जातीचे सद्य स्वरूप

जातीचे सद्य स्वरूप : अर्थात जातीयवादाचे निरीक्षण

जातीचे सद्य स्वरूप : अर्थात जातीयवादाचे निरीक्षण

आपण पहाणार आहोत जातीचे सद्य स्वरूप. ज्या ज्या राज्यात भाजप चे सरकार आलेले आहे. तिथे तिथे आर एस एस, बजरंग दल, हिंदू महासभा या सारख्या ब्राह्मणवादी संघटनांनी हैदोस माजवलेला आहे. कारण ब्राह्मणवाद्यांना भाजप कडून पोलीस संरक्षण मिळते. आर एस एस कडून प्रशिक्षण आणि शस्त्रे मिळतात.

आता त्यांनी तर अत्याचारांची परिसीमा गाठली आहे. गुजरात पॅटर्ण जिकडे तिकडे राबविण्याचा भाजपने सपाटाच चालविलेला आहे. यामागे त्यांचे राजकारण जरी असले तरी याला जबाबदार आहे. भारतीय समाज मनात अगदी खोलवर रुजून बसलेली जात, उचनिचता, अस्पृश्यता आणि मनुस्मृती. कारण त्यामुळेच समाजाचा त्यांना पाठींबा मिळत आहे. हे संपूर्ण बदलता यावे यासाठी आपण थोडे विस्ताराने जातीचे सद्यस्वरूप अभासणार आहोत.

दलित अत्याचार

दिवसेंदिवस दलित अत्याचाराचे प्रमाण कमी होत नसून ते वाढत असताना दिसून येत आहे. खून, मारहाण, घराची /  शेतीची मोडतोड, नग्न धिंड, बलात्कार, मलमूत्र खाण्यास वा पिण्यास देणे, दलित वस्तीवर हल्ला करणे, दलित अस्मितांच्या प्रतिमा, पुतळ्यांची तोडफोड करणे इ. असंख्य प्रकारात हे अत्याचार दिसून येतात. भीमा कोरेगाव, उना गुजरात आणि सरहानपूर उत्तरप्रदेश येथील दलितांवरील सामुहिक अत्याचार आणि हल्ल्यांनी अत्याचारांची परिसीमा गाठली. थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आदिवासी आणि मुस्लिमांची देखील आहे. आता तर कम्युनिस्ट देखील यातून सुटलेले नाहीत.

प्रेमप्रकरणे आणि दलित अत्याचार

आज शिक्षणासाठी तरुण मुले मुली शहरांमध्ये स्थलांतरीत होतात. एकत्र शिकणे, एकत्र काम करणे यातून त्यांचे प्रेमसंबध जुळून येतात. पुढे जावून ते विवाह करण्याचे निश्चित करतात. गावी जावून आई वडिलांना जेंव्हा प्रकरण कळते. तेंव्हा त्यांचा तीव्र विरोध होतो. यातून पुढे जावून जातीय द्वेष व या द्वेषातून अत्याचारांना सुरुवात होते.

दलित मुलाचा खून, त्याच्या आईची नग्न धिंड काढण्यापासून. ते स्वत:च्या मुलीचा खून करे पर्यंत मजल मारली जाते. मारामारी व हल्ल्यांना ऊत येतो. जातीयवाद संपलाय म्हणणाऱ्याना हे चोख उत्तर आहे. आजही उच्चनीचतेची भावना समूळ नष्ट झालेली नाही. स्वत: जन्माला घातलेलं मूल मोठं झाल्यावर ते ज्या व्यक्तीशी प्रेम करतं त्या व्यक्तीशी विवाह करू शकत नाही. आणि तसा प्रयत्न केला तर आई वडील आपल्या पोटच्या पोरांच्या किंवा त्यांच्या प्रेमाच्या जीवावर उठतात. तर असे आहे जातीचे सद्य स्वरूप.

भंगीकाम

अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. की सन २०१८ मध्येही भंगी उर्फ वाल्मिकी समाजास भंगी काम करावे लागते. भंगीकाम म्हणजे संडास साफ करणे, संडासच्या टाक्या साफ करणे इ. कामे. अनेक शहरात तर खोल गटारात तोंड बुडवून अडकलेले दगड, कचरा, त्यास काढावा लागतो. उघड्यावर संडास करणाऱ्या लोकांचे संडास पत्रा व झाडू च्या साह्याने हे लोक साफ करतात.

२१व्या शतकातही माणुसकीला लाजवणारे हे कार्य भंगी लोकांकडून करून घेत आहेत. व पैशासाठी लाचार होवून भंगी समाजही निलाजरेपणे आजही हे काम करत आहे. तर असे आहे भंगी जातीचे सद्य स्वरूप.

कचरावेचक, भंगारवाले

आजही खांद्यावर पोते घेवून सकाळी ७ पासून रात्री झोपेपर्यंत अनेक दलित लोक रस्त्यावर, कचरा कुंडीवर कचरा वेचत फिरतात. आणि भंगार दुकानदारांना विकून पैसे कमवतात. घाणीत हात घातल्या मुळे होणारे आजार, काचा / ब्लेड कापण्याची भिती, साप / कुत्रे चावणे, अशातही ऊन, थंडी, पावसातही हे काम करून जगावे लागते. दलित जातीने घेतलेले हे शहरी स्वरूप आहे.

नोकरी नाही, रोजगार नाही, उद्योगासाठी भांडवल नाही. असे असले तरी काही अन्य मार्ग नक्कीच सापडू शकतात. मात्र जगण्याचा सोपा मार्ग म्हणून अनेक दलित जातीतील लोक खांद्यावर पोते टाकतात. आणि कचरा हुडकत रस्त्यांवर फिरतात. आणि आपला स्वाभिमान मातीमोल करतात. कारण त्यामागे आहे भूख आणि मजबुरी.

स्वच्छता कर्मचारी

रस्त्यावरचा कचरा झाडणे, कुंडीतला कचरा उचलणे, मेलेली जनावरे उचलणे, संडास / मुताऱ्या धुणे यासारखी घाणेरडी कामे नगर व महानगर पालिकांमध्ये केवळ दलित समाज करत आहे. त्यांच्या जागेवर उच्च जातीचे कोणी भरतीच होत नाही. केवळ म्युनिसिपालिट्याच नव्हे तर गृहनिर्माण संस्था देखील वसाहतींची स्वच्छता करण्यास कर्मचारी नेमतात, आणि ते सुद्धा दलितच कर्मचारी नेमतात. दलित जातींचे हे शहरी विद्रूप स्वरूप आहे.

इथेही जगण्याचे अन्य मार्ग उपलब्ध असताना सरकारी नोकरी, कायम स्वरूपी नोकरी किंवा पगाराचे आमिष बाळगून दलित आपला स्वाभिमान गहाण टाकतात. आणि जाती व्यवस्था बळकट करण्यास एकप्रकारे सहाय्यभूत ठरतात.

सर्व क्षेत्रात ब्राह्मणी वर्चस्व

सर्व राजकीय प्रमुख पक्ष, संस्था, संघटना, युनियन्स, कंपन्या, बँका, उद्योग धंदे, सरकारी उच्च पदस्थ नोकऱ्या, देवस्थाने, न्यायालये, मिडिया, इ. अनेक क्षेत्रात ब्राह्मणी वर्चस्व असून स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही अन्य जातींना वरच्या पदांवर फारशी मजल मारता आली नाही. एव्हाना त्यांना ती मजल मारता येवू नये म्हणूनच प्रयत्न केला जातो.

सत्ताधाऱ्यांनी आणि वरिष्ठ उच्चवर्णीय लोकांनी हे पक्के ठरवले आहे. प्रमोशनमध्ये अडथळे आणण्यापासून संधीच नाकारणे. अशा अनेक प्रकारे मागास वर्गास नाडले जाते. तर असे आहे ब्राह्मण जातीचे सद्य स्वरूप.

जमिनीचा माज

गावातील ७० % ते ९० % जमीन ही जमीनदार समाजाच्या (मराठा इ.) मालकीची आहे. त्यामुळे भूमिहीन / अल्पभूधारक मागास जातींना त्यांचे शेतावर कामाला जाण्याशिवाय पर्याय असत नाही. त्यामुळे गावचे राजकारणावर जमीनदारांचा प्रभाव दिसतो. या जमीनदार जातींमध्ये जमीनदारी, सरंजामी वृत्ती दिसून येते.

दलित रोजगारासाठी पाटलांवर अवलंबून असल्यामुळे नाईलाजास्तव अत्याचार सहन करतात. आणि तडजोड करतात. पोलीस स्टेशनला पाटील लोकांचाच दबदबा असतो. शिवाय सत्ताधारी देखील त्यांचेच नातेवाईक असतात. त्यामुळे कायदा असूनही न्याय मिळत नाही. तर असे आहे जमीनदार जातीचे सद्य स्वरूप.

हिंदूची ब्राह्मणांप्रती मानसिक गुलामगिरी

या देशात ८० % समाज हा हिंदू असून तो ३ % ब्राह्मण जातीकडून पौरोहित्य करून घेतो. लग्न लावणे पासून अंत्यसंस्कार दशविधी करणेपर्यंत, सत्यनरायनाच्या पूजेपासून यज्ञ करणे पर्यंत सर्व कार्ये करणे तसेच मंदिरांमध्ये पौरोहित्य करणे इ. कार्ये ब्राह्मण करतात.

यामार्फत लोकास स्वत:चे नादी लावून त्यांचे उत्पन्न, पैसा तर उकळला जातोच. शिवाय ब्राह्मण वर्ग जातीय द्वेष व तेढ निर्माण करण्याचे प्रमुख कार्य करतो. व समाज मनुस्मृती प्रमाणे चालविण्यासाठीचा प्रयत्न राजरोसपणे करत राहतो. यांची पौरोहित्याची मक्तेदारी आजही मोडून निघालेली नाही. तर असे आहे हिंदूंमधील मानसिक गुलाम जातीचे सद्य स्वरूप.

आदिवासी जातीचे सद्य स्वरूप

आजही आदिवासी जंगलात राहून आदिम जीवन जगात आहेत. शहरीकरण, खाण उद्योगासाठी आदिवासींना जंगलातून हुसकून लावले जातेय. पर्यावरण बचावच्या नावाखाली आदिवासींना जंगलातून हाकलून लावले जातेय.

शिक्षण, आरोग्य, रोजगार तर सोडाच पण रस्ते, पाणी, वीज इ. मुलभूत सुविधांपासूनही यांना वंचित ठेवण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला शहरांना लागणारे पाणी आदिवासी एरियातून पळवले जातेय. आणि त्यांना मात्र पिण्यासही पाण्याची सोय केली जात नाही.

भटकेविमुकत जातीचे सद्य स्वरूप

भटके विमुक्तांची परिस्थिती तर त्याहूनही अधिक बिकट आहे. संसार डोक्यावर घेवून या गावातून त्या गावात ते फिरत आहेत. ना पत्ता, ना कोणता अस्तित्वाचा पुरावा, ना शिक्षण, ना कोणत्या शासकीय योजनांचा लाभ. शिक्षणाचे प्रमाण, नाही म्हणण्याइतके कमी. त्यामुळे काय करावे तेच कळत नाही.

भटकेविमुकतांची जत्रा मराठवाड्यात वर्षातून एकदा भरते. संपूर्ण भारतभरातून संपूर्ण भटक्या विमुक्त जाती तिथे एकवटतात. आणि आपसात अनेक व्यवहार करतात. तिथे गेल्यावर त्यांच्या प्रचंड दारिद्र्याची आणि जीवन स्तराची कल्पना येते. त्यांच्या कडे पाहून आजही या स्वतंत्र भारतात मनुस्मृतीचेच कायदे अप्रत्यक्षरित्या राबविले जात आहेत हे लक्षात येते.

जातीचे राजकारण

जो तो आपापल्या जातीला कुरवाळत बसला आहे. जातीच्या आधारेच आजही मते मागितली जातात. आणि जातीच्या उमेदवारालाच मते देवून निवडून आणले जाते. जातीच्या आधारे निवडून आलेले लोकप्रतिनिधी देखील जातीचे राजकारण करण्यातच मश्गुल आहेत. बहुसंख्यांक जाती मग आपल्याच जातीचे भले करू पाहतात. समाज म्हणून, राष्ट्र म्हणून विचारच केला जात नाही.

जातपंचायती

पुरातन काळापासून चालत आलेल्या जातपंचायती आजही तशाच चालू आहेत.आपसातील तंटे सोडवण्या करीता आजदेखील लोक कोर्ट कचेऱ्या करत नाहीत. तर जातीच्या पंचामार्फत निर्णय घेण्यात येतात.

हे पंच अव्वाच्या सव्वा दंड लावतात. मध्ययुगीन काळातील नियम लावून दंड देतात. न ऐकल्यास सामाजिक बहिष्कार टाकला जातो. यामुळे अनेक कुटुंबे त्रस्त आहेत. कित्येकांचे आयुष्य आणि कुटुंब यामुळे उध्वस्थ होते. कारण स्वत:च्या जातीचे लोक स्वीकारत नाहीत. आणि अन्य जातीचे लोक तर स्वीकारुच शकत नाहीत. यामुळे असे बहिष्कृत कुटुंब एकटे पडते. आणि अनेक समस्यांना तोंड देत जगत राहते. तर असे आहे जातीचे सद्य स्वरूप.

झोपडपट्ट्या

गावकुसा बाहेरील वस्त्यांना शहरात गलिच्छ झोपडपट्ट्यांचे स्वरूप आले आहे. खुराड्याप्रमाणे अत्यंत छोट्या घरात, कोंदट वातावरणात मागासवर्गीय लोकांना वास्तव्य करावे लागत आहे. उघडी वाहणारी गटारे, कचऱ्याचे ढीग, उघड्यावर संडास, अस्वच्छता, घाण, डास, मोकाट कुत्री व डुकरे यांचे सहवासात रोगट वातावरणात मानवी समाज रहात आहे.

ही एक लाजिरवाणी बाब आहे. या झोपडपट्ट्या सुधाराव्यात असे न वाटता, या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब, मागास लोकांची घृणा मात्र उच्चवर्णीय समाज करतो. हे किती भिषण आहे.

जाती प्रथा

आजही काही गावे अशी आहेत की त्या गावात सवर्णांच्या वस्तीतून जाताना दलितांना आपल्या चपला काढाव्या लागतात. आणि चपला डोक्यावर ठेवून सवर्णांची वस्ती संपे पर्यंत पायी चालत जावे लागते.

आजही घोडा पाळला. आणि घोड्यावर बसून प्रवास करतो. म्हणून दलित तरुणांचे खून होतात. कित्येक गावात घोड्यावर बसून दलित नवरदेवाची मिरवणूक काढण्यास सवर्णांकडून विरोध होतो. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून प्रशासन, पोलीस आणि कोर्ट देखील त्यास संरक्षण देत नाही. आजही बाबासाहेबांची मोबाईलवर रिंगटोन ठेवली. म्हणून दलित तरुणाचा खून होतो.

जातीचे सद्य स्वरूप आता आपण समजून घेतले असेलच. अनेक समाज सुधारकांच्या प्रयत्नानंतर देखील जात संपूर्णपणे नष्ट झालेली नाही. आता आपल्यालाच काही तरी करावे लागेल. काय करूयात?

Image source : https://commons.wikimedia.org/wiki/File:Mang_caste.jpg

जातीचे सद्य स्वरूप : अर्थात जातीयवादाचे निरीक्षण
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

 

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *