भीमा कोरेगाव हल्ला २०१८ :आत्मपरीक्षण

भीमा कोरेगाव हल्ला २०१८ :आत्मपरीक्षण

भीमा कोरेगाव हल्ला २०१८ :आत्मपरीक्षण

भीमा कोरेगावची घटना खूपच अस्वस्थ करणारी होती. भीमा कोरेगाव हल्ला २०१८ :आत्मपरीक्षण  या विषयावर किमान काहीतरी लिहावेच लागणार होते. वाटले ही घटना म्हणजे आर एस एस चे आक्रमण की आपणच आपलाच करून घेत असलेल्या आत्मघाताचे मूर्त स्वरूप? आक्रमण तर आहेच पण आता प्रत्येकानी गंभीर होवून कुठे तरी आत्मपरीक्षण केल्याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतर हार ठरलेलीच आहे.

भीमा कोरेगाव हल्ला २०१८ :आत्मपरीक्षण

दंगल रोखण्याची रणनीती नाही. स्वसंरक्षणाची काहीही व्यवस्था नाही.

खरेतर आता आपल्याला माहित आहे की दलित समाजावर अनेक ठिकाणी दंगली होतात. दलित समाजावर हल्ले होतात. तरीही या दंगलींना तोंड देण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि रणनीतीचा अभाव दिसून येतो. कोणतीच संघटना याबाबत गंभीर दिसत नाही. घटना घडल्यानंतर प्रतिक्रियात्मक बाबी करायच्या मात्र शास्त्रशुध्द पद्धती अवलंबायच्या नाहीत असे दिसून येते.

हल्लेखोरांना जशास तसे उत्तर हवे.

अ. मुस्लिमांची प्रतिक्रिया – काही मुस्लीम व्यक्तीही भीमा कोरेगावला हजर होत्या. त्यांनी दंगलीचे चित्रीकरण करून विडीओ फेसबुक वर अपलोड केले होते. त्यावर अनेक मुस्लीम व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. ते ५०० आणि तुम्ही २ लाख लोक असूनही तुम्ही बघत काय बसलाय? असेच मरा मग. तुम्ही काहीच प्रतिहल्ला केला नाही. गावांवर दहशत बसवली नाही तर मग तुमच्या संख्येचा काय उपयोग?

ब. एका युवकाची प्रतिक्रिया – सन १८१८ साली ५०० महारांनी २८००० पेशव्यांना हरवले आणि आज सन २०१८ रोजी ५०० बहुजनांनी २८००० महारांना हरवले.

या प्रतिक्रिया विचार करायला लावणाऱ्या होत्या. एवढ्या मोठ्या संखेनी समाज एकत्र येतो आणि स्थानिकांचा मार खावून निघून जातो हि बाब नकारात्मकता आणि निराशा निर्माण करते. खरचं काही चुकलय का आपल? कमी पडतोय का? शेळपट झालोय का? की घाबरलोय?

गर्दी जमते पण जमाव संघटीत नाही.

बाबासाहेब म्हणाले होते की शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघर्षही करत आहोत मात्र संघटीत होत नाही. देव दर्शनाला किंवा पर्यटनाला निघाल्या सारखे आम्ही निघतो. प्रत्येकजण स्वतंत्रपणे सगळे करायला बघतोय. संघटीत कृतीचा अभाव दिसून येतोय. जर प्रत्येक जण संघटीत असता आणि येणाऱ्या प्रत्येकाची प्रत्येक खबरबात संघटना प्रमुखांना असती तर?

आपात कालीन परिस्थितीसाठी पूर्वतयारीचा अभाव.

ऐनवेळी राहण्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कार्यकर्ते धडपडत होते. त्यांचे खूप कौतुक वाटते. पण यासाठी लागणारा निधी आधीच जमवून योग्यप्रकारे तजवीज केली जाणे शक्य होते. आधीच व्यवस्थापन पाहण्यासाठी कार्यकर्ते नियोजित करून ठेवणे शक्य होते. आधीच सर्वांना व्हाटस अॅप, फेसबुक वरून कल्पना देता आली असती. कोण कोण कोठून आलेय ? कोण कुठे अडकलेय? कोणाला नेमकी कोणत्या स्वरूपाची मदत हवीय? मदत  हवी असल्यास नेमकी कोणाला मागायची? फोन आणि इंटरनेट शिवाय संपर्क यंत्रणा कशी राबवायची याचे कसलेच प्रशिक्षण नाही आणि व्यवस्थापनही  नाही.

सरकारवर अवलंबित्व

प्रत्येक बाबींसाठी आता सरकारवर अवलंबून राहणे आपण आता सोडायला हवे. इंग्रज सरकार किमान पक्षपाती भूमिका तरी घेत नव्हते इथे मात्र सरकार उघड पक्षपात करताना दिसत असताना आणि असा अनेक वर्षांचा अनुभव असताना सरंक्षण, वाहतूक, जेवण, राहणे, औषधे, शौचालये आणि नहानी घरे इ. साठी आपण आपलीच स्वतंत्र व्यवस्था करायला हवी.

समता सैनिक दलाने दंगल खोरांचे हात, पाय, तोंड बांधून पोलिसांच्या हवाली करावे.

समता सैनिक दल सैनिकाला शोभेल असे कधी वागणार? बाबासाहेबांनंतर लेफ्ट राईट करण्यापलीकडे आणि शोभेचे बाहुले बनण्यापलीकडे ही आपली काही कामे आहेत याचे यांना भान नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदार समता सैनिक दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि नेते आहेत. पोलीस आणि मिल्ट्री चे निवृत्त अधिकारी आपणास प्रशिक्षणासाठी उपलब्ध होवू शकतात. प्रशिक्षण अशा दर्जाचे व्हायला हवे की आपले कार्यक्रम विना अडथळा पार पडायलाच हवा मात्र समता सैनिक दलातील कोणा सैनिकाने पोलीस किंवा मिल्ट्री मध्ये भरतीसाठी प्रयत्न केला तर त्याला डावललेच नाही जायला पाहिजे. समता सैनिक बघूनच प्रस्थापितांना धडकी भरायला हवी.

पोलीस केसेस करण्यात समता सैनिक दलाचा पुढाकार हवा. समता सैनिक दलाचे कायद्याविषयक, दंगल नियंत्रण विषयक प्रशिक्षण व्हायला हवे.

आजही समता सैनिक कमी आत्मविश्वास असल्यासारखे वाटतात. त्यांना कायद्याचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण द्यायला हवे. त्यांना यंत्रणा समजावून द्यायला हवी. सर्व कामे त्यांनी स्व जबाबदारीने पार पाडायला हवीत.

गर्दीचे व्यवस्थापन करण्यात संघटनाचे दुर्लक्ष.

Crowd management करण्यात संघटना अयशस्वी ठरल्या आहेत. एव्हाना असे काही करायचे असते हेच यांना कळत नाही. कुणाचीही कुठेही नोंद नाही, कोणालाही कसल्याही सूचना नाहीत, सूचना फलक नाहीत, गर्दीला सूचना आणि दिशा देण्यासाठी लाउड स्पीकर नाहीत. माहिती केंद्रे नाहीत, तक्रार केंद्रे नाहीत.  हे असे कसे चालेल? जबाबदार संघटनांनी याची काही तरी तजवीज जबाबदारीने करायला नको का?

जयंतीमध्ये पैशाची होणारी नासधूस वाचवून तो पैसा अशा कार्यक्रमांच्या व्यवस्थापनासाठी वापरायला हवा.

बऱ्याचदा अशा कार्यक्रमांना पुरेसा निधी मिळत नाही. मिळेल त्या निधी मध्ये जमेल तसा खर्च करून कार्यक्रम अक्षरश: रेटला जातो. त्याच वेळी दुसरीकडे मात्र आंबेडकर जयंतीला पैशाची नाहक नासाडी केली जाते. बेंजो वाजवणे, कव्वाल्या, डान्सिंग स्पर्धा भरविणे अशा निरर्थक बाबींवर नाहक पैसा बरबाद केला जातो. ते आपणास परवडणारे नाही. प्रत्येक मंडळाने हा जयंती मध्ये जमा झालेला निधी वाचवून या कार्यक्रमांना वापरायला हवा. पैसा आणि मनुष्यबळ यांचे सुयोग्य नियोजन व्हायला हवे. तरुण पिढीतील सर्वांनी स्वयंसेवक म्हणून काहीना काही काम करायला हवे. त्यांना काम देण्यासाठीचेही काही तरी व्यवस्थापन हवेच.

निधी संकलनाकडे दुर्लक्ष

चुकीच्या धारणा मनाशी बाळगून निधी संकलन पुरेशा प्रमाणात केले जात नाही. आणि प्रशिक्षित आणि पगारी पूर्णवेळ कार्यकर्ते व सैनिक कायम स्वरूपी संघटनांच्या मार्फत नेमले जात नाहीत. त्यामुळे व्यवस्थापनावर संघटनांचे नियंत्रण असत नाही.

कोणतीही संघटना ही पूर्णवेळ कार्यकर्ते नसेल तर उभी राहत नाही. आणि आमच्या कोणत्याच संघटनेत एकही पूर्णवेळ कार्यकर्ता असत नाही. त्याला त्याच्या कुटुंबाला पोट आहे. तो जगायचा  असेल तर त्याला मानधन द्यायला हवे. आणि ते देण्याची ऐपत एकाही संघटनेकडे नाही. आणि म्हणून तरुण वर्ग एम एस डब्लू च्या मागे लागून एन जि ओ च्या जाळ्यात फसत चालला आहे. आणि एन जो ओ ह्या चळवळ मोडून काढू लागल्या आहेत. खरच पैसा नाही आहे का? की जमा केला जात नाही? नियोजन नाही? आपण आता कधी गंभीर होणार आहोत?

भ्रष्टाचार

पुढारी पैसे खातात, अॅट्रोसिटी केसेसचा वापर प्रस्थापितांकडून पैसे खावून तडजोड घडवून आणण्यासाठी करतात म्हणून लोक ही मग नेत्यांच्या हातात पैसे देणे टाळतात. विश्वास ठेवेनासे होतात. त्याचा तोटा प्रामाणिक कार्यकर्त्यांना / संघटनांना निधीची कमतरता होण्यात होतो. अनेक रिपाई वाले  हे उद्योग करत आहेत. त्यांचा हाच पोटापाण्याचा धंदा आहे. अशा लोकांना आपण जरब बसवायला हवी. एन केन प्रकारेन.

बोरिंग भाषणे आणि अहंकार

लांबलचक भाषणे करणे, इतरांपेक्षा स्वत:ला शहाणे समजणे, अहंकार बाळगणे इ. बाबींमुळे संघटनांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. तरुण पिढी ला नेते मंडळी वैतागून सोडतात. नेमके, मुद्देसूद, मोजके, अभ्यासपूर्व बोलणे असायला हवे. माणसे पकवू लागली की त्यांच्या कडे जावेसे वाटत नाही. बोलावेसे वाटत नाही. अहंकार दाखवला की मग ओळखही दाखवावीशी वाटत नाही. आणि मग कार्यकर्ता संघटनेकडे पाठ फिरवतो. नेत्यांचेच खरेतर संघटना बांधणीचे प्रशिक्षण व्हायला हवे.

वारकरी संप्रदायाचा आदर्श घ्यावा.

वारकरी संप्रदायाच्या दिंड्या असतात. प्रत्येक दिंडी एकेक संस्था चालवितात. त्यांचे योग्य प्रकारे नियोजन असते. राहायचे कुठे, जेवायचे कुठे, निधीची व्यवस्था, औषध गोळ्यांची व्यवस्था, संरक्षणाची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इ. बाबींमध्ये पूर्वनियोजन असते. उठले सुटले की ते निघत नाहीत. तसे काहीच नियोजन आंबेडकरी कार्यक्रमात दिसून येत नाही. दिंडीचे नियोजन वर्षभर चालते. आपले असे काहीच होत नाही. सगळाच सावळा गोंधळ. मनाला वाटेल तसे करा.

संघटनात्मक लोकशाहीचा अभाव

संघटनांमध्ये वेळोवेळी बैठका, वैचारिक चर्चा, मागील कामाचा आढावा, पुढील नियोजन, मूल्यमापन, सुधारणा इ. बाबींचा अभाव दिसून येतो. असे काहीच झाले नाही तर आपण काय करतोय? आपले नेमके काय चुकतेय आणि नेमके कुठे सुधारायला हवे हेच कळत नाही आणि सुधारणा न झाल्यामुळे आपली पीछेहाट होत जाते. भीमा कोरेगाव हल्ला २०१८ मागचे हे देखील एक कारण आहे.

झोपडपट्टी दादांचे पुढारीपण

आजही अनेक संघटनांचे प्रमुख लोक हे झोपडपट्टी दादा आहेत. त्यांची कसलीही वैचारिक बैठक नाही. अभ्यास नाही. वाचन नाही. काय करावे हे त्यांना कळत नाही. केवळ गुंडगिरीच्या भांडवलावर ते नेते बनून समाजाचे नुकसान करत आहेत. आणि यांच्यामुळे शिकलेले, अभ्यासू, विचारी तरुण पुढे येत नाहीत, आणि आले तेरी त्यांना संधी मिळत नाही.

उच्च शिक्षित आणि चळवळीत मुरलेल्या तरुण कार्यकर्त्यांना योग्य संधी हवी.

एकदा गुंडांना नेते म्हणून स्वीकारले की चांगल्या कार्यकर्त्यांना कोण आणि कसली संधी देणार? खरे तर हे तरुण समाजाला पुढे नेऊ शकतात. मुलांचे अभ्यासवर्ग घेणे, लोकांना कायद्याचे ज्ञान देणे, वस्तीतील समस्यांचे निराकरण करणे असे काम हे उत्तमरीत्या करू शकतात.

डावे आणि समाजवाद्यांबद्दल गैरसमज

भीमा कोरेगाव हल्ला २०१८ :आत्मपरीक्षण  करताना हे लक्षात येवू लागले आहे की, डावे आणि समाजवाद्यांबद्दल गैरसमज ही एक मोठीच समस्या बनून राहिलेली आहे. अभ्यास न करता, बाबासाहेबांना समजून न घेता डावे आणि समाजावाद्यांवर टीका करत सुटणे, एक तर त्यांना ब्राह्मण म्हणून शत्रू समजणे किंवा त्यांच्या विचारधारेला समजून न घेता टोकाचा विरोध करणे, त्यांचा द्वेष करणे यातून आपण आपलाच आत्मघात करत आहोत नाही का?

तर हे होते भीमा कोरेगाव हल्ला २०१८ :आत्मपरीक्षण.

काय करता येऊ शकेल? कोण करेल?

करता येईल का आपल्याला काही तरी ???

Image source : https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Dr._Babasaheb_Ambedkar_and_his_followers_at_Vijaystambha_of_Bhima_Koregaon_(Pune,_Maharashtra).jpg

Sachin Moreभीमा कोरेगाव हल्ला २०१८ :आत्मपरीक्षण
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

 

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *