जात

जात का नष्ट व्हायला हवी? : कारणमीमांसा

जात का नष्ट व्हायला हवी? : कारणमीमांसा

जातीअंत व्हावा यासाठी बरेच जण आपआपली भूमिका मांडत असतात. त्यावर कृती कार्यक्रम करत असतात. अनेक परिषदा, मेळावे, संगिनी, बैठका या विषयावर होत आहेत. होत राहतील. अनेक संघटना या विषयावर काम करत आहेत. यासाठी आपण याठिकाणी हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. की जात का नष्ट व्हायला हवी?

भारताचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी

भारताचा इतिहास पाहिल्यास प्राचिन काळापासून भारत हा परकीय सत्तेचा गुलाम राहिलेला आहे. सतत होणारी आक्रमणे आणि अपरिहार्यपणे येणारी हार व गुलामी. यास आपसातील फुट, विभाजन, परस्परातील द्वेष कारणीभूत राहिलेला आहे.

भारतीय लोक लढवय्ये, दणकट असूनही नगण्य बाबींवरुन भारतास अनेक वेळा गुलामी पत्करावी लागली. यास जात आणि वर्णव्यवस्थेवरील आधारीत समाज हे प्रमुख कारण आहे. शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही. आणि जाती व्यवस्थेमुळे हा देश कधी एक झाला नाही. सतत फुटीच्या राजकारणाला बळी पडत राहिला. ब्राह्मणांकडून वापरला गेला. आणि परकीयांचा गुलाम बनत राहिला. आता तरी किमान आपणास मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवायला हवे. त्यासाठी जात नष्ट व्हायला हवी.

सर्व जाती धर्माच्या लोकांचा समान विकास व्हावा यासाठी

या जाती व्यवस्थेमुळे माणसांचा विकास एकसारखा होत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शुद्र या चार वर्णांमध्ये ब्राह्मणी धर्म विभागलेला आहे.

ब्राह्मण हे पौरोहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करतात. तर क्षत्रिय हे लढाई करणे. आणि राज्य करणे. या स्वरूपाचे कार्य करतात. वैश्य हे व्यापार करतात. तर शुद्र हे मजूर म्हणून काम करतात. अर्थात ओबीसी आणि मराठा हे शुद्र आहेत. तर मारवाडी, बनिया, वाणी हे वैश्य आहेत. ब्राह्मणांनी उपनयन नाकारून क्षत्रियांना शुद्र बनवून घेतले आहेत.

अस्पृश्य, आदिवासी आणि भटके विमुक्त वर्ण व्यवस्थेच्या बाहेर आहेत. त्यांची अवस्था तर सर्वात बिकट आहे. दलित गाव कुसाबाहेर. आदिवासी जंगलात. तर भटके विमुक्त सतत भटकंती करत फिरत आहेत.

या सर्व विभागांमध्येही असंख्य जाती आहेत. या देशात जवळपास ६००० जाती आहेत. आणि या जाती आपसात रोटी बेटी व्यवहार करत नाहीत. परस्परांवर विश्वास ठेवत नाहीत. प्रत्येक जात स्वत:ला कुणापेक्षा तरी उच्च आणि कुणापेक्षा तरी नीच समजते. आणि या जाती परस्परांशी उच्चनीचतेच्या भावनेने व्यवहार करतात. यामुळे या एकत्र तर येत नाहीतच. पण उच्च जातींचा विकास वेगाने तर नीच जातींचा विकास मंदगतीने या देशात होत आहे.

अनेकांना तर आजही रानटी जीवन जगण्यास भाग पाडले गेले आहे. कित्येक जाती या चोर, गुन्हेगार ठरवल्या गेल्या आहेत. अस्पृश्यतेचा कलंक तर आपण सर्व जण जाणतोच. भारताला प्रगती पथावर न्यायचे असेल तर या देशातील सामान्य जनता विकसित व्हायला हवी. मात्र आजही दलित आदिवासी आणि भटकेविमुक्त यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. कुपोषणाचे प्रमाण प्रचंड आहे. हे थांबवायचे असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांचा समान विकास व्हायला हवा. पण कसा होणार? त्यासाठी जात नष्ट व्हायला हवी.

व्यक्ती स्वातंत्र्यासाठी

भारतीय समाज एका अदृश्य तुरुंगात वावरत आहे. माणूस हा जातीत बंदिस्त आहे. जात ही वर्णात बंदिस्त आहे. तर वर्ण हे ब्राह्मणी धर्मात बंदिस्त आहेत. या सर्वांवर ब्राह्मणांचे नियंत्रण आणि वर्चस्व आहे. यातून स्त्रियाही सुटलेल्या नाहीत. ब्राह्मण स्त्रिया देखील ब्राह्मण पुरुषांच्या धार्मिक नियमात बंदिस्त आहेत. ही बंदी कायम स्वरूपी रहावी. त्यातून कोणीही सुटू नये. यासाठी यामध्ये उच्चनीचता निर्माण केली आहे. की जेणे करून हे सर्व गुलाम लोक एकत्र येणार नाहीत. आणि बंड करणार नाहीत.

जर कोणी डोके वर काढण्याचा प्रयत्न केलाच. तर त्यांच्या पेक्षा उच्च जाती त्यांना तिथेच दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण कोणीच एक होत नाही. आणि झालेच तर जातीतल्या जातीत होतात. तिथेही स्त्री पुरुष असे भेद आहेत. जातींच्याही स्वत:च्या जातपंचायती आहेत. त्या जातीतील माणसांना स्वत:च्या नियंत्रणात ठेवत आहेत.

या देशात प्रत्येकाचा कोंडमारा होत आहे. प्रत्येकजण एकमेकांकडून मुस्कटदाबी सहन करत आहे. प्रत्येकाचाच श्वास घुसमटतो आहे. पण कोणी आवाज उठवत नाही. कारण प्रत्येक जण आपल्या पेक्षा नीच व्यक्तीची मुस्कटदाबी करण्यात धन्यता मानत आहे. आपणास असं वाटत नाही का की हे सगळं संपवायला हवं? जात नष्ट व्हायला हवी?

स्वाभिमानी जीवन जगता यावे यासाठी

या देशात ब्राह्मण पुरुष सोडले. तर कोणालाच स्वाभिमानाने जीवन जगता येत नाही. ब्राह्मणी धर्मानुसार प्रत्येकजण कोणापेक्षा तरी उच्च जरी असला. तरी कोणा ना कोणापेक्षा नीच आहे. प्रत्येकाचा स्वाभिमान त्याच्या पेक्षा उच्च माणसांकडून दुखावला जातो.

टप्प्याटप्याने खालच्या जातींना तर अक्षरश: नागवले जाते. त्यांचा स्वाभिमान धुळीस मिळवला जातो. एखाद्या जातीला अपवित्र समजून अस्पृश्य मानले जात असेल. आणि तिचा विटाळ मानून सतत अपमान केला जात असेल तर त्या व्यक्तीला जीवन जगणे किती असह्य होत असेल.

ज्या देशात ब्राह्मण सोडून इतरांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. वेद ऐकले तरी शूद्रांच्या कानात तापलेले शिसे ओतावे. बोलले तर जीभ छाटावी. आणि लिहिले तर हात छाटावेत. मृत्युदंड द्यावा. अशा शिक्षा होत्या. त्या देशात शूद्रांच्या स्वाभिमानाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या असतील. ब्राह्मण पुरुष कोणत्याही वर्णाच्या स्त्रीस भोगू शकतो. पण शुद्र पुरुष नाही.

ज्या देशात शिवाजीचा राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातील एकही ब्राह्मण तयार होत नाही. गागाभट्ट शिवाजी महाराजांकडून कोट्यावधी सोन्याच्या मोहरा घेतो. आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने त्यांचा राज्याभिषेक करतो. एका राजाची ही अवस्था असेल. तर सामान्य लोकांची काय असेल?

दलित, आदिवासी आणि भटके विमुक्तांचा स्वाभिमान ?

त्याही पलीकडे जे गाव कुसाबाहेर राहतात. आणि अपवित्र मानले जातात. ज्यांना थुंकी रस्त्यावर पडून रस्ता अपवित्र होऊ नये. म्हणून गळ्यात मडके बांधावे लागले असेल. आणि ज्यांच्या पावलांचे ठसे रस्त्यावर उमटू नयेत. म्हणून पाठीला झाडू बांधून फिरावे लागत असेल. त्यांच्या स्वाभिमानाचे काय झाले असेल?

ज्या भटक्या जमातींना रहाण्यास कुठेच जागा मिळाली नसेल. आणि तात्पुरता आसरा मिळावा. म्हणून हागणदारी साफ करून हागणदारीत रहावे लागले असेल. त्यांची काय अवस्था झाली असेल? गावातील उच्चवर्णीय लोक त्यांच्याकडे तुच्छतेने पहात असतील. आणि उच्चवर्णीय पुरुषांचे मनोरंजन व्हावे. म्हणून त्यांच्या स्त्रियांना चोळी घालण्याची परवानगी नसेल. तर त्यांची हृदये किती पिळवटून निघाली असतील. आपण आकर्षक दिसू नये. आणि गावकऱ्यांकडून बलात्कार होऊ नये. म्हणून त्यांच्या स्त्रियांना मुद्दाम अंघोळ न करता तोंडाला आणि अंगाला राख, माती चोळावी लागली असेल. तर त्या भटक्या स्त्री पुरुषांच्या मनाला कसे वाटले असेल?

ज्यांच्या पिढ्यानपिढ्या जंगलात गेल्या. ज्यांना नागरी सुविधांचा उपभोग हजारो वर्षापासून घेता आलेला नाही. ज्यांना शिक्षण, नागरी सुख सुविधा यांचा मागमोसही घेवू दिला गेला नाही. ज्यांना आदिवासी, वनवासी म्हणून हिणवले गेले असेल. तेंव्हा कसे वाटत असेल? रामायणाने तर त्यांना माकडे ठरवून टाकले. तेंव्हा त्यांच्या स्वाभिमानाचे काय झाले असेल?

पदोपदी अपमान आणि अवमान सहन करत जगण्यापेक्षा मेलेलं बरं. असंच तर त्यांना वाटत नसेल? तर आता जात का नष्ट व्हायला हवी? हे आपल्या लक्षात आले असेलच.

सामाजिक दर्जा उंचावावा यासाठी

वरील सर्व विवेचन पाहून भारतीय समाजाचा सामाजिक दर्जा किती खालावलेला होता किंवा आहे हे आपणास लक्षात आले असेलच. प्रत्येकाला असे वाटते की आपला सामाजिक दर्जा उंचावावा. पण काय ही जातीव्यवस्था त्याला त्याचा सामाजिक दर्जा उंचावण्याची परवानगी देते?

उलट पदोपदी त्याचा सामाजिक दर्जा कसा कमी होईल? याचाच प्रयत्न ती करत राहते. प्रत्येकाला वाटते की आपण शिकावे, मोठे अधिकारी व्हावे. चांगले घर बांधावे. चांगला पैसा कमवावा. चांगले कपडे घालून फिरावे. पण जर या देशात असे केले म्हणून मारहाण, खून आणि बलात्कार, नग्न धिंड, विष्ठा खाऊ घालणे. असे प्रकार होत असतील तर? काय खालच्या जातीची व्यक्ती सन्मानाने जीवन जगू शकेल? काय तिला आपला सामाजिक दर्जा इतरांच्या बरोबरीचा मिळावा. यासाठी प्रयत्न करता येतील? जर हे व्हायचं असेल तर काय व्हावं लागेल? तर आपल्या हे लक्षात आले असेलच की जात नष्ट व्हायला हवी.

आर्थिक उन्नत्ती व्हावी यासाठी

मनुस्मृतीप्रमाणे शूद्रांना संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाही. जर ओबीसीसाठी असे नियम असतील. तर या वर्ण व्यवस्थे बाहेरील लोकांची काय स्थिती असेल? धातूची भांडी वापरली. घराला कौले लावली. नवीन कपडे घातले. लग्नातील पंगतीत चपातीचे जेवण वाढले. घोड्यावर बसून नवरदेवाची मिरवणूक काढली. पायात चप्पल घातली. म्हणून जर या देशात शुद्र अतिशुद्राना मारहाण होत असेल. शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पन्नाचा ७५% वाटा ब्राह्मण (खोत) जमीनमालकाकडून म्हणून वसुलला जात असेल. तर मागास जातींची आर्थीक उन्नत्ती होणे शक्य तरी आहे काय? हे थांबवायचं असेल तर जात नष्ट व्हायला हवी.

धार्मिक दंगली होवू नयेत यासाठी

या देशात सर्व उच्च पदांवर ब्राह्मण विराजमान होऊन बसलेले आहेत. ते सतत एससी, एसटी, ओबीसी यांच्या विरोधात धोरणे राबवत असतात. आणि त्यांना आपल्या काबूत, मानसिक गुलामीत ठेवत असतात. त्यांची सतत नाडवणूक करत असतात.

निवडणुकांच्या वेळी मात्र मुसलमानांच्या विरुद्ध दंगली भडकावण्यासाठी त्यांना ही प्रजा लागते. हिंदू धर्म खतरेमे असा प्रचार करून धार्मिक दंगली भडकविल्या जातात. आणि स्वत:ला असुरक्षित समजू लागलेला मुस्लीम समाज मग कॉंग्रेसला मतदान करतो. त्यानंतर कॉंग्रेस पुन्हा या देशात ब्राह्मणवाद राबवते. यात मुस्लिमांचेही ती नुकसानच करते. म्हणून यावेळी मुस्लिमांनी भाजपला मते दिली. पण भाजप तर त्याहूनही अधिक घातक आहे.

हे सगळे थांबवायचे असेल तर एससी, एसटी आणि ओबीसी समुदायास ब्राह्मणी गुलामगिरीतून सोडवावे लागेल. आणि मुस्लीमांसोबत जोडून पर्याय उभा करावा लागेल. तरच या धार्मिक दंगली कायमच्या संपुष्टात येतील. पण हे कसे होणार? त्यासाठी जात नष्ट व्हायला हवी.

राष्ट्रीय एकात्मतेसाठी

भारत देश विविधतेमध्ये एकता यासाठी ओळखला जातो. पण जातीमध्ये विविधता आढळून येण्यापेक्षा विषमता आढळून येते. आणि जातीजातींमध्ये असलेली स्पर्धा, तेढ, परस्पर अविश्वास, प्रेमाचा अभाव, एकमेकांचा द्वेष यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला सातत्यपूर्ण धोका निर्माण होतो. जिवंत स्वरुपाचा हा ज्वालामुखी सतत आतल्या आत धुमसत राहतो. त्यामुळे दंगली भडकतात. जर हे थांबवले गेले नाही तर या देशात अराजकता माजून देशाचे तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी हे सांगण्याची गरज नाही की, आता जात नष्ट व्हायला हवी.

दलित अत्याचार थांबवण्यासाठी

फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार आणि अनेक समाज सुधारकांनी जात नष्ट व्हावी यासाठी खूप काम केलेलं आहे. तरी अजूनही जात नष्ट होत नाही. या जातीचं सर्वात विषारी रूप आपणास दलित अत्याचारांमध्ये पहाण्यास मिळते. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना जेंव्हा कानावर येतात. तेंव्हा आपण कोणत्या युगात जगात आहोत? कोणत्या देशात रहात आहोत? कोणत्या माणसांबरोबर रहात आहोत? असा प्रश्न पडतो.

अत्यंत क्रूर आणि पाशवीपणे दलितांचे खून, बलात्कार केले जातात. त्यांच्या घरांची / गाड्यांची / सामानांची / प्रतीकांची तोडफोड आणि जाळपोळ. नग्न धिंड. मानवी विष्ठा, मुत्र खाण्यापिण्याची केलेली सक्ती. गाडीला बांधून फरफटत नेणे. आणि चाबकाने, दांडक्याने फटके मारणे इ. प्रकार पाहिले की ज्या जातीच्या आधारावर दलित, दुबळ्या दलित घटकांवर हे अत्याचार होत आहेत. ते अत्याचार कायमचे नष्ट करण्याची भावना उफाळून येते. आणि जर ते अत्याचार कायमचे नष्ट व्हायचे असतील तर  जात नष्ट व्हायला हवी.

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी

भारतात अनेक वेळा दलित सवर्ण, हिंदू मुस्लीम दंगे होतात. जाती – जातींमध्ये तेढ, द्वेष, अविश्वास निर्माण होवून त्याचे रुपांतर हिंसक दंगलींमध्ये होते. किंवा बहुसंख्याकांकडून अल्पसंख्य जातीस अत्याचारास बळी पडावे लागते. याविरोधात मोर्चे निघाले तर अशा मोर्चांवर सवर्णांचा हल्ला होतो. त्यानंतर दंगली भडकतात. अनेकांचे खून आणि मारामाऱ्या होतात. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होते. यामुळे कायदा सुव्यवस्थेची मोडतोड होवून पोलिस यंत्रणेवरचाही ताण वाढतो.  आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी सुद्धा जात नष्ट व्हायला हवी.

ब्राह्मणवाद कायमचा नष्ट करण्यासाठी

या सर्व शोषण आणि गुलामीस, प्रचंड अपमानास आणि दारीद्र्यास केवळ ब्राह्मणवाद जबाबदार आहे. आणि हा ब्राह्मणवाद अवलंबून आहे जाती व्यवस्थेवर. उच्चनिचतेच्या उतरंडीवर. ही उतरंड जर कायमची फोडायची असेल. आणि सर्व माणसे समान करायची असतील. खऱ्या अर्थाने ब्राह्मणी गुलामीतून स्वतंत्र करायची असतील. या देशात बंधुता नांदायची असेल. तर  जात  नष्ट व्हायला हवी.

साम्यवादाच्या प्रस्थापनेसाठी

मार्क्स म्हणतो ‘ जगातील कामगारांनो एक व्हा!’ मात्र प्रश्न उभा राहतो. जगातील कामगार एक होतील का? भारतीय परिप्रेक्षात पहायचे झाले. तर भारतात असणाऱ्या हजारो जाती, वर्णव्यवस्था, त्यामध्ये असणारी उचनिचता, स्पृश्यास्पृश्यता तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक इ. बाबतीत असणारी विषमता, शोषण हे पाहता कामगारांमध्ये आपसात जातीवरून तेढ, द्वेष, उचनिचता, विषमता जोपर्यंत टिकून आहे. तोपर्यंत भारतातील कामगार एकजूट होतील असे वाटत नाही.

जोपर्यंत कामगार वर्ग एक होत नाही तोपर्यंत मार्क्सला अपेक्षित क्रांती यशस्वी होऊ शकणार नाही. परिणामी साम्यवादाची प्रस्थापना होणार नाही. आणि झालीच तरी ती क्रांती फार काळ टिकू शकणार नाही. यासाठी जातीअंत होणे अत्यंत आवश्यक आहे.

Image Source : https://www.flickr.com/photos/laurentbourrelly/18281604125

जात का नष्ट व्हायला हवी? : कारणमीमांसा
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *