डॉ नरेंद्र दाभोळकर

डॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’

डॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’     …… अमर हुआ.

डॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’. डॉ नरेंद्र दाभोळकर म्हणजेच आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी डॉक्टर. सामाजिक सुधारणेच्या एका महत्वपूर्ण चळवळीतील मार्गदर्शक, विचारवंत, वडीलधारा असे डॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’  ….. ज्यांच्या अनपेक्षित जाण्यानं कधीही भरून न येणारं आणि अवघ्या महाराष्ट्राला १०० वर्षे मागे नेणारं प्रचंड मोठं नुकसान झाल्याची भावना सर्वच थरातून व्यक्त होत आहे.

डॉक्टरांचं प्रचंड मोठं काम शब्दबद्ध करणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास.

ज्या डॉक्टरांबद्दल मी १९९१ पासून म्हणजेच वयाच्या १५ व्या वर्षापासून संपर्कात व चळवळीत सक्रीय सहभागी आहे. त्यांच्या अचानक जाण्याने मला जो धक्का बसला त्यातून खरेतर मी अजूनही सावरलो नाही. इतका दीर्घकाळ अतिशय जवळून संपर्क असलेला मी साधा कार्यकर्ता. किती लिहू आणि काय लिहू? याच प्रश्नात अजूनही गुंतलो आहे. आकाशाला गवसणी घालणारं डॉक्टरांचं प्रचंड मोठं काम शब्दबद्ध करणं म्हणजे माझ्यासाठी लहान तोंडी मोठा घास.

निकोप चिकित्सेचा आग्रह

डॉक्टर ज्या क्षेत्रात काम करत ते क्षेत्र अत्यंत नाजूक आणि स्फोटक. अंधश्रद्धा निर्मुलन. यामध्येच ‘श्रद्धा’ या शब्दाची व्याप्ती आणि अनेक वर्षांची परंपरा. यामुळे प्रत्येक व्यक्तीला श्रद्धा ठेवण्याचा, आपल्या विवेक बुद्धीनुसार पूजाअर्चा मुलभूत हक्क आहे. दाभोळकर डॉक्टरांनी तो कधीही नाकारला नाही. किंवा श्रद्धा विषयाची किंवा श्रद्धा स्थानांची टिंगल टवाळी केली नाही. विवेकाच्या निकषावर श्रद्धा तपासून घ्या असे ते विनयपूर्वक सांगत असत. निकोप चिकित्सेचा त्यांचा आग्रह होता. डॉक्टरांची सर्वच मते सर्वांनाच पटत होती असे नाही. त्याची त्यांना जाणीव होती. वैचारिक देवाणघेवाणीमुळे जाणिवांची क्षितिजे विस्तारत जातात. दुराग्रहाचे रुपांतर आदरामध्ये होते. साचलेपण दूर सारून प्रवाहीपण येते. आणि परिणामत: समाजजीवन अधिक निकोप व निरामय होण्यास मदत होते.

बौद्धिक कुस्तीपटू

तर्कशुद्ध विचार आणि ते मांडण्याची लोकविलक्षण हातोटी, त्याला नम्र विनोदाची फोडणी. यामुळे डॉक्टरांचा युक्तिवाद त्यांच्या कट्टर विरोधकांनाही मंत्रमुग्ध करीत असे. अंतर्मुख करत असे. त्या विचारांचा तितक्याच धारधारपणे प्रतिवाद करणे हे खऱ्या शुरांचे लक्षण असते. अशा प्रकारच्या बौद्धिक कुस्तीसाठी दाभोलकरांची नेहमीच तयारी असे. त्यासाठी त्यांनी अनेकांना जाहीर आमंत्रणे दिली होती. अनेक आव्हाने स्वीकारली होती.

धर्मसुधारक

डॉक्टर हे कधीच ‘धर्मद्रोही’ नव्हते. ते धर्मसुधारक होते. धर्माच्या वृक्षावर जोपासली गेलेली बांडगुळे छाटून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी विवेकाचा जागर चालविला होता. आणि हा जागर केवळ भाषणे करण्याचा नसून अनेक उपक्रमशील आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून चालू ठेवला.

जीवितकार्य

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आज महाराष्ट्रभर २३० शाखा असून या चळवळीत हजारो कार्यकर्ते तन मन धनाने काम करत आहेत. कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण पक्की व्हावी यासाठी भ्रम आणि निरास, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, ऐसे कैसे झाले भोंदू, अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह पूर्णविराम, विचार तर कराल, अंधश्रद्धा विनाशाय, विवेकाची पताका घेवू खांद्यावरी, ठरलं डोळसं व्हायचंय!, प्रश्न मनाचे, तीमिरातुनी तेजाकडे, मती भानामती एवढी मोठी ग्रंथसंपदा लिहून ठेवली. या चळवळीची कामाची चतु:सुत्री बनविली. एक म्हणजे बुवाबाजी, भूत भानामती, चमत्कार यांचे पितळ उघडे पाडून त्यात चाललेले शोषण रोखणे – थांबवणे, दुसरे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करणे, तिसरे म्हणजे धर्माची विधायक व कृतीशील चिकित्सा करणे आणि चौथी व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे. या चारही पातळ्यांवर त्यांनी विवेकाने आणि चिकाटीने वाटचाल केली. धर्मनिरपेक्ष, संवेदनशील,, सजग आणि विवेकवादी माणूस तसेच समाज घडविणे हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले होते.

अत्यंत धिरोदात्त, ठाम आणि तरीही विलक्षण नम्र

समाज प्रबोधनासाठी एकाच वेळी प्रबोधन, रचना, आणि संघर्ष या तिन्ही आघाड्यांवर लढावे लागते. अत्यंत धिरोदात्तपणे, ठामपणे आणि तरीही विलक्षण नम्रपणाने. डॉक्टर दाभोळकर या सर्व गोष्टी करत असत. हे अवघड कौशल्य त्यांनी आत्मसात केले होते. किंवा असेही म्हणता येईल की, धैर्यधुरंधरता आणि विनम्रता हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचेच अविभाज्य भाग होते. ती त्यांची उपजत वृत्तीही असावी. साधेपणा हा तर त्यांच्या दिसण्या – वागण्या – बोलण्याचा महत्वाचा पैलू होता. अलीकडच्या काळात साधी राहणी, उच्च विचारसरणी असे ज्यांच्याकडे बोट दाखवून नि:शंकपणे म्हणावे. असे जे विरळ लोक आहेत त्यात डॉक्टर दाभोळकर अग्रभागी होते.

सामाजिक कृतज्ञता निधी

डॉक्टरांचे कार्यक्षेत्र केवळ अंधश्रद्धा निर्मुलन नव्हते. व्यापक परिवर्तन हा त्यांचा ध्यास होता. यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी सुरु केले. १९८६ साली त्यांच्या पुढाकारातून सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना झाली. समाजाच्या कानाकोपऱ्यात आणि विविध समाजघटकांमध्ये स्वत:च्या करिअरची पर्वा न करता कार्यकर्ते काम करत असतात. असे झोकून देवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही एक आर्थिक हातभार लागावा. त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी हा निधी उभा केला. या कार्यात डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर अशा अनेक दिग्गजांचा सहभाग होता. या निधीचे डॉक्टर विश्वस्त सचिव होते. छोट्या छोट्या लोकांकडून छोट्या छोट्या देणग्या उभारण्यात आल्या. त्यातील एक कोटी रुपयांच्या व्याजातून ५० कार्यकर्त्यांना ते मानधन देत.

व्यसनमुक्तीचे कार्य

१९८९ साली परिवर्तन या संस्थेमार्फत व्यसनमुक्तीचे अत्यंत महत्वाचे काम त्यांनी उभे केले. प्रबोधन, प्रतिबंध, प्रतिकार आणि उपचार या चार पातळ्यांवर भरीव स्वरूपाचे कार्य डॉक्टरांनी केले. अनेकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम त्यांनी केले.

साधना

साधना हे साने गुरुजींनी स्थापन केलेले साप्ताहिक. या ध्येयवादी वैचारिक साप्ताहिकाचे गेली १४ वर्षे डॉ. दाभोळकर यांनी कुशल संपादन केले. नव्या काळाची नवी आव्हाने पेलत ते वाढविले. या कालावधीत या साप्ताहिकाचे साठ विशेषांकासह सातशे अंक नियमितपणे प्रसिद्ध झाले. साधना प्रकाशन गृहातर्फे गेल्या १० वर्षात ४० दर्जेदार ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टरांच्या कुशलतेने साधना साप्ताहिकाने अभूतपूर्व झेप घेतली.

कबड्डीपट्टू ते सर्वोत्तम कार्यकर्ता

सामाजिक कार्यकर्ता ही डॉ नरेंद्र दाभोळकर यांची ओळख पुरेशी नाही. अंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीपट्टू. बांगलादेश विरुद्ध झालेल्या कबड्डी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व. व्यक्तिगत कौशल्याची सात सुवर्णपदके. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार. व शिवछत्रपती युवा पुरस्कार. हे महाराष्ट्र शासनाचे सर्वोच्च पुरस्कार हे दोन्ही मिळविणारे डॉ. दाभोळकर. २००६ साली महाराष्ट्र फाऊन्डेशन अमेरिका यांच्याकडून १० लाखांचा दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा पुरस्कार त्यांना मिळाला. पुरस्कारापोटी प्राप्त झालेली रक्कम त्यांनी सहजपणे अंधश्रद्धा निर्मुलन समितीला दिली.

जातपंचायतीच्या प्रथेविरोधात ललकारी

जीवनाच्या अखेरच्या कालावधीत त्यांनी नाशिक आणि लातूर या ठिकाणी जातपंचायतीच्या प्रथेविरोधात मोठ्या परिषदा घेतल्या. जातीअंताच्या दिशेने दिली गेलेली टी जणू काही नवी ललकारीच होती.

डॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’   ….. हरपला.
पण पेरलेल्या विचारांची हत्या करता आली नाही.

डॉक्टरांनी कायम विवेकाच्या, अहिंसेच्या, सत्याच्या आणि सत्यशोधनाच्या मार्गाने प्रवास केला. त्यांचीच आज हत्या झालीय. डॉक्टरांच शरीर संपवलंय पण पेरलेल्या विचारांची हत्या करता आली नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने दाखवून दिले आहे.

ज्ञानविज्ञानाच्या महतीसाठी प्राणांची कुरवंडी ओवाळणारे महाराष्ट्रातील पहिले हुतात्मा

स्वातंत्र्यासाठी प्राण देणारी अनेक माणसे महाराष्ट्राने याआधी पाहिली आहेत. समतेच्या वेदिवरही अनेकांनी प्राणार्पण केले आहे. पण ज्ञानविज्ञानाच्या महतीसाठी प्राणांची कुरवंडी ओवाळणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्रातील पहिले हुतात्मा आहेत. डॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’. दु:ख याचेच आहे की, अजूनही मारेकरी आणि त्यांचे सूत्रधार सापडत नाहीत. म्हणून म्हणावेसे वाटते, उष:काल होता होता, काळरात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या, पेटवा मशाली.

डॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’

लेखक – प्रशांत एस. पोतदार, सातारा

राज्य प्रधान सचिव

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती.

मोबाईल – ९४२११२१३२८

ईमेल – prashantspotdar@gmail.com

About the author

Prashant Potdar

Hi,
I am Prashant Potdar.
State Principal Secretory of Maharashtra Andhashraddha Nirmulan Samitee
State Committee Member of Human Liberty Organization

View all posts

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *