एल्गार मार्च : नवपेशवाईच्या अंतासाठी लाखोंची हाक
एल्गार मार्च : नवपेशवाईच्या अंतासाठी लाखोंची हाक. १ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी जनतेवर हल्ला झाला. त्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी मनोहर कुलकर्णी (उर्फ संभाजी भिडे) आणि मिलिंद एकबोटे आहेत. या आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी आणि सरकारने प्रचंड टाळाटाळ केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी मिलिंद एकबोटेना अटक केली. मात्र अद्यापही हल्ल्याच्या कटाचे प्रमुख सूत्रधार मनोहर भिडे यास अटक केली गेली नाही. आता या घटनेस जवळपास ३ महिने होत आले. मिलिंद एकबोटेना अटक केली. तेंव्हाच प्रकाश आंबेडकर यांनी मनोहर भिडेना अटक झाली नाही. तर विधानसभेला घेराव घालू अशी घोषणा केली होती.
एल्गार मार्च ला पोलिसांनी परवानगी नाकारली
दि. २६ मार्च २०१८ ला मुंबईमध्ये भायखळा ते विधानसभा असा एल्गार मार्च काढायचा. आणि विधानसभेला घेराव घालायचा असे ठरले होते. आणि त्याप्रमाणे दि. २४ मार्च पासून आंबेडकरवादी जनता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला येण्यास निघाली होती. दि. २५ मार्चला पोलिसांनी मार्चची परवानगी नाकारली. आणि मोर्चा आझाद मैदान, मुंबई येथे घेण्यास परवानगी दिली.त्यानुसार प्रकाश आंबेडकर यांनी दि. २५ मार्चला दुपारी पत्रकार परिषद घेवून ‘आम्ही सर्वजण व्हीटी (छ.म.शि.ट.) स्टेशन ला सकाळी ११ वा. जमणार आहोत. आणि त्याठिकाणी निर्णय घेवू.’ असे सांगितले.
आझाद मैदान एल्गार मार्च : सुरुवातीचे संभ्रमित वातावरण
त्याप्रमाणे २६ तारखेला सकाळी ११ वा. व्हीटी स्टेशनला गेलो. स्टेशनवर रेल्वे पोलिसांची गर्दी दिसली. मात्र आंबेडकरवादी समूह दिसत नव्हता. थोड्यावेळाने वेगवेगळ्या जिल्ह्यातून भारिप बहुजन महासंघाचे काही ग्रुप येत राहिले. आणि त्यांच्या सोबत आझाद मैदानवर गेलो. येताना पोलीसांचा भरगच्च लवाजमा. त्यांना न घाबरणारा आंबेडकरवादी युवा समुदाय. सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध घोषणा देत पुढे निघाला होता. त्याठिकाणी हजार एक लोक बसतील एवढा तंबू. तो बांधण्याचे काम चालू आणि अंतिम टप्प्यात आलेले. स्टेज आणि शेकडो लोक. थोडे संभ्रमित वातावरण.
नेत्याला पहाताच तरुणाई हरखली
थोड्याच वेळात स्टेजवर प्रकाश आंबेडकर दिसले. आणि लोकांनी टाळ्या, शिट्ट्या आणि उत्साहपूर्ण चित्कारांनी त्यांचे जे स्वागत केले. ते अंगावर शहारे आणणारे होते. एखाद्या नेत्यावर इतके निस्सीम प्रेम करणारा समुदाय मी आज पहिल्यांदा पहात होतो. ‘फार मोठ्या प्रमाणात लोक भायखळ्याला जमले असून मी त्यांना आणायला जात आहे. पोलिसांसोबत जात आहे. परवानगी द्या’ असे ते म्हणाले आणि लोकांनी एकच कल्ला केला. आलेले सर्वजन १८ ते ४० या वयोगटातील युवक होते. त्यांच्या वयाला शोभणारा उत्साह वातावरण भारावून टाकत होता.
एल्गार मार्च मध्ये घोषणानी वातावरण दुमदुमले
थोड्याच वेळात पत्रकार आणि विविध संघटनांचे प्रमुख स्टेजवर दिसले. आणि सतत मुलाखती चालू होत्या. दुपारचे १२.३० वाजले. आणि बाळासाहेबांनी घोषित केले की ‘आपली सभा या मंडपात नाही तर शेजारील मोठ्या मैदानात जिथे स्टेज उभे आहे तिकडे होणार आहे. आणि भायखळ्यावरून लाखो लोक आझाद मैदानाकडे चालत येत आहेत. हे ऐकताच उपस्थित तरुणांनी एकच कल्ला केला. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह अवर्णनीय होता. या दोन तासात बाळासाहेबांच्या विजयाच्या आणि संभाजी भिडेच्या मुर्दाबादच्या घोषणानी वातावरण दुमदुमून गेले होते.
एल्गार मार्च मध्ये कम्युनिस्टांचा सहभाग
या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेडस दिसले. मी ज्यावेळेस साताऱ्यात डीवायएफआय आणि माकपच (२००५ ते २०१०) काम करत होतो. तेंव्हा कम्युनिस्टानी जातीय प्रश्न हाताळावेत असे खूप वाटत होते. कित्येक वेळा कॉ. महाबळेश्वरकर सर यांच्याकडे हा विषय काढला. पण वर्गीय प्रश्न महत्वाचे समजणारा कम्युनिस्ट पक्ष त्यावेळी जातीय प्रश्न हाताळायला तितकासा तयार नव्हता. मी पक्ष सोडल्यानंतर मात्र कम्युनिस्टांच्या भूमिका बदलल्या. आणि आता कम्युनिस्ट लोक जातीय प्रश्न देखील हाताळू लागले आहेत. त्यामध्ये माकपचे कॉ. शैलेंद्र कांबळे आणि आणि कॉ. सुबोध मोरे हे प्रमुख भूमिकेत आहेत. आणि बाळासाहेबांच्या सोबत एल्गार मार्चच्या स्टेजवर आहेत हे पाहून खूप समाधान वाटले.
एल्गार मार्च मध्ये भाषणांना उत्स्फूर्त प्रतिसाद
एकामागून एक संघटना प्रमुख भाषणे करत होते. एवढे मोठे मैदान लोकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते. त्यामध्ये श्रीमंत कोकाटे यांनी ‘भिडेला अटक करत नसतील तर मुख्यमंत्री फडणवीसलाच अटक करा.’ अशी मांडलेली भूमिका. आणि त्यामुळे पडलेल्या प्रचंड टाळ्या. तर दुसऱ्या बाजूला ‘आम्ही लिंगायत धर्माचे आहोत. संभाजी भिडे म्हणतो तसे हिंदू नाही आहोत. आम्ही हिंदू नाही आहोत.’ असे लिंगायत धर्माच्या संघटनेच्या प्रमुखांनी केलेले वक्तव्य ऐकताच लोकांनी टाळ्यां आणि शिट्ट्यांनी सारे मैदान दणाणून सोडले. तर ‘पुढच्या मोर्चात निळ्या सोबत लाखो पिवळे झेंडे झळकतील.’ असे वक्तव्य धनगर संघटनेच्या प्रमुखांनी करताच सारे मैदान टाळ्यांनी कडाडून गेले. बाळासाहेब बोलण्यास उभे राहताच लोकांनी आनंदाने आणि उत्साहाने जे चित्कार काढले ते अवर्णनीय होते. तो उत्साह आणि बाळासाहेबांवरचा प्रचंड विश्वास खूप काही सांगून जात होता.
बाळासाहेबांच्या भाषणाला प्रचंड टाळ्या, शिट्ट्या
बाळासाहेबांचे एक वेगळेच रूप याठिकाणी पाहायला मिळाले. त्यांनी दिलेले हिटलरचे उदाहरण आणि मोदींशी केलेली तुलना, लोकशाही वाचवायची असेल तर मोदी मुक्त भारत करण्याची आवश्यकता, संभाजी भिडेंच्या मागे मोदीचा कसा हात आहे, भिडे कसा दोषी आहे, आणि कधी कुठल्या शेपटीवर पाय द्यायचा आणि मेलेली भुते कशी बाहेर काढायची हे आम्हाला चांगले माहित आहे. मोदींनी आमच्या नादी लागू नये. या त्यांच्या भाषणातील मुद्द्यांवर प्रचंड टाळ्यां आणि शिट्ट्यांचा कडकडाट होत होता.
शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांना भेट
त्यानंतर बाळासाहेब आणि १० जणांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेलं. सभा चालूच होती. बाहेर गावातून आलेले लोक. रणरणत्या उन्हात बसून सभा ऐकत होते. भुकेची वेळ होती. तहानेनी जीव व्याकुळ होत होते. जीवाला सावलीची गरज होती. तरीही लाखो लोक कशाचीही पर्वा न करता त्या उन्हात बसून होते. आणि वक्त्यांचा उत्साह वाढवत होते.
विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा
काही वेळानंतर शिष्टमंडळ आले. आणि त्यानंतरचे बाळासाहेबांचे भाषण पुन्हा एकदा तसेच तडफदार, अभ्यासू आणि कणखर. ते म्हणाले ‘८ दिवसात सरकारने भिडेला अटक करावी. आम्हाला पुन्हा एकदा यायला लावू नका. अन्यथा विधानसभेला घेराव घातल्या शिवाय राहणार नाही. पुढच्या वेळी याल तेंव्हा १० दिवसांच्या भाकरी घेवून या. यावेळी आम्ही पोलीसांच ऐकल. पण पुढच्या वेळेस इथे फक्त माझीच दादागिरी असेल.’ यावेळी देखील त्याच दमदार उत्साहाने जमलेल्या लाखो युवकांनी बाळासाहेबांना दाद दिली. समता सैनिक दलाने काम चोख बजावले. वर्तनात कमालीचा नम्रपणा आणि कर्तव्यतत्परता त्यांनी दाखवून दिली.
शहरी जातीयवाद
लोक भुकेने व्याकुळ होते. पण जातीयवादी दुकानदारांनी आपले फूड स्टॉल बंद ठेवले होते. हा देखील एक सामाजिक बहिष्काराच आहे. आणि एक प्रकारचा जातीयवादी अत्याचारच आहे. लोक जावून हॉटेल शोधून काढत आणि जेवून येत. काहीजणांनी सामोसा किंवा भेळ यावर समाधान मानलं. तेही बरेच शोधल्यावर नशिबी लागत होत. महानगर पालिकेने पाण्याचे टँकर दिले होते. त्यामुळे पाण्याची थोडी सोय होती. आता आपली आपल्यालाच सोय करावी लागणार हे जनतेनी ध्यानात घ्यावं. मुंबईने ते ६ डिसेंबरला दाखवलं, पुण्याने भीमा कोरेगावला दाखवलं आणि आता या मोर्चातही आपला जातीयवादी चेहरा या शहरांनी दाखवला.
तरुणाईची प्रचंड उर्जा, उत्साह, दृढनिश्चय आणि त्याग भावना
वास्तविक लोक विधानसभेला घेराव घालण्याच्या तयारीनेच आले होते. पूर्ण तयारीनिशी आलेले हे युवा अगदी निडर भासत होते. हे सर्व लोक अटक होण्याच्या तयारीने, दगडफेक झेलण्याच्या तयारीने, आणि पोलिसांच्या लाठ्या खाण्याच्या तयारीनेच आले होते. अगदी पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या खाण्याच्या तयारीनेही आले होते. बाबासाहेबांनी दिलेले संविधान आणि संवैधानिक अधिकार वाचवण्यासाठी, आपले आणि आपल्या भावी पिढ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून वाट्टेल तो त्याग करण्याच्या तयारीने प्रसंगी प्राण त्याग करण्याच्या तयारीने आले होते. त्यांच्या या कणखर दृढनिश्चयाला, प्रचंड उर्जेला, त्याग भावनेला माझा मानाचा जयभीम, लाल सलाम.
एल्गार मार्च : काही अतिउत्साही तरुण आणि व्यत्यय
काही अतिउत्साही तरुण मात्र सतत स्टेजवर जावू पहात होते. त्यांना सतत खाली जाण्यास सांगावे लागत होते. स्टेजला खेटून उभे राहणाऱ्याना दूर होण्यास सांगावे लागत होते. तिथे जवळपास २५ ते ३० लाउडस्पीकर (भोंगे) असलेले दोन टॉवर उभे होते. काहीजण त्याच्यावर चढून बसले. खाली येण्यास सांगूनही ऐकत नव्हते. शेवटी लाउडस्पीकर बंड पडला. ५ मिनिटांनी तो परत सुरु करण्यात आला. बाळासाहेबांना हिरवा शर्टवाले, टोपीवाले असे बोलत लोकाना दूर होण्यास सांगावे लागत होते. आणि हे सगळ वारंवार होत होत. त्याचं जरा वाईट वाटले. आपल्या काही लोकांचे लिसनिंग स्कील (ऐकण्याची क्षमता) फार कमी असल्याचे दिसून आले. स्वत:ला काय वाटतेय तेच काहीजण करायला बघत होते. आपल्याला नेत्याकडून किंवा संयोजकाकडून काय सूचना देण्यात आलेली आहे. आणि आपण कसे वागायला पाहिजे हेच त्याच्या लक्षात येत नव्हते.
प्रशिक्षणाची आवश्यकता
या तुलनेत मी अनेक आदिवासींचे मोर्चे पाहिलेले आहेत. त्यामध्ये सहभागी झालेलो आहे. नेत्यांनी सांगितलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन ते लोक करतात. मुंग्यांची रांग निघावी तसे त्यांचे मोर्चे निघतात. तर सभांमध्ये कसलाही गोंधळ किंवा उतावळेपणा ते करत नाहीत. जिल्हा / तालुका पातळी वरील नेत्यांनी मोर्चाला सभेला येण्यापुर्वीच योग्य त्या सुचना लोकांना द्यायला हव्यात. आपआपल्या एरियातील लोकांना स्थानिक नेत्यांनी नियंत्रणात ठेवायला हवे. पण त्याहीपलीकडे आपल्या तरुण पिढीचे लिसनिंग स्कील डेवलप व्हावे. यासाठी काही विशेष ट्रेनिंग संघटनेच्या माध्यमातून एरियाप्रमाणे आणि वेळोवेळी घ्यायला हवे.
एल्गार मार्च मध्ये हिजडा समाजास स्पेस देण्याची गरज
काही मुले, महिला घोषणा देत होती. ‘दुर्री तिर्री एक्का, संभाजी भिडे छक्का’. या घोषणाना लोकांकडून उत्स्फूर्त सहभाग मिळत होता. हास्याचे कारंजे उडत होते. पण एका शोषित, वंचित, दलित घटकाने आपल्यासारख्याच किंवा आपल्या पेक्षा जास्त शोषित, वंचित, उपेक्षित, बहिष्कृत समाजाला असे अपमानित करावे हे पटत नव्हते. ओरडून सांगावेसे वाटत होते. थांबवा या घोषणा. पण त्यासाठी ही वेळ योग्य नव्हती कदाचित. मी त्यांना थांबवण्यास सांगून भिडेला सहकार्य करत आहे अशीच त्यांची भावना त्यावेळी कदाचित झाली असती. पण यावर व्यापक प्रबोधनाची गरज आहे. स्वत:मधील ब्राह्मणीपणा देखील आपणास ओरबाडून, खरवडून काढून टाकावा लागणार आहे. अत्यंत शोषित, पिचलेला नाडलेला हिजडा समाजासही आंबेडकरवादाची गरज आहे. आणि ते आपल्या प्रवाहात सामील आहेत. पण त्यांना सामावून घेण्यासाठी आपणही स्पेस द्यायला हवी.
शिवराळपणा थांबवा
त्यानंतर भिडेला आई बहिणी वरून शिव्यांच्या घोषणाही ऐकू आल्या. आपण आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी झगडा करत आहोत. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची दाद मागत आहोत. अशा वेळी शत्रूच्या स्त्रियांना असे अपमानित करणे, शिव्या देणे हे आंबेडकरवादाची उंची कमी करणारे वक्तव्य आहे. लोकांनी आता दलित पँथरच्या शिवराळपणाला विसरावे आणि आंबेडकरवादाच्या मूळ स्वरूपाकडे वळावे असे मनोमन वाटते. संघटनांनी विविध प्रशिक्षणाद्वारे कार्यकर्त्यांना घडवायला हवे. कार्यकर्ता केडरबेस घडायला हवा. प्रत्येक केडरबेस कार्यकर्ता म्हणजे स्वत:च एक बाबासाहेबांचे रूप असायला हवे. इतके त्यास आपणास घडवावे लागेल.
एल्गार मार्च कडून अपेक्षा
या मोर्चा वेळी कदाचित आपणास विधानसभेवर घेराव घालण्यासाठी जावे लागणार आहे आणि आता सभेचे रुपांतर कदाचित मोर्चात होईल. कदाचित काही मुक्काम पडतील अशीही भावना काही व्यक्तींच्या मनात होती. आपण विधानसभेवर जाणार नाही हे शेवटपर्यंत घोषित करण्यात आले नाही. हळूहळू लोकांनीच ते समजून घेतले.
बाळासाहेबांनंतर कदाचित त्यांचा मुलगा त्यांची जागा घेईल. कदाचित माझे ज्ञान अपुरे असेल पण मला असे वाटते, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची स्पेस भरून काढणारी सेकंड विंग तितकीशी प्रभावी नाही. या सगळ्यावर प्रभावीपणे काम करावे लागेल.
एल्गार मार्चमध्ये आलेल्या लाखो लोकांच्या हातावर एखादे पत्रक ठेवायला हवे होते. बॅचची सोय करायला हवी होती. त्या पत्रकांच्या, बॅचच्या मागे सुचना, इमर्जन्सी नंबर इ. लिहून द्यायला हव्या होत्या. संवादासाठी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून घ्यायला हवा होता. असेही प्रकर्षाने जाणवले.
मोदीमुक्त भारत या सोबत EVM मुक्त भारत ही घोषणा देखील द्यायला हवी होती हे देखील प्रकर्षाने जाणवले. तर मित्रांनो हे होते माझे एल्गार मार्च विषयी अनुभव आणि विचार.
एल्गार मार्च : नवपेशवाईच्या अंतासाठी लाखोंची हाक
लेखक :
सचिन मोरे
संस्थापक :