बुद्ध : अत्यंत प्राचीन तरीही अत्याधुनिक क्रांतिकारक

बुद्ध : अत्यंत प्राचीन तरीही अत्याधुनिक क्रांतिकारक

वास्तविक या लेखात बुध्दाविषयी असणारे गैरसमज आणि मिथके यांचे वास्तव स्वरूप आपण याठिकाणी समजून घेणार आहोत

बुद्धपौर्णिमा म्हणजेच दर वर्षी येणारी वैशाखी पौर्णिमा. सर्वच पौर्णिमांना बुद्ध धम्मा मध्ये फार महत्व असते. कारण बुद्धाच्या आयुष्यातील महत्वपूर्ण बाबी कोणत्या ना कोणत्या पौर्णिमेच्या दिवशी घडून आलेल्या आहेत. पण वैशाखी पौर्णिमा सर्वात अधिक महत्वाची मानली जाते.  बुध्दाच्या आयुष्यातील ३ महत्वपूर्ण घटना या पौर्णिमेच्या दिवशी घडून आलेल्या आहेत आणि म्हणूनच या पौर्णिमेस बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते. या घटना पुढील प्रमाणे.

  1. जन्म – ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमा
  2. बुद्धत्व (ज्ञान) प्राप्ती – ख्रिस्तपूर्व ५२८ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमा           – वय वर्ष ३५
  3. परीनिर्वाण (मृत्यू) – ख्रिस्तपूर्व ४८३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमा           – वय वर्ष ८०

.

बुद्ध : अत्यंत प्राचीन तरीही अत्याधुनिक क्रांतिकारक
१.     परीव्रज्या

बुद्धाच्या बाबतीत त्याने परीव्रज्या (सन्यास) घेण्याचे कारण असे सांगितले जाते की वयाच्या २९ व्या वर्षा पर्यंत त्याने दु:खी माणूस पाहिलेला नव्हता. एके दिवशी त्याने जगातील दु:खी माणसे, मृत्यू इ. बाबी पाहून तो दु:खी झाला आणि त्याने सन्यास घ्यायचा निर्णय घेतला. या मिथकाबाबत काही प्रश्न उपस्थित होतात. वयाच्या २९ व्या वर्षापर्यंत सिद्धार्थाने मृत्यू, आजारी मनुष्य पाहिलेलाच नसेल अशी शक्यता अजिबातच स्विकारता येत नाही. सिध्दार्थ ज्या संघाचा सदस्य होता त्या संघामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून युद्ध करायचा निर्णय घेण्याचे ठरत असताना सिध्दार्थने त्यास विरोध केला. त्यातून वाद निर्माण होऊन त्यास माघार घेण्यास सांगण्यात आले. त्याने माघार न घेतल्याने त्यास सन्यास घ्यावा लागला असे विवेचन बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात केले आहे.

२.     विष्णूचा अवतार

बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार असल्याचा प्रचार सातत्याने अनेक वर्षापासून केला जातो. तसा समज समाजात प्रचलित आहे. वास्तविक यास कोणताही वैज्ञानिक आधार नाही. बुद्धाचे दैवतीकरण करण्याचा हा भाग आहे. तो आपण धुडकाऊन लावायला हवा. खरे तर इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणेच सिध्दार्थचा जन्म झालेला होता. तो मनुष्य म्हणूनच जन्मास आला होता. त्याने परिश्रम पूर्वक दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग शोधून काढला. आणि जो कोणी त्या मार्गाने जाईल तो बुद्ध बनू शकतो.

३.     पुनर्जन्म

जर आत्मा अस्तित्वात नाही तर पुनर्जन्म कुणाचा यावर खूप वाद होतात. यावर बुद्धाचे मत असे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक मरत नाहीत. पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे शरीराचे घटक आकाशात जे समान पदार्थ सामुहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. जेंव्हा हे चार घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला (Mass) मिळतात तेंव्हा एक नवा जन्म घडतो. बुद्धाची पुनर्जन्मही संकल्पना पूर्णपणे वास्तववादी आहे.

४.     कर्मविपाक सिद्धांत

माणूस गरीब, दरिद्री, संकट ग्रस्त, दु:खी, त्रासलेला असेल तर त्यास मागच्या जन्माच्या पापाची फळे मानून ईश्वर भक्तीत वेळ बरबाद करण्याचा सल्ला बुद्ध देत नाही. मुळात बुद्ध आत्माच मानत नसल्याने आत्म्याशी संबंधित पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या संकल्पना तो नाकारतो. तो जसे कराल तसे भराल असा सल्ला वर्तमान जीवनाबाबत देतो. माणूस गरीब म्हणून जन्माला आला असल्यास त्याची कारणी गतजन्माच्या कर्मात न शोधता वर्तमान जीवनातच प्रयत्न पूर्वक गरिबी आणि दु:ख दूर करण्याचा तो सल्ला देतो.

५.     धम्म म्हणजे नीती

इतर धर्म माणसाला नीतीने वागण्यासाठी भीती आणि प्रलोभनाचा आधार घेतात. तसा आधार बुद्ध घेत नाही. जर नीतीने वागाल तर स्वर्गात जाल किंवा पुनर्जन्म चांगला मिळेल असे प्रलोभन तो देत नाही. किंवा जर नीतीने वागला नाहीत तर नरकात जाल किंवा पुनर्जन्म वाईट स्वरूपाचा मिळेल अशी भीती तो माणसाला घालत नाही. बुद्धाची नीती ही खुशीची नीती आहे. उदा. सर्वांनी समजून घेवून रहदारीचे नियम पाळले तर जसे रस्त्यावर ट्राफिक जाम होत नाही.  याउलट चौकात पोलीस दिसत नाही म्हटल्यावर नियम तोडू पाहणारे नागरिक अपघात आणि ट्राफिक जामला निमंत्रण देतात तसेच काहीसे हे आहे.

६.     शोषणाशी संबंधित सर्व संकल्पनांचा त्याग

ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, पूर्वजन्म, स्वर्ग, नरक इ. संकल्पना या श्रीमंत वर्गाच्या वतीने गरिबांना मानसिक गुलाम बनविण्यासाठी जगातील सर्व धर्मानी निर्माण केलेल्या आहेत. गरिबांनी आपल्या गरिबीचे, शोषणाचे, दु:खाचे कारण वास्तव जगातील भेदभाव, संपत्तीचे असमान वाटप, एकाच वर्गाकडे एकवटलेली जमिनीची आणि उद्योगांची मालकी याकडे न शोधता. किंवा स्वत:मधील आळस, अंधश्रद्धा, व्यसन, अज्ञान, गलिच्छपणा, बेशिस्त यांमध्ये न शोधता गतजन्मातील पापांमध्ये शोधावीत. जे णे करून त्याची दु:खातून या जन्मात तरी सुटका करण्याचा प्रयत्न तो करणार नाही.

उलट ईश्वरभक्ती, कर्मकांडे आणि अंधश्रद्धाच्या आहारी जावून त्याने पुनर्जन्म चांगला मिळण्यासाठी धडपड करावी. आणि याद्वारे श्रीमंतांना आणि जमीनदार, भांडवलदार यांना संपत्तीची मालकी खुशाल उपभोगू द्यावी असाच काहीसा हा डाव आहे.

बुध्द हा डावच उलथवून लावतो.  बुध्द ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, पूर्वजन्म, स्वर्ग, नरक इ. सर्व संकल्पना नाकारतो. त्याऐवजी वास्तविक आणि विना भीती आणि विना प्रलोभनाची नीती म्हणजेच धम्म लोकांना खुला करतो. आणि शोषणाशी संबंधित सर्व आधाराना सुरुंग लावतो.

इतकेच नव्हे तर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे, ईश्वरावर विश्वास, आत्म्यावरील विश्वास, यज्ञयागावर विश्वास ठेवणे, इ. बाबी तो अधम्म मानतो. तर ब्रह्म सायुज्जावर आधारित धर्म, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म, धर्मग्रंथांचे केवळ पठन, धर्मपुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे धर्म नव्हे असे तो म्हणतो.

7.          बुद्धाची चार तत्वे

अ) जग अनित्य असून सतत बदलत आहे.

ब) जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही.

क) आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे.

ड) तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दु:ख आहे. आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे.

८.     काही संकल्पनांचे अर्थ
अ. त्रिसरण

बुद्धं सरणं गच्छामी – माझ्या मधील बोधी तत्वाला मी अनुसरतो. आणि बुध्द बनण्याच्या दिशेने एक एक पाऊल चालत जातो.

धम्मं सरणं गच्छामी – नीतीचा मार्ग मी अनुसरतो. म्हणजे मी पंचशील आणि अष्टांग मार्गाचे पालन करतो.

संघं सरणं गच्छामी – बुध्द आणि धम्माच्या मार्गावर जाणाऱ्या लोकांचा जो समूह आहे त्यास मी अनुसरतो. जर असा समूह जवळ नसेल तर स्वत:ला संघ मानून मी संघास अनुसरतो.

ब. पंचशील –
  1. कोणत्याही प्राण्याची हत्या न करणे व त्याला इजा न करणे. २. चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे. ३. व्यभिचार न करणे. ४. असत्य न बोलणे. ५. मादक पेय ग्रहण न करणे.
क. अष्टांगीक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग –

१. सम्यक दृष्टी – विद्या प्राप्त करून अंधश्रद्धा, कर्मकांडे, अविद्या इ. चा विनाश करणे

२. सम्यक संकल्प – उदात्त आणि प्रशंसनीय स्वरूपाची ध्येये, आकांक्षा, आणि महत्वाकांक्षा बाळगणे.

३. सम्यक वाचा – खोटे बोलू नये, दुसऱ्या विषयी वाईट बोलू नये. निंदानालस्ती शिवीगाळ करू नये, मूर्खपणाची बडबड करू नये.

४. सम्यक कर्मांत – दुसऱ्याचे हक्क आणि मान राखून कृती करणे.

५. सम्यक आजीविका – दुसऱ्यांची हानी किंवा दुसऱ्यांवर अन्याय न करता उत्पन्न मिळविणे.

६. सम्यक व्यायाम – अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणजेच विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहणे.

  1. सम्यक स्मृती – दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवून मनाला सतत जागृत ठेवणे.

८. सम्यक समाधी – मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करणे.

ड. पारमिता

१. शील – अपराध करण्याची लाज वाटणे. वाईट गोष्टी करण्याचे टाळणे.

२.  दान – स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी संपत्ती, रक्त, देह इ. अर्पण करणे.

३. उपेक्षा – आवड किंवा नावड नसलेली अनासक्त अशी मनाची स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे.

४. नैष्कर्म – ऐहिक सुखाचा त्याग

५. वीर्य – हाती घेतलेले कार्य माघार न घेता सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.

६. शांती – द्वेषाने द्वेष शमत नाही तो फक्त क्षमाशिलतेनेच शमतो. म्हणून क्षमाशीलता बाळगणे.

  1. सत्य – नेहमी खरे बोलावे. खोटे कधीही बोलू नये.

८. अधिष्ठान – ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करणे.

९. करुणा – मानवाविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता

१०. मैत्री – केवळ मनुष्यच नव्हे तर सर्व जीवनमात्राविषयी, केवळ मित्राविषयीच नव्हे तर शत्रूंविषयी बंधुभाव बाळगणे.

९.     धर्म ही अफूची गोळी आहे.

मार्क्स म्हणतो धर्म ही अफूची गोळी आहे. वरील विश्लेषण समजून घेतल्यावर आपणास हे लक्षात आले असेलच की इतर धर्म आणि बुद्धाचा धम्म यात मुलत: फरक आहे. ईश्वर इ. संकल्पना मनुष्यास मानसिक गुलाम बनवितात. त्यास अफूच्या गुंगी प्रमाणे नशेत ठेवतात. आणि वास्तवाचे भान येऊ देत नाहीत. मात्र ही बाब बुद्धाच्या धम्मास लागू नाही. हा धम्म या अफूच्या गुंगीस थारा देत नाही. उलट मार्क्सच्या वास्तववादी आणि भौतिकवादी भूमिकेच्या आड न येता सहकार्याच्या भूमिकेत दिसून येतो. आणि उलट मार्क्सच्या शोषणमुक्त समाज निर्मितीच्या कार्यास सहाय्यभूत ठरतो.

१०. व्यवस्था परिवर्तनाला मत (हृदय) परिवर्तनाची  जोड हवी.

जर व्यवस्था समतेची असेल आणि लोकांचा धर्म विषमता मानणारा असेल तर लोक ही व्यवस्था एक ना एक दिवस उलथवल्या शिवाय राहणार नाहीत. तसेच जर व्यवस्था विषमता / भेदभावयुक्त  असेल आणि लोकांचा धर्म समतेचा असेल तरी लोकांचे शोषण हे होतच राहील. यासाठी व्यवस्था आणि धर्म हे दोन्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि विज्ञानाच्या पायावर असायला हवेत तरच समतेचे राज्य हे चिरकाल टिकू शकते.

११. भिक्खू संघ म्हणजे जिवंत कम्युन

मार्क्सने कल्पिलेला कम्युन प्रमाणेच बुद्धानी निर्मिलेला भिक्खू संघ अस्तित्वात आहे. या संघातील सदस्याच्या मालकीची अशी कोणतीच वस्तू नसते. अगदी अंगावरचे चीवर देखील संघाच्या मालकीचे असते. संघातून बाहेर पडताना ते संघास परत करावे लागते. तर जे काही त्याचेकडे असते त्याचा मालक हा संघ असतो. संघाची कार्यपध्दती लोकशाही पध्दतीने पार पडते. भिक्खू संघ म्हणजे एक प्रकारचे जिवंत स्वरूपातील कम्युन्स असून ते हजारो वर्षे जिवंत आहेत. ते एक मॉडेल आहे की ज्या कडे पाहून सामान्य माणसांनी आपली स्वत:ची व्यवस्था त्याप्रमाणे निर्माण करावी.

१२. शासनसंस्थेची जागा धम्म घेईल.

मार्क्स म्हणतो जागतिक क्रांती नंतर युद्ध थांबतील, गरिबी नष्ट होईल, सैन्य, पोलीस, कोर्ट यांचे प्रमाण कमी कमी होत नष्ट होत जाईल. आणि यांना जगवण्यासाठीचे महसूल खात्याची गरज उरणार नाही तेंव्हा शासन संस्था लयाला जाईल. बाबासाहेब म्हणतात तेंव्हा त्याची जागा हा धम्म घेईल. कारण वास्तववादी तसेच भीती आणि प्रलोभनमुक्त अशी खुशीची नीती म्हणजेच धम्मानुसार जगाचा कारभार चालेल.

 अशा प्रकारे बुद्ध : अत्यंत प्राचीन तरीही अत्याधुनिक क्रांतिकारक असा आहे. जगाला एक ना एक दिवस बुद्ध स्विकारण्या शिवाय पर्याय राहणार नाही.

अत दीप भव !

संदर्भ – १. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२. बुद्ध की कार्ल मार्क्स – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

About the author

Human Liberty

Hi,
We are comrades of Human Liberty organization. We are dedicated to revolution for communism.
Buddhism, Marxism & Ambedkarism is a base of our organization.
We are working with weaker section of society to establish liberty, equality & fraternity in world.

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *