जातीअंतासाठी अनुकूल बाब

जातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण

जातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण

जातीअंतासाठी अनुकूल बाब समजून घेताना भांडवलशाही मुळे व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक, आणि भौगोलिक जीवनात झालेले बदल यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हा बदल जातीअंतासाठी अनुकूल बाब कसा ठरत आहे. हे आपण या ठिकाणी पहाणार  आहोत.

भांडवलशाही कारखानदारी

प्रगत कारखान्यांच्या माध्यमातून उत्पादन सुरु झाल्यामुळे अनेक जातीआधारीत व्यवसाय बंद पडत आहेत. व सदर जातीच्या व्यक्तीना अन्य व्यवसायांकडे वळावे लागत आहे. प्लास्टीकचा आणि इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वाढत्या उत्पादन व वापरामुळेही जातीअंतास पूरक अशी पार्श्वभूमी निर्माण झाली आहे. उदा. मिक्सर आल्यामुळे वाटा, वरवंटा बनविणारे वडार, प्लास्टिक वस्तूंमुळे बांबूच्या टोपल्या विणणारे कैकाडी, नायलॉन मुळे दोरखंड विणणारे मांग, तसेच यांत्रिकीकरणामुळे सोनार, सुतार, लोहार, कुंभार इ. च्या व्यवसायांवर परिणाम होत आहे. त्यांना आपले व्यवसाय सोडून अन्यत्र वळावे लागत आहे. ही जातीअंतासाठी अनुकूल बाब आहे.

कारण जात म्हणजे बंदिस्थ वर्ग. या जातीमध्ये बंदिस्थ असलेल्या माणसास त्या जातीचा वर्ग देखील बांधूनच ठेवतो. यासाठी जेंव्हा हे व्यवसाय बंद पडत आहेत. तेंव्हा अन्य व्यवसाय किंवा नोकरी कडे लोक वळत आहेत. यांचा आणि त्यांच्या जातीच्या वर्गाचा काहीही संबंध राहत नाही. त्यामुळे काही अंशी ते मुक्त झाले आहेत. आणि अन्य जातींचे व्यवसाय स्वीकारत आहेत. त्यामुळे वर्गीयदृष्ट्या या जाती भिन्न भिन्न जातींच्या जवळ येवू लागल्या आहेत.

शेतीचे भांडवलीकरण, बाजारीकरण, कंपनीकरण

शेतीचे आधुनिकीकरण, नफ्यावर आधारीत शेती व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, वाढता भांडवली खर्च, बाजार आधारित शेती इ. बाबींमुळे छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही.  तरूण वर्ग शेतीकडे पाठ फिरवीत आहे. शिक्षणाची आणि शहरातील नोकरीची वाट धरू लागला आहे. दुसऱ्या बाजूला शेतकरी कर्जबाजारी होवून मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागला आहे. शेतीचे कंपनीकरण होणे. ही अटळ बाब बनत आहे. हजारो एकर जमिनीवर यंत्राद्वारे शेती करण्याचे दिवस आता फारसे दूर नाहीत.

वाढत्या शहरीकरणा सोबत जातीसंस्था कोमेजताना…

ज्या देशात ८०% लोक खेड्यात रहात आणि शेतीवर आधारीत होते. त्यापैकी आज केवळ ५० %  लोक खेड्यात राहून शेती करत आहेत. मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर झाले आहे. दिवसेंदिवस स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे. यामुळे गावे ओसाड पडत आहेत. अनेक गावात केवळ वृद्ध लोक राहत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कारण तरुण वर्ग आपल्या बायका मुलांसह शहरात स्थलांतरीत झाला आहे.
जे तरुण अल्पशिक्षित आहेत तेच केवळ खेड्यात राहत असून दिवसेंदिवस त्यांमध्ये वैफल्यग्रस्तता वाढत असल्याचे दिसून येत आहे. जातीव्यवस्था ही शेती, जमीन आणि खेडी आधारीत आहे. आज खेड्यांसोबत व शेतीसोबत जातीसंस्था कोमेजत असताना दिसून येत आहे. त्यामुळे वाढते शहरीकरण हे जातीअंतासाठी अनुकूल बाब आहे.

कालचा अल्पभूधारक आजचा गुंठापती

शहरानजीकची खेडी आज उपनगरांमध्ये समाविष्ट होत आहेत. कालपरवापर्यंत अल्पभूधारक शेतकरी जो गरीब व मजुरी करणाऱ्या वर्गात होता. तो देखील शेती विकून गुंठापती म्हणजेच करोडपती झाला आहे. मोठमोठे बंगले, चारचाकी गाड्या, सोने इ. घेताना दिसत आहे. शहरी राजकारणावर प्रभाव टाकत आहे. तसेच खेड्यातली जमीन स्वस्तात खरेदी करत आहे. त्या शेतीत आधुनिक पध्दतीने आणि यंत्राद्वारे बागायती शेती करू लागला आहे. या शहरीकरणामुळे त्याचा वर्ग बदलून गेला आहे. त्यामुळे ही जातीअंतासाठी अनुकूल बाब आहे.

जंगल क्षेत्र कमी झाल्यामुळे…

विविध ठिकाणची धरणे, खाणींचे काम, जंगलतोड व शहरीकरण वाढत चालले आहे. यांमुळे जंगल क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे जंगलातील माकडे व डुकरे शेतीचे नुकसान करत आहेत. शेती पाडून ठेवण्याशिवाय अनेक गावात पर्याय उरला नाही. त्यामुळे शेती विकून पैसा करण्याकडे, मुलाला शिक्षण व नोकरीसाठी पैसा उभा करण्याकडे ग्रामिण शेतकरी वळू लागला आहे. एकप्रकारे जातीव्यवस्थेचा आर्थिक पाया ढासळत चालला आहे. अशाप्रकारे गावांचे विस्थापन हे जातीअंतासाठी अनुकूल बाब आहे.

आर्थिक दरी कोसळताना…

यामुळे दलित सवर्णामधील आर्थिक दरी कोसळून पडत आहे. परिणाम स्वरूप खेड्यातील सवर्ण शेतकरी  वैफ़ल्यग्रस्त बनत आहे. आणि आपल्या संकटास तो दलितांना जबाबदार धरत आहे. शिक्षणामुळे दलितांमध्ये होणारी सामाजिक आर्थिक प्रगती तो पहात आहे. त्याच वेळी स्वत:ची आर्थिक दुर्गती तो पाहत आहे. यामुळे उद्विग्न होऊन तो प्रगती करणाऱ्या दलितांवर हल्ले करताना दिसत आहे. दलित अत्याचाराचे  प्रमाण वाढलेले दिसत आहे. तरी देखील ही परिस्थिती जातीअंतासाठी अनुकूल बाब आहे. कारण आर्थिक स्तर समान झाल्यास हितसंबधही एकसारखे होवू लागतील. व त्याचे परिणाम स्वरूप काही काळातच दलित सवर्ण मैत्री, प्रेम व सोयरिक वाढत जाईल.

शहरातील वर्गीय बदल…

गुंठापती कसे श्रीमंत बनत आहेत हे आपण वर पाहिलेच. त्याच प्रमाणे ज्यांची शहरातील घरे पूर्वी झोपडी वजा किंवा कच्च्या स्वरुपाची होती. त्यांना ती घरे बिल्डरला विकून त्या जागेवर मोठमोठ्या बिल्डींग व अपार्टमेंट बनली किंवा बनत आहेत. बिल्डर जागा मालकास पैसे, राहण्यास Flat (घर) इ. देत आहे. आलेल्या पैशातून गाडी, उंची फर्निचर, सोनेचांदी मध्ये  सदर व्यक्ती गुंतवणूक करत आहे. काहींनी स्वतंत्र व्यवसायांमध्येही पैसे गुंतविले आहेत. एकेकाळचा गरीब शहरी माणूस आजचा मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत वर्गामध्ये समाविष्ट झाला आहे.

हीच बाब झोपडपट्टीतील लोकांची असून झोपडमालकाचे शासनामार्फत पुनर्वसन होत आहे. त्यांना म्हाडा इ. संस्थामार्फत मोफत १बी एच के , १ आर के flat मिळाले आहेत. हा शहरी गरीबांमध्ये झालेला वर्गीय बदल जातीअंतासाठी अनुकूल बाब ठरत आहे.

शहरी स्थलांतराचे परिणाम…

खेड्यातून जी व्यक्ती शहरात येते. त्या व्यक्तीस शिक्षणाच्या व रोजगाराच्या असंख्य संधी शहरात उपलब्ध होतात. घरातील प्रत्येक सदस्याच्या हाताला काम भेटते. शहरातील रस्ते, रेल्वे, पथदिवे, दळण वळणाची साधने, मोठी बाजारपेठ, शिक्षण व रोजगाराच्या संधी, दवाखाने, शाळा, पर्यटन स्थळे, बागा इ. चाही उपभोग सदर व्यक्तीस घेता येतो. व्यक्तीची आकलन क्षमता, हुशारी, चलाखी, निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास, राहणीमानात बदल, बोलण्यात बदल, स्वत:च्या हक्काबाबत जागरुकता इ. बाबी मध्ये प्रभावी परिणाम होतात. व्यक्ती निरंतर प्रगतीच्या दिशेने झेपावताना दिसतात.

मुलत: दलित वर्ग खेड्यातील भूमिहीन व दरिद्री वर्गातून आला आहे. त्यामुळे गलिच्छ झोपडपट्ट्यात राहणे. व गलिच्छ कामे करणे. त्यास भाग पडत आहे. तरी गावातील जमीनदार जातीच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय गुलामीतून तो बऱ्याच प्रमाणात शहरात मुक्त झाला आहे. वर्षातून एखादेवेळी गावी गेलाच तर तो ताठ मानेनी जगत आहे. व हाती आलेल्या पैशामुळे तो लाचारी पासून आणि सावकारी कर्जापासून मुक्त झाला आहे. त्यामुळे स्थलांतरामुळे खेडूतामध्ये झालेला हा वर्गीय बदल जातीअंतासाठी अनुकूल बाब आहे.

मजुरीचा दर वाढताना…

वाढत्या शहरी करणामुळे ग्रामीण भागात मजुरीचा दर हा वाढला आहे. एके काळी मजूर स्त्रीया २० रुपयात १२ तास भांगलणी करायला येत असत. आज त्याच स्त्रिया ६ तासाला किमान २०० रुपयाची मागणी करू लागल्या आहेत. गावात मजुरांची संख्या कमी झाल्यामुळे जो जास्त मजुरी देईल तिकडे मजूर कामास जातो. त्यामुळे प्रत्येकास मजुरीचा दर वाढवणे भाग पडत आहे. यामुळेही शेती करणे परवडेनासे होते. मालक वर्गास शेती विकून शहरात स्थलांतरीत होणे भाग पडत आहे. या मजूर स्त्रीया पुरुष मागास जातीतील असतात. त्यांच्या आर्थिक वृद्धीत व सौदेबाजी करण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. आणि अशा प्रकारे जाती व्यवस्थेचा ग्रामीण पाया ढासळत चालला आहे. आणि त्यामुळेच शेतमजुरीचा वाढलेला दर हा जातीअंतासाठी अनुकूल बाब ठरत आहे.

टी. व्ही. पहाता पहाता…

रिकाम्या वेळेत पुरुष हे पारावर जावून गप्पा मारणे. स्त्रीया पाणवठ्यावर गप्पा मारणे. असे पूर्वी करत असत. तिथे गावची राजकारणे, चालीरिती, परंपरा यावर चर्चा होत असे. स्वत:चे वर्चस्व गावावर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असे.

मात्र आज सर्व खेडूत स्त्री पुरुषांचा रिकामा वेळ टीव्ही पाहण्यात जात आहे. त्यांच्या डबक्यातील जगात सारे विश्व सामावून गेले आहे. बातम्या, विविध प्रकारची माहिती, मनोरंजन, सिनेमे, मालिका, खेळ इ. मधून त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होत आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे सुरु झाले आहे. गाव विकासाच्या योजना समजून घेवून त्या योजना आपल्या गावात राबविण्यासाठी लोक आग्रही बनत आहेत. विविध जाहिरातींच्या प्रभावातून त्यांच्या घराची रचना, घरातील वस्तू, सुखसुविधा यांमध्ये बदल होत आहे. ग्रामीण भागाच्या विचारसरणीत व वर्तणुकीतही टी. व्ही. मुळे बदल होत आहे.  व हा बदल जातीअंतासाठी अनुकूल बाब आहे. कारण हा बदल जातींचा गडदपणा पुसून टाकत आहे. आणि नवस्वातंत्र्याचे वारे निर्माण करत आहे.

विभक्त कुटूंब

परंपरेनुसार शिकलेल्या व कमावत्या मुली लग्न करतात. स्वत:चे आई वडील सोडून देतात. आणि नवऱ्याच्या आई वडिलांची सेवा करत बसतात. मात्र आजकाल नवतरुणी विभक्त कुटुंबाची मागणी नेटाने लढवत आहेत. यातून विभक्त कुटूंबांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. यानुसार शहरी समाजा प्रमाणेच ग्रामीण समाजही एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंब पद्धती कडे सरकला आहे. परिणाम स्वरूप पती पत्नी आपापल्या विचारांप्रमाणे प्रगती करण्यास रिकामी झाली आहेत. त्यांचेवर आता जातीयवादी वृद्ध व्यक्ती किंवा समाजाचा सामुहिक दबाव राहिला नाही. यामुळे विभक्त कुटुंब हे जातीअंतासाठी अनुकूल बाब बनत आहेत.

इंटरनेट व स्मार्ट फोन

स्मार्ट फोन तरुण मुलांमध्ये क्रांती घडवत आहे. माहितीचा खजिना त्यांच्या हातात आला आहे. आजकाल ३ हजार रुपयांपासून स्मार्ट फोन मिळत आहेत. अतिशय स्वस्त इंटरनेट सुविधा, हातात खेळणारा पैसा व जगाशी कनेक्ट राहण्याचे महत्व तरुणांना पटलेले आहे. यामुळे प्रत्येक तरुणाकडे आज स्मार्ट फोन आहे. कॅमेरे, गाणी, व्हिडीओ ते फेसबुक, व्हाटस अॅप पर्यंत. गुगल वर एखादी माहिती शोधण्यापासून नोकरी शोधेपर्यंत. मोबाईल बँकिंग पासून online खरेदी पर्यंत. तरुणाई स्मार्टफोनद्वारे सगळीकडे मजल मारत आहे.

संदेशांची देवाण घेवाण व आपल्याला हव्या त्या ग्रुप मध्ये सदस्य बनणे. किंवा ग्रुप स्थापन करणे. अशा बाबींमुळे तरुणाई जगाशी जोडली जात आहे. त्यामुळे ही पिढी निश्चित वेगळी आहे. या तंत्रज्ञांनामुळे योग्य ठिकाणी स्थलांतरीत होणे. नवीन मित्र जोडणे. सोपे झाले आहे. यामुळे लफडी वाढली आहेत. अशी काहीजनांची कुरकुर असली. तरी वाढती प्रेम प्रकरणेच परंपरागत व ठरवून (जातीत बंदिस्त) केलेल्या विवाहांना सुरुंग लावतील. व हव्या त्या अनुरूप जोडीदाराशी कनेक्ट होण्यास उत्तेजन देतील. यातूनच जात नष्ट होत जाईल. म्हणूनच स्मार्ट फोन आणि इंटरनेट हे जातीअंतासाठी अनुकूल बाब बनत आहे.

आरक्षण, सरकारी योजना व सवलतींचे परिणाम

मागासवर्गीयांना  आरक्षण, योजना व सवलतींचा लाभ होत आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजीक, आर्थिक, राजकीय स्तरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जे लोक पूर्वी भिक मागून खात होते. लंगोटीवर फिरत होते. झोपडीत रहात होते. ते आज उच्चशिक्षित बनले आहेत. सुटाबुटात राहू लागले आहेत. बंगले बांधून राहू लागले आहेत. व मोटर सायकलवर फिरू लागले आहेत. ते केवळ मोफत शिक्षण, आरक्षण आणि सवलतींमुळेच शक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणात दलित लोक शहरात स्थलांतरित झाले आहेत. आंबेडकर जयंतीला गावी येवून जयंती दणक्यात साजरे करत आहेत. ते गावावर आंबेडकरी विचारांचा प्रभाव टाकत आहेत. आणि सर्व प्रकारची चळवळ लोक करत आहेत. म्हणूनच या सुधारणा जातीअंतासाठी अनुकूल बाब बनत आहेत.

अॅट्रोसिटी अॅक्ट चे परिणाम

दलितांवरील अत्याचाराचे प्रमाण फारसे कमी झाले नसले. तरी दलित पँथरच्या काळा पेक्षा आज निश्चित फरक झाला आहे. दलित समाज आता जागृत बनला आहे. त्यामुळे आता सवर्णांवर अॅट्रोसिटी अॅक्टचा धाक आहे. त्यामुळे अत्याचारांच्या संख्येत निश्चित घट झाली आहे. शिवाय अत्याचार सहन करण्यापेक्षा अॅट्रोसिटी अॅक्टनुसार पोलिसात तक्रार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. म्हणूनच हा कायदा जातीअंतासाठी अनुकूल बाब बनत आहे.

कम्युनिस्टांचा बदललेला दृष्टीकोन

एकेकाळी कम्युनिस्ट केवळ वर्गीय भुमिका घेत असत. त्यामुळे जातीय प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कम्युनिस्टांवर जातीयवादी, ब्राह्मणवादी असे आरोप होत राहिले. मात्र सध्या कम्युनिस्टांनी आपली भुमिका बदलून जातीअंतामध्ये सक्रियता दर्शविण्यास सुरुवात केली आहे. तसेच आजकाल कम्युनिस्ट दलित अत्याचारांमध्ये भुमिका निभावत आहेत. आंबेडकरवादी पक्षास सहकार्याची भुमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. ही जातीअंतासाठी अनुकूल बाब आहे. जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव… ही कॉ. अन्ना भाऊ साठेंची हाक वेळीच कम्युनिस्टांनी मनावर घेतली असती तर …

विविध  स्वजात उद्धारक संघटना

दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओ बी सी यांच्या सामुहिक तसेच जातवार संघटना निर्माण झाल्या आहेत. त्या त्यांच्या सदस्य जातींचा योग्यप्रकारे लढा लढताना दिसून येत आहेत. आरक्षण, शिक्षण, घरे, सरकारी नोकऱ्या, सवलती, मानवी हक्क, अत्याचार इ. बाबीत या संघटना महत्वपूर्ण भुमिका निभावत आहेत. आपल्या मागण्यांसाठी शासनावर योग्य दबाव आणून मागण्या मान्य करवून घेत आहेत. यातूनच नवे नेतृत्व निर्माण होवून काहीजण राजकीय प्रभाव टाकण्यास यशस्वी देखील ठरत आहेत. पूर्वी ब्राह्मण, मराठा आणि महार हेच राजकीयदृष्ट्या जागृत होते. मात्र आदिवासी, भटकेविमुक्त आणि ओबीसी तील अनेक जाती आता राजकीयदृष्ट्या जागृत झाले आहेत. आणि आता ते राजकीय मैदानात उतरत आहेत. त्यामुळे उद्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. आणि ही समीकरणे जातीअंतासाठी अनुकूल बाब आहेत.

धार्मिक वाद संपुष्टात

बहुजनवादी संघटनांमुळे आता एससी, एसटी, ओबीसी आणि मुस्लीम समाजास आपला खरा शत्रू समजला आहे. त्यामुळे कितीही हिंदू मुस्लीम दंगली लावण्याचा प्रयत्न केला. तरी आता पूर्वी प्रमाणे हिंदू मुस्लीम दंगली होत नाहीत. उलट हातात निळे झेंडे घेवून एससी, एसटी, ओबीसी आणि मुस्लीम समाज आंबेडकरवादाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. आणि ब्राह्मणवादाच्या विरोधात उभा राहिला आहे. त्यामुळे धार्मिक वाद संपुष्टात आले आहेत. त्यामुळे ही देखील जातीअंतास अनुकूल बाब आहे.

Image Source – https://commons.wikimedia.org/wiki/File:Indian_Caste_System.jpg

जातीअंतासाठी अनुकूल बाब – एक विश्लेषण
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *