देणे त्यांना शक्य नव्हते. डावपेचाच्या दृष्टीनेही या लोकांनी सीमेवर राहून शत्रू टोळ्यांच्या हल्ल्यांना तोंड द्यायचे होते. म्हणून हे लोक गावाबाहेर राहतात.

४. अस्पृश्य हे वाताहत झालेले लोक आहेत काय?

एखाद्या खेड्यातील हिंदूंची आणि अस्पृश्यांची वंश – चिन्हे (यात कपाळ, डोक्याची कवटी, नाक, शरीराचा आकार, व्यक्तींची नावे, रूढी इ. बाबींचा समावेश होतो) यात फरक असतो असे तपासांती आढळून आल्याचे बाबासाहेब इथे नोंद करतात. हिंदू शास्त्रांनी अस्पृश्यांना अंत्य:, अंत्यज आणि अंत्यवासी असे संबोधले आहे. यावर ‘शेवटी जन्माला आला तो’ असा त्याचा अर्थ असल्याचे हिंदू युक्तिवाद मांडतात. मात्र हा युक्तिवाद बाबासाहेब खोडून काढत सांगतात की, हिंदू शास्त्रांप्रमाणे शेवटी जन्माला आलेला शुद्र होय. आणि तो सवर्ण आहे. तर अस्पृश्य हे अवर्ण आहेत. म्हणजेच चातुर्वर्ण्याच्या बाहेरचे आहेत.

५२ हक्क

वेगळ्या मोहल्ल्यामध्ये राहणारे आणि परके लोक याच अर्थाने या शब्दांचा उल्लेख केला असल्याचे दिसून येते. याशिवाय अस्पृश्य हे वाताहत झालेले लोक असल्याचा अजून एक पुरावा देताना बाबासाहेब महार जातीचा उल्लेख करतात. महार लोक प्रत्येक खेड्यात गावकुसाबाहेर राहतात. हिंदू गावकऱ्यांकडून त्यांना ५२ हक्क मिळालेले आहेत. त्यापैकी १. गावकऱ्यांकडून अन्न गोळा करण्याचा हक्क २. हंगामाच्या वेळी प्रत्येक गावकऱ्यांकडून धान्य गोळा करण्याचा हक्क ३. गावकऱ्यांच्या मालकीच्या मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचा हक्क.

५. अन्यत्र अशी उदाहरणे आहेत काय?

ज्या देशांमध्ये अशीच तंतोतंत घटना घडल्याचे सांगण्यात येते असे आयर्लंड आणि वेल्स दोन देश आहेत.  भारतातील अस्पृश्य, आयर्लंड आणि वेल्स या देशातील प्युधीर आणि आलट्युड लोक ज्या कारणासाठी गावाबाहेर राहात होते त्याच कारणासाठी भारतातील अस्पृश्यही गावाबाहेर राहात होते.

६. अशा विभक्त वसाहती अन्य देशांतून नष्ट कशा झाल्या?

आयर्लंड मधील फ्युधीर व वेल्समधील आलट्युड या वाताहत झालेल्या लोकांच्या वसाहती कालांतराने नष्ट झाल्या व ते मुख्य टोळीचा भाग बनून गेले. त्यावेळी एक नियम अस्तित्वात आला. त्याचे नाव कुलीनीकरणाचा नियम. या नियमानुसार टोळीबाह्य मनुष्य त्या टोळीच्या आश्रयाने राहिला किंवा मूळ टोळीतील स्त्रीशी विवाह केला तर त्याला त्या टोळीतीलच मानण्यात येत असे.

भारतात देखील असा नियम मनूने १० व्या अध्यायाच्या ६४ ते ६७ श्लोकांमध्ये केला आहे. त्यानुसार एखाद्या शुद्राच्या सात पिढ्यांनी ब्राह्मण मुलीशी विवाह केला तर आठवी पिढी ब्राह्मण होऊ शकते. मात्र भारतात तसे घडले नाही कारण चातुर्वर्ण्याच्या सामान्य नियमाप्रमाणे शुद्र हा कधीही ब्राह्मण बनू शकत नव्हता. तसेच  अस्पृश्यतेची भावना प्रबळ ठरली आणि आपले व परके – जमातीतील व जमातबाह्य हे भेद अस्पृश्य आणि स्पृश्य रूपाने चिरस्थायी झाले.

भाग -३

७. अस्पृश्यतेचे मूळ – वंशभेद

अस्पृश्य मुळचे कोण? याठिकाणी बाबासाहेब पुढील बाबी विविध पुरावे देवून सिद्ध करतात.  १. आर्य हे एका वेगळ्या वंशाचे लोक आहेत असे गृहीत धरून मार्ग काढणे चूक आहे. २. दास आणि नाग हे एकच लोक आहेत. ३. दक्षिणेकडील द्रविड आणि उत्तरेकडील नाग किंवा असुर हे एकाच वंशातील लोकांची नावे आहेत. तमिळ या शब्दाचे संस्कृत भाषेतील रूप दमिल. पुढे जावून त्याचे द्रविड बनले. ४. तमिळ किंवा द्रविड ही भाषा आर्य येण्यापूर्वी संपूर्ण भारताची भाषा होती. ५. उत्तर भारतातील नागांनी तमिळ भाषेचा त्याग करून संस्कृत भाषेचा स्वीकार केला. परंतु दक्षिणेतील नागांनी तसे केले नाही. ६. नागवंशीय लोक हे राजे होते. आणि विविध कालखंडात त्यांनी भारतभर राज्य केले असल्याचे पुरावे आहेत. ७. ब्राह्मण आणि अस्पृश्य हे एकाच वंशाचे लोक आहेत.

कुळ

टोळ्यांचे रुपांतर जातीमध्ये झालेले आहे. सध्या प्रत्येक टोळी ही कुळ आणि गोत्रांमध्ये विभागलेली आहे. प्रत्येक कुळाचे सजीव किंवा निर्जीव असे कुलदैवत आहे. एकाच पूर्वजांपासून जन्म झाल्यामुळे एका कुळाचे लोक हे कुळाबाहेरच्या लोकांशी विवाह करतात. त्यांना आपल्याच कुळातील व्यक्तीशी विवाह करण्याची परवानगी नाही. गोत्रबाह्य विवाहांचा नियम पाळून जात्यांतर्गत विवाह करण्याचा नियम मागाहून करण्यात आला आहे. वेगवेगळ्या जातींमध्ये सारखी कुळे असतील तर त्यांचे वांशिक दृष्टीने त्या जाती एकच आहेत. मराठा आणि महार समाजाचे सर्व कुळ एकसारखी असल्याने या दोन जाती वांशिकदृष्ट्या एकच आहेत.

८. अस्पृश्यतेचे मूळ – उद्योगधंदे

गलिच्छ स्वरूपाचे काम दासाकडून करून घेण्यात येत होते. आणि त्यात संडास साफ करण्याचा समावेश आहे. ही दास प्रथा चातुर्वर्ण्यामध्ये अनुलोम (चढत्या) क्रमानुसार होती. प्रतिलोम (उतरत्या) क्रमानुसार नसे. म्हणजे ब्राह्मण हा सर्वांना दास करू शकत असे. क्षत्रिय ब्राह्मण सोडून इतरांना दास करू शकत असे. वैश्य हा ब्राह्मण आणि क्षत्रिय सोडून इतरांना दास करू शकत असे. तर शुद्र हा फक्त अन्य शुद्र व्यक्तीलाच दास करू शकत असे.

यावरून एखादा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शुद्र जर गुलाम असेल तर तो संडास सफाईचे काम करत असे. फक्त ब्राह्मण हा क्षत्रिय, वैश्य आणि शुद्राच्या घराचे संडास साफ करू शकत नव्हता. याचा अर्थ अस्पृश्यतेचा संबंध हा गलिच्छ उद्योगांशी नाही.

भाग -४

९. अस्पृश्यतेचे मूळ : बौध्द धर्माचा तिरस्कार

याठिकाणी अस्पृश्य लोक ब्राह्मणांकडून गुरुमंत्र का स्वीकारत नव्हते? अस्पृश्यांचे कौटुंबिक उपाध्याय म्हणून ब्राह्मण अस्पृश्यांची सेवा का करत नव्हते? आपले स्वत:चे उपाध्याय असणेच अस्पृश्यांनी का पसंत केले? हे प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात. आणि स्पष्टीकरण देताना सांगतात. अस्पृश्यही ब्राह्मणांचा तिरस्कार करत होते. ब्राह्मणांना आपल्या वस्तीत शिरण्यास अस्पृश्य लोक विरोध करतात. कारण यामुळे त्यांचा विनाश होईल अशी त्यांची श्रद्धा आहे. म्हणून होलीयार लोक तर एखाद्या ब्राह्मणाने त्यांच्या वस्तीत शिरण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर धावून जातात. आणि त्याला चपला जोड्यांनी बडवून काढतात. पूर्वीच्या काळी तर ठार मारत असत.

ब्राह्मण हे बौध्द धर्मियांचे शत्रू होते

अस्पृश्य लोक हे बौध्द धर्मीय असल्यामुळे ब्राह्मणांना ते पूज्य मानत नसत. त्यांना पौरोहित्याचे काम देत नसत. त्यांना अपवित्र समजत होते. तसेच ब्राह्मण देखील अस्पृश्य लोक हे बौध्द असल्यामुळे त्यांचा द्वेष व तिरस्कार करत असत.

वाताहत झालेले हे बौध्द धर्मीय लोक ब्राह्मणी धर्माचा वरचष्मा झाल्यावर देखील ब्राह्मणी धर्मात येण्यास नाखूष होते. ते ब्राह्मणांचा तिरस्कार करत कारण ब्राह्मण हे बौध्द धर्मियांचे शत्रू होते. या वाताहत लोकांनी बौध्द धर्म सोडला नाही म्हणून ब्राह्मणांनी त्यांच्यावर अस्पृश्यता लादली. हा मुद्दा बाबासाहेब अस्पृश्य मुळचे कोण? मध्ये अधोरेखित करतात.

१०. अस्पृश्यतेचे मूळ – गोमांस भक्षण

अस्पृश्य मानण्यात आलेल्या जमातीचे प्रमुख खाद्य मृत गाईचे मांस हेच होते. मृत गाईचे मांस खातात त्यांनाच अस्पृश्यतेचा कलंक लागलेला असून इतरांना नाही. हिंदूमधील कोणतीही जात मग ती कितीही हलक्या दर्जाची असली तरी गोमांसाला स्पर्श करणार नाही.

हिंदूचे मांस भक्षणाचे दोन नियम आहेत. त्यानुसार हिंदूमध्ये तीन विभाजन पडले आहेत. १. शाकाहारी २. गोमांस न खाणारे मांसाहारी ३. गोमांस खाणारे मांसाहारी.अस्पृश्य लोक बौद्ध असल्यामुळे ब्राह्मणी नियमांच्या विरोधात होते. त्यामुळे ते कसल्याही संकोचाविना गोमांस भक्षण करत असत. ज्या लोकांना गोमांस भक्षणाची   किळस येत होती त्यांनी गोमांस भक्षण करणाऱ्याना अस्पृश्य ठरविले.

बौद्ध धर्मीय असण्याच्याच जोडीला त्यांनी गोमांस भक्षणाची सवय सोडली नाही. यामुळे ब्राह्मणांना त्यांनी आणखीनच दुखावले. कारण ब्राह्मणांनी गाई संबंधी पूज्यभाव व प्रेम नव्यानेच सुरु केले होते.

भाग -५

११. हिंदुनी गोमांस कधीही खाल्ले नाही काय?

याठिकाणी ब्राह्मण आणि हिंदू  हे एके काळी गोमांस भक्षण करत असल्याचे अनेक पुरावे बाबासाहेब मांडतात. त्यापैकी काही पुरावे पुढीलप्रमाणे १. गोमांस पासून बनलेला मधुपर्क पाहुण्याला देणे होय. ब्राह्मणांचा तर हा हक्कच बनलेला होता. २. पाहुण्यांच्या सत्कारासाठी गाय कापण्याची प्रथा इतक्या थराला गेली होती की पाहुण्याला गोघ्न म्हणजे गायामाऱ्या असे म्हणण्यात येत असे. ३. त्याकाळी जे यज्ञ होत असत त्यामध्ये गाय सर्रास कापली जात असे. ४. मृत व्यक्तीच्या शरीराजवळ पशूचे अवयव ठेवून नंतरच शव जाळण्यात येत असे.

१२. ब्राह्मणेतरांनी गोमांस भक्षणाचा त्याग का केला?

ब्राह्मणांनी गोमांस भक्षण करणे बंद केले. आणि ब्राह्मणांच्या अनुकरण करण्याच्या ब्राह्मणेतरांच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी गोमांस भक्षणाचा त्याग केला असा निष्कर्ष बाबासाहेब अस्पृश्य मुळचे कोण? यामध्ये मांडतात. कारण ब्राह्मण वर्ग हा त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाचा होता. ब्राह्मणांनीही गायत्री पुराण इ. द्वारे गोपूजेचा जोरदार प्रचार केला.

१३. ब्राह्मण शाकाहारी कशामुळे बनले?

अशोक किंवा मनुने गोमांस भक्षणाचा त्याग करा असे आदेश दिलेले नाहीत. तरीही ब्राह्मणांनी शाकाहाराचा स्वीकार केला. ब्राह्मणांनी गोमांस खाणे सोडून दिले आणि त्यांनी गाईची पूजा सुरु केली यात ब्राह्मणांचा डावपेच होता. एकेकाळी बौध्द धर्म हा अधिकांश भारतीयांचा धर्म होता. बौध्द धर्माने ब्राह्मणी तत्वज्ञानावर आक्रमक हल्ले केले. ब्राह्मणी तत्वज्ञानाचा ऱ्हास होऊ लागला. ब्राह्मणांची जनतेतील व राजदरबारातील प्रतिष्ठा नष्ट झाली. सर्व सत्ता संपुष्टात आली. त्यामुळे ब्राह्मणी धर्म आत्मरक्षणाच्या पवित्र्यात होता. अशावेळी बौद्ध धर्माची तत्वे आत्मसात करून त्यांचे अतिरेकी पालन करणे हाच बौध्द धर्माशी टक्कर देण्याचा त्यांच्याजवळ मार्ग होता. म्हणून त्यांनी बुध्द विहारांप्रमाणे शिव विष्णू राम कृष्ण यांची मंदिरे बांधण्यास सुरुवात केली.

अतिरेकाने अतिरेक ठार करणे

पाहुणा घरी आला की त्याच्या मेजवानीसाठी गाय मारावी लागत असे. म्हणून गृहपती पाहुण्याला गोघ्न म्हणजेच गायामाऱ्या असे संबोधत असे. तसेच ब्राह्मणालाही ते गायामारे  असे संबोधून त्यांचा तिरस्कार करू लागले. म्हणून बौद्धांवर विजय मिळविण्यासाठी त्यांना गोहत्या व यज्ञाद्वारे पूजा करण्याच्या पध्दतीचा त्याग करणे अनिवार्य बनले.

बौध्द भिक्षूंच्याही पुढे एक पाउल टाकून केवळ गायीचे मांसच नव्हे तर सर्व प्रकारचे मांस सोडून शाकाहारी होण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. गायीला बळी देण्याच्या प्रथेला विरोध करून जनतेच्या मनात बौद्धांनी जे आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले होते तेथून त्यांना पदच्युत करणे हा ब्राह्मणांचा हेतू होता. अतिरेकाने अतिरेक ठार करण्याची ही नीती आहे. त्यामुळे मनुस्मृतीच्या विरोधात जावून गोहत्या महापाप आहे असा कायदा हिंदू राजांनी केला.

१४. गोमांस भक्षणाने वाताहत झालेले लोक अस्पृश्य कसे बनले?

गोमांस खाणे न खाणे याकडे व्यक्तीच्या आवडीनिवडीचा एक धर्मनिरपेक्ष प्रश्न म्हणून पाहण्यात आले नाही. तर त्याला एक धार्मिक प्रश्न बनविण्यात आले. ब्राह्मणांनी गाईला पवित्र मानल्यामुळे असे घडून आले. व त्यामुळेच गोमांसभक्षण हे धर्मभ्रष्टतेचे लक्षण ठरले. आणि त्यामुळे वाताहत झालेले लोक धर्मभ्रष्टतेचे अपराधी ठरल्यामुळे ते समाजातून बहिष्कृत झाले.

भाग ६

१५. अशुध्द आणि अपवित्र

याठिकाणी बाबासाहेब धर्मसूत्र आणि स्मृतींचे दाखले देवून अस्पृश्यता आणि गोमांस भक्षणाचा संबंध समोर आणतात. स्मृतींमध्ये बारा अपवित्र जातींचा उल्लेख आहे मात्र त्यापैकी केवळ चर्मकार ही एकच जात मृत गायीचे मांस भक्षण करत राहिली. म्हणून जेंव्हा गाईला पवित्र मानले तेंव्हा गोमांस भक्षण हे पाप ठरले. म्हणून चर्मकार हे अस्पृश्य बनले.

१६. वाताहत झालेले लोक अस्पृश्य केंव्हा बनले?

मनूच्या काळात अस्पृश्यता अस्तित्वात नव्हती. मनुस्मृती ही इ. सनाच्या दुसऱ्या शतकात आली.  पुष्यमित्र शृंगाने सम्राट बृहद्रथाचा खून केला आणि तो ब्राह्मण सम्राट बनला ही ब्राह्मणांनी केलेली एक रक्तरंजित राज्यक्रांती होती. चातुर्वर्ण्याचे पुनरुज्जीवन आणि आणि बौद्ध कायद्यामुळे रद्द झालेला पशूयज्ञ ब्राह्मणवादाला हवा होता. मनुस्मृती चातुर्वर्ण्याला देशाचा कायदा बनवून थांबत नाही, ती केवळ पशूयज्ञाला कायदेशीर बनवत नाही तर ब्राह्मणाने शस्त्र केंव्हा हातात धरावे आणि राजाला ठार मारणे केंव्हा समर्थनीय आहे हे देखील सांगते.

चांडाळ

चांडाळाना अस्पृश्य समजण्याची गल्लत कोणी करू नये यासाठी ते बाणाच्या कादंबरीतील वर्णन इथे देतात. यावरून हे स्पष्ट होते की मातंग हे अस्पृश्य प्रवर्गातील नसून ते चांडाळ प्रवर्गातील आहेत.

शेवटी बाबासाहेब इ.सनाच्या ४०० च्या दरम्यान अस्पृश्यतेचा जन्म झाल्याचा अंदाज वर्तवतात. अस्पृश्यता ही बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यांच्या संघर्षातून जन्माला आली असून या संघर्षानेच भारताचा इतिहास घडविला असल्याचे नमूद करतात. भारतीय इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी मात्र या संघर्षाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याची खंत ते  अस्पृश्य मुळचे कोण? या पुस्तकात व्यक्त करतात.

थोडक्यात : अस्पृश्य मुळचे कोण?

अस्पृश्य मुळचे कोण? या पुस्तकाचा सारांश देण्याचा वर थोडक्यात प्रयत्न केला आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले हे पुस्तक आपण विकत घेवून वाचावे, संग्रही ठेवावे आणि वेळोवेळी त्याचा संदर्भ घ्यावा असे मी आपणास सुचवू इच्छितो. कारण शुद्र, चांडाळ, अस्पृश्य इ. संकल्पना पुराव्यानिशी हे पुस्तक स्पष्ट करते. तसेच चळवळीला आणि कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे कार्य करते. इतकेच नव्हे तर चित्रपट, नाटके इ. मार्फत प्रबोधन करणाऱ्या कलाकारांना देखील हे पुस्तक फारच उपयोगी आहे. सामाजिक / राजकीय  शास्त्राच्या आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अस्पृश्य मुळचे कोण? हे पुस्तक जवळ बाळगावे हे तर सांगण्याची काही गरजच नाही.

 

 

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *