जाती निर्मुलन

जाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी

जाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी

जाती निर्मुलन हे संस्था संघटनांसाठी खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. फार मोठ्या प्रमाणात प्रबोधन, विविध सामाजिक प्रकल्पांची अंमलबजावणी, लढे आंदोलने, शासन आणि समाजाशी संवाद. अशा विविध पातळ्यांवर सामाजिक संस्था आणि संघटना काम करत असतात. आपणास या लेखामध्ये जाती निर्मुलन या विषयावर चर्चा करायची आहे. तर मग चला तर पाहूयात. कोणकोणते असे प्रकल्प आहेत. जे केल्यामुळे जाती निर्मुलन होण्यास गती प्राप्त होऊ शकते.

आंतरजातीय विवाह नोंदणी केंद्र

आजच्या काळात लोकांनी फार मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर केले आहे. त्यामुळे स्वजातीचे पतीपत्नी मिळणे मुश्कील झाले आहे. अशा वेळी लोक विवाह नोंदणी केंद्राचा सहारा घेतात. मात्र तिकडे देखील चांगले वधू वर मिळणे अवघड झाले आहे. कारण शिक्षण घेत असताना वाढलेले वय, उच्चशिक्षण आणि मोठ्या पगाराची नोकरी करत असताना. त्याअनुरूप स्वजातीय पती किंवा पत्नी मिळेलच याचा काही भरोसा नाही.

त्यापेक्षा अनुरूप स्वरूपाचा आंतरजातीय जोडीदार मिळाला. तर त्यास स्वीकृती मिळत आहे. अनेक चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांना आंतरजातीय विवाहाचे महत्व पटलेले आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाहेच्छूक तरुणांची नोंदणी करणे. आणि त्यांना योग्य जोडीदार मिळवून देण्यास मदत करणे आवश्यक आहे. असे कार्य जर एखाद्या संस्थेनी निवडल्यासजाती निर्मुलन करण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.

धम्म प्रसार

जाती निर्मुलन होण्याकरिता ब्राह्मणी धर्माचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ब्राह्मणी धर्म हा जातीव्यवस्था अधिक बळकट करतो. आणि बुद्ध धम्म हा समतेचा पुरस्कर्ता असल्याने जाती अंताच्या दृष्टीने फार उपयोगी आहे. म्हणून संस्थांनी जर धम्मप्रसाराचे कार्य हाती घेतले तर ते जात नष्ट करण्यासाठी महत्वाचे साधन ठरू शकते. यासाठी काही पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची त्यास आवश्यकता असेल. गावोगावी भाषणे करणे. पत्रके वाटणे. ग्रंथालये उभी करणे. शाळा चालविणे. हॉस्पिटल्स चालविणे. बुद्ध विहारांची स्थापना करणे. असे कार्य ते करू शकतात.

शिक्षण

शिक्षणाचे महत्व तर आपण जाणतोच. शिक्षणामुळे माणसाला विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मागास जाती, भटक्या जाती, दुर्गम भागातील आदिवासी जमाती या आजदेखील शिक्षणापासून वंचित आहेत. जर त्यांच्या मुलांना शिक्षण मिळाले. तर त्यांच्या पिढ्यांपिढ्यांचा उद्धार होऊ शकतो. त्या जाती इतर जातींच्या बरोबरीला येवून पोहोचल्यास. आंतरजातीय विवाहां द्वारे एकमेकात विलीन होऊन जात नष्ट होऊ शकते. त्यासाठी काही संस्थांनी शिक्षण क्षेत्रात काम करून वंचितांच्या मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करणे. जाती निर्मुलन च्या  दृष्टीने आवश्यक आहे. तसेच अशा शाळातून जाती अंतास पूरक असे खेळ, उपक्रम, संस्कारवर्ग इ. घेतले गले. तर जाती निर्मुलन च्या दृष्टीने पुढची पिढी तयार होऊ शकते.

व्यवसाय प्रशिक्षण आणि करियर गायडन्स

स्वजातीचे परंपरागत व्यवसाय त्यागून अन्य जातींचे व्यवसाय स्वीकारल्याने वर्गीय दृष्ट्या जाती एकमेकात मिसळून जावू शकतात. आणि जात ही वर्गात बंदितून बाहेर येवून मुक्त होवू शकेल. यासाठी अशा प्रकारे स्व जातीच्या पेक्षा वेगळे व्यवसाय जे करू इच्छितात. अशा व्यक्तींना योग्य प्रकारचे करियर विषयक मार्गदर्शन, व्यवसाय प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. संस्थेमार्फत अशा स्वरूपाचे कार्य केल्यास जाती निर्मुलन होण्यास मदत होऊ शकते.

कायदेविषयक सल्ला व मदत केंद्र

आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्याना कायदेविषयक सल्ला व मदत लागते. तसेच  जातीय प्रश्न ज्या भागात उद्भवले आहेत. अशा ठिकाणी देखील लोकांना कायदेविषयक सल्ला व मदत लागते. जर मोफत कायदेविषयक सल्ला देण्याचे कार्य केले गेले. तर जाती मुळे जे लोक लोक पिडीत आहेत. त्यांना मोठी मदत मिळू शकते. आणि जाती निर्मुलन च्या दृष्टीने हे फार मोठे कार्य होऊ शकते.

जोडप्यांना संरक्षण

आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्यांच्या जीवाला सतत धोका असतो. त्यांचे आईवडील, नातेवाईक आणि मित्र त्यांना कधीही मारहाण करू शकतात. प्रसंगी जीव घेवू शकतात. मागास मुलाच्या आईवडिलांच्या जीवासही धोका होऊ शकतो. यासाठी अशी जोडपी आणि यामध्ये ज्यांच्या जीवाला धोका आहे. अशा सर्व व्यक्तींना योग्यप्रकारे संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये प्रेमवीर मोठ्या प्रमाणात अडचणीत असतात. अशा प्रेमवीरांना संरक्षण मिळणे. त्यांच्या जिवंत राहण्याच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण असते.

बऱ्याचदा यामध्ये पोलीस योग्य प्रकारे साथ देतीलच असे सांगता येत नाही. म्हणून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविणे. आणि त्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती तजवीज करणे महत्वाचे असते. जर असे कार्य जर एखाद्या संस्थेनी केले.तर ते कार्य जाती निर्मुलन च्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकते.

अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्ती

अंधश्रद्धा आणि व्यसन यामुळे व्यक्तीची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होते. जो पैसा कुटुंबाच्या भरण पोषणासाठी आवश्यक होता. मुलांच्या शिक्षण आणि कुटुंबाच्या प्रगती साठी आवश्यक होता. तो पैसा अंधश्रद्धा आणि व्यसनाच्या मार्गे नष्ट होऊन व्यक्तीचा आर्थिक ऱ्हास होतो. आणि त्यामुळे त्या कुटुंबाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक हानी होते. तसेच अंधश्रद्ध व्यक्ती प्रस्थापित धर्म व्यवस्थेची गुलाम असते. त्यामुळे अशी व्यक्ती जाती निर्मुलन च्या क्रियेत विरोधी भूमिकेत असते. एव्हाना जातीवादी आणि धर्मांध संस्था अशा व्यक्तींना सहजपणे आपल्या जाळ्यात ओढतात.

मागास वर्गीय जातीमध्येच व्यसन आणि अंधश्रद्धेचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे एखाद्या संस्थेनी जर अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले. तर मागास जातीची उन्नती होण्यास मदत होते. त्यामुळे अशी कुटुंबे उच्च जातींच्या बरोबरीला येण्यास सहकार्य होते. तसेच त्यामुळे जाती निर्मुलन होण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती होऊ शकते.

शहरात स्थलांतर करू इच्छिणाऱ्या तरुणांना मदत

बाबासाहेबांनी शहराकडे चला ही हाक मागास जातींच्या उन्नत्ती साठी आणि जाती निर्मुलन करण्यासाठी दिली होती. अनेक मागास जातींचे तरुण तरुणी शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात स्थलांतरित होऊ इच्छितात. मात्र त्यांना शहरात राहण्यास मोठी अडचण होते. महागडे जेवण, आणि अन्य खर्च त्यांना परवडत नाही. त्यामुळे नाईलाजाने निराश होऊन त्यांना परत गावाकडे फिरावे लागते.

यासाठी एखाद्या संस्थेनी मोफत हॉस्टेल व जेवणाची सोय केली. ही सोय फक्त विद्यार्थीदशेतील आणि नोकरीसाठी प्रयत्न करणारे मागासवर्गीय तरुण तरुणींना सेवा देण्यापुरती मर्यादित ठेवली. आणि त्यासाठी नोकरी लागल्यावर ठराविक रक्कम दान देण्याची अट ठेवली. तर स्वउन्नत्ती साधने मागासवर्गीय युवकांना सोपे होऊ शकते. आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्याप्रमाणात शहराकडे स्थलांतर घडून जाती निर्मुलन च्या दृष्टीने मोठे पाऊल पडू शकते.

झोपडपट्टी सुधार योजना राबविणे

झोपडपट्टीतील लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. गरिबी, घाण, शिक्षणाच्या असुविधा, आरोग्याच्या असुविधा, असुरक्षितता, बेकायदेशीर उद्योग, गुंडागर्दी, व्यसन, अंधश्रद्धा इ. या समस्यांवर उपाय करणाऱ्या छोट्या छोट्या संस्था झोपडपट्ट्यामध्ये आवश्यक आहेत. येथे राहणाऱ्या लोकांचे दु:ख दूर करण्यात अशा संस्था मोठी मदत करू शकतात.

छोटी कर्जे देणे, रोजगार देणे, मुलांचे क्लासेस घेणे, दवाखाने चालविणे, मुलांचे डे केअर सेंटर चालविणे, व्यसनमुक्ती केंद्र चालविणे, जाणीव जागृती व्याख्याने आणि शिबिरे आयोजित करणे, मुलांना मोफत वह्या पुस्तके वाटप करणे, गरीब आणि होतकरू मुलांना स्कॉलरशिप देणे, इ. स्वरूपाचे कार्य केल्यास मागास जातींना स्वउद्धार साधने सोपे होऊ शकेल आणि त्यामुळे हे कार्य जाती निर्मुलन च्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरू शकेल.

विशेषत: झोपडपट्टीमध्ये राहणारा मोठा वर्ग हा मागास वर्गातूनच आलेला असतो. त्यांची उन्नत्ती होऊन त्यांना इतरांच्या बरोबरीला घेवून जाण्याचे कार्य करणे. हे जाती निर्मुलन च्या दृष्टीने मौल्यवान ठरू शकते.

जातपंचायती विरोधात लढा उभा करणे

आज महाराष्ट्रात जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र तरीही कित्येक जाती या जात पंचायती भरवतात. आणि या जातपंचायती परंपरागत नियम लावून व्यक्तींचे जीवन नरकमय करून टाकतात.मोठ्या रकमेचे दंड किंवा बहिष्कार हे त्यांचे हुकमी एक्के आहेत. भारतीय राज्यघटना आणि भारतीय कायद्यांना आणि न्याय व्यवस्थेला सरळ सरळ हरताळ फासला जातो. आणि व्यक्तींवर मोठा अन्याय केला जातो. त्यापुढे घायाळ होऊन लोक पंचांच्यापुढे  अक्षरश:  नतमस्तक होतात. अशा जात पंचायतीच खरेतर जात अधिक बळकट करतात.

आणि या जातपंचायती विशेषकरून मागास जातीतच जास्त करून चालतात. आणि त्यामुळे व्यक्ती मुक्त जीवन जगू शकत नाही. स्वत:चा उद्धार करून इतर जातींच्या बरोबरीला जावू शकत नाही. यासाठी या क्षेत्रात मोठे कार्य उभे राहणे अति आवश्यक आहे. जर काही संस्थांनी या कार्यात पुढाकार घेतला. तर जाती निर्मुलन होण्यास तो मोलाचा सहभाग ठरू शकतो.

बचतगट आणि मायक्रो फायनान्स

आपणास आश्चर्य वाटेल, पण बचतगट आणि मायक्रो फायनान्स जाती निर्मुलन च्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरू शकते. घरातील आजारपणे, शिक्षणाचा खर्च, लग्न, व्यावसायिक अडचणी आणि अनेक बाबींसाठी माणसास छोट्या रकमेची गरज भासते. पण वेळेवर ती रक्कम न मिळाल्यास व्यक्ती किंवा कुटुंबाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. तसेच भाजीवाले, टपरीवाले यांना सतत छोट्या भांडवलाची गरज भासते. ती गरज या माध्यमातून भरून निघू शकते. यासाठी छोटी छोटी कर्जे कमी व्याजदराने जर त्यास उपलब्ध झाली. तर व्यक्ती सावकाराच्या विळख्यातून स्वत:ला वाचवू शकते.

म्हणूनच बचतगट आणि मायक्रो फायनान्स हे मागास जातीतील व्यक्ती आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नत्तीस महत्वपूर्ण भूमिका निभाऊ शकते. विशेषत: झोपडपट्ट्या आणि मागास वस्त्यातून हे कार्य स्वयंसेवी संस्थांनी सुरु केल्यास. जाती निर्मुलन च्या दृष्टीने ते एक महत्वपूर्ण पाऊल ठरू शकते.

ग्रंथालये

जाती निर्मुलन चे कार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांना पुस्तकांची गरज भासते. जाती निर्मुलन साठी आवश्यक बौद्धिक खुराक हा ग्रंथातूनच मिळू शकतो. शिवाय दैनंदिन चळवळीच्या कार्यात ग्रंथच कार्यकर्त्याला दिशा दाखवितात. मात्र प्रत्येक कार्यकर्त्याना ग्रंथ विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून जर एखाद्या संस्थेनी ग्रंथालय स्थापन केल्यास. असे ग्रंथालय जाती निर्मुलन चे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यास फार उपयोगी पडू शकते.

हॉस्पिटल / दवाखाने

जर काही संस्थांनी हॉस्पिटल सुरु केले आणि त्या ठिकाणी आंबेडकरवादी डॉक्टर, नर्स कामास ठेवल्या. तर कळत नकळत जाती निर्मुलन चे संस्कार रुग्णांवर होऊ शकतात. कारण आरोग्याच्या बाबतीत लोक घाबरलेले असतात. आणि अंधश्रद्धांचा सहारा घेतात. जर हॉस्पिटल स्टाफ मुळे माणसे अंधश्रद्धा पासून परावृत्त होऊ लागली. तर अशी विवेकी माणसे आपसूकच जाती निर्मुलन च्या दृष्टीने योग्य भूमिका स्वीकारू शकतात.

पुस्तक प्रकाशन

जाती निर्मुलन च्या दृष्टीने पुस्तके फार मोलाची भूमिका निभावतात. वाचकांना उपलब्ध व्हावीत म्हणून कमी किमतीत चांगली पुस्तके छापणाऱ्या संस्थांची फार गरज आहे. त्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. फुले, शाहू आंबेडकर आणि अन्यजाती निर्मुलन ची भूमिका मांडणाऱ्या लेखकांची पुस्तके छापून वितरीत करणे हे जाती निर्मुलन च्या दृष्टीने फार महत्वाचे कार्य आहे.

प्रसार माध्यमे

प्रस्थापित प्रसारमाध्यमे मग ती वर्तमानपत्रे असोत किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमे असोत. सर्व माध्यमे ही जातीयवाद्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे त्या माध्यमातून जात बळकट करणाऱ्या बाबींचा प्रचार प्रसार होतो. या पार्श्वभूमीवर जाती निर्मुलन ची भूमिका मांडणारी प्रसार माध्यमे उभी राहणे आवश्यक आहे. काही संस्थांनी असा प्रयत्न करणे भविष्यात फार महत्वाचे ठरू शकते.

पर्यटन संस्था

बुद्ध, अशोक, फुले, शाहू, आंबेडकर आणि अशा अगणित जाती निर्मुलन ची भूमिका घेणाऱ्या महापुरुषांच्या स्मारक, विहारे, स्तूप, लेण्या, ठिकाणे यांना भेट देण्याने व्यक्तींमध्ये प्रेरणा जागी होते. पर्यटनावरून आल्यानंतर अशा व्यक्ती जाती निर्मुलन च्या कार्यात झोकून देतात. तसेच ठोस आणि प्रखर भूमिका घेतात असा अनुभव आहे. म्हणूनच अशा स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटन संस्था उभ्या राहणे. हे जाती निर्मुलन च्या दृष्टीने महत्वपूर्ण कार्य आहे.

अभ्यासवर्ग

जाती निर्मुलन च्या दृष्टीने पाली, ब्राह्मी भाषा शिकण्याचे वर्ग चालविणे. आंबेडकर विचारांचे कोर्सेस चालविणे. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर प्रशिक्षण भरविणे. भाषणे, चर्चासत्र आयोजित करणे. नाटके / सिनेमे प्रदर्शित करणे इ. स्वरूपाचे कार्य करणारे अभ्यासवर्ग. एखाद्या संस्थेनी चालविल्यास ते जाती निर्मुलन च्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.

संशोधन केंद्र

विविध जाती आणि समाजातील स्तरांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अभ्यास होणे फार आवश्यक आहे. असा अभ्यास अन्य संस्था आणि शासनास तसेच कार्यकर्त्यास जातीअंताच्या कार्यात मदत करू शकतो. असे संशोधन चळवळीला योग्य दिशा देवू शकते. विविध प्रकारचे सर्वे, फोकस ग्रुप डिस्कशन, आणि अन्य माध्यमातून शास्त्रीय आधारावर संशोधन करण्याची फार मोठी गरज आहे. मुळात जाती निर्मुलन या माध्यमातून विचार करून फार कमी संशोधन होते. ही कमी जर संस्थेनी भरून काढली तर ते महत्वपूर्ण कार्य ठरू शकते.

सहकारी संस्थांची निर्मिती

काही संस्थानी मागासवर्गीय लोकांची सहकारी संस्था निर्माण तर जाती निर्मुलन साठी ते फार फायदेशीर ठरू शकते. सहकारी संस्था मार्फत पतसंस्था, उद्योग व्यवसाय, शेती, विविध स्वरूपाचे छोटे बझार किंवा मॉल इ. अनेक उपक्रम सुरु करता येवू शकतात. यामुळे आर्थिक बाबतील मागास घटकातील लोक सक्षम होण्यास मदत होऊ शकते. शिवाय रोजगार निर्मिती देखील होऊ शकते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील त्यास घेता येऊ शकतो.

गृहनिर्माण संस्था

मागासवर्गातील अनेक लोक बेघर आहेत. किंवा झोपडपट्टीत राहण्यास मजबूर आहेत. आणि या झोपडपट्ट्या अनधिकृत असून कोणाच्या तरी खाजगी जागेवर किंवा सरकारी जागेवर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत जर शासनाने किंवा जागा मालकाने त्यास हुसकून लावले तर लोकांचे फार मोठे हाल होऊ शकतात.

यासाठी जर त्यांनी गृहनिर्माण संस्था रजिस्टर केली असेल. तर अशा संस्थेस शासन राहण्यासाठी जागा किंवा घरे पुरवू शकते. तसेच या संस्थेस कर्ज मिळू शकते. त्याद्वारे संस्था घरे बांधू शकतात. आणि संस्थेच्या सभासदांना वितरीत करून घरांचा प्रश्न सोडविण्यास मदत होऊ शकते. आणि अशा रितीने मागास जातींना उच्च जातींच्या बरोबरीला आणता येवू शकते. हे कार्य देखील जाती निर्मुलन च्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.

बाल संस्कार वर्ग

लहान मुलांवर आपण जे संस्कार करतो. तेच आयुष्यभर मुलांची साथ देतात. यासाठी कोवळ्या वयातच जाती निर्मुलन बाबत आणि बुद्ध, आंबेडकरांच्या विचारांबाबत मुलांवर संस्कार झाल्यास पुढची पिढी देखील तशीच निर्माण होऊ शकते. यासाठी संस्थांनी बाल संस्कार वर्ग सुरु करणे महत्वाचे ठरू शकते.

जाती निर्मुलन उपाय – संस्था संघटनांसाठी
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *