कांशीरामजी

कांशीरामजी : आंबेडकरी चळवळीचे सच्चे मित्र.

कांशीरामजी : आंबेडकरी चळवळीचे सच्चे मित्र.

बाबासाहेबांप्रमाणेच कांशीरामजी यांना मानणारा मोठा प्रवर्ग भारतात सर्वत्र पसरलेला आहे. चळवळीचे काम करता यावे म्हणून संपूर्ण आयुष्य ते अविवाहित राहिले. कुटुंबाचा त्याग केला. आई,बहिणीचा मृत्यू असो वा कुणाचे लग्न ते घरी गेले नाहीत. पुण्यात चांगली नोकरी करणारा हा सुशिक्षित पदवीधर माणूस. नोकरी सोडून चळवळीत उतरला. Annihilation of Castes अर्थात जातींचे निर्मुलन हा बाबासाहेबांचा ग्रंथ एका रात्रीत ३ वेळा त्यांनी वाचून काढला. आणि आपल्या सामाजिक, राजकीय कार्याची दिशा निश्चित केली.

त्याग आणि परिश्रम

एका बाजूला संघटना निर्माण करण्याचे आव्हान, दुसऱ्या बाजूला जनतेचा विश्वास गमावलेले आणि जनतेचे पैसे खाणारे नेते,  तर तिसऱ्या बाजूला नोकरी सोडल्यामुळे आलेली आर्थिक चणचण. अशा अवस्थेत एक माणूस जिद्दीने उभा राहतो. चालत, सायकल वरून थकून जाईपर्यंत प्रवास करून संघटना उभारतो. प्रसंगी रात्री उपाशी पोटी झोपतो. आणि दलित, शोषित, पिडीत बहुजन समाजास सत्ता मिळावी म्हणून अहोरात्र संघर्ष करतो. हा केलेला प्रचंड त्याग, केलेले कष्ट, परिश्रम याला मानाचा जयभीम आणि लाल सलाम!

प्रतिक्रांतीचे वाहक की सच्चे क्रांतिकारक

आज त्यांच्या जन्मदिनी कांशीरामजी यांना ‘प्रतिक्रांतीचे वाहक’ असे स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवणारी सुशिक्षित पण अज्ञानी मंडळी सोशल मिडीयावर म्हणत होती. तेंव्हा खूप वाईट वाटले. कांशीरामजी यांच्या विचारांशी, त्यांनी केलेल्या कार्याशी त्यांचे मतभेद असतील, माझेही आहेत. मी त्यांच्या मतभेदांचा आदर करतो. पण म्हणून त्यांना एकदम प्रतिक्रांतीचे हस्तक वगैरे शब्द वापरणे मला पटत नव्हते. आंबेडकरी चळवळीतील आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हेच आता तरुण पिढीला कळेनासे झाले आहे. पूर्वी नेत्याच्या मागे मुकाट जाणारी जनता होती. प्रामाणिक आणि एकनिष्ठ. आता शिकली सवरलेली ही तरुण पिढी ज्ञानी बनली नसून अर्धवट बनली आहे. किमान मागची पिढी दुसऱ्याच ऐकत तरी होती. समजून घेत होती. पण स्वत:ची अक्कल पाजळणारी ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली तरुण पिढी कुणाचच ऐकायला तयार नाही. चळवळ नव्या टप्यावर, अधिक उंचीवर नेण्याऐवजी स्वत:च्या बेताल वक्तव्याने मागे ओढून नेवू लागली आहे. मित्रांना शत्रू असे संबोधू लागली आहे.

‘बोल पचासी, जय मुल निवासी’ म्हणजे काय?

ब्राह्मण हे आर्य वंशाचे लोक असून ते पाश्चिमात्य देशातून ३ हजार वर्षापूर्वी भारतात आले आहेत. तेंव्हा पासून त्यांनी भारतीय मूलनिवासीना गुलाम बनवले. महात्मा फुले या गुलामांना शुद्र आणि अतिशूद्र असे संबोधत. शुद्र म्हणजे ओबीसी, आणि अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य समाज. आदिवासी त्याहीपलीकडचे. शुद्र, अतिशूद्र आणि आदिवासीं या ८५% लोकांची मोट बांधून सत्ता प्राप्त करायची आणि ब्राह्मणांना सत्तेतून बाहेर काढायचे. देशात खऱ्या अर्थाने बहुजनांची सत्ता आणायची. अशी कांशीरामजीनी रणनीती आखली. त्यासाठी जय भीम सोबत जय मूलनिवासी हा नारा त्यांनी दिला. आजही शुद्र (ओबीसी), आणि आदिवासींना जयभीम स्वीकारता आले नाही. जयभीम म्हटले की ते तुच्छतेने पहातात. मात्र जय मूलनिवासी या शब्दामुळे त्यांना आंबेडकरी चळवळीशी जोडून घेता आले. आज तेच लोक बामसेफ सारख्या संघटना मध्ये काम करू लागले आहेत. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य समजून घेवू लागले आहेत. आणि जय मूलनिवासी सोबत आता जय भीम देखील म्हणू लागले आहेत.

जय मूलनिवासी या नाऱ्याला विरोध का ?

वरवर जरी तसे दिसत नसले तरी ब्राह्मण्याला विरोध की ब्राह्मण जातीला विरोध हा खरा जयभीम की जय मूलनिवासी या मागील वाद आहे. मीही त्यांच्या प्रमाणेच जयभीमच्याच बाजूचा आहे. कारण फुले आंबेडकरांप्रमाणे माझाही ब्राह्मण्यवादाला विरोध आहे. ब्राह्मण जातीला नाही. पण एखादी आंबेडकरवादी संघटना ब्राह्मण जातीला विरोध करत असेल म्हणून तिला सरळ प्रतिक्रांतीवादी ठरवत शत्रू समजायचे हे पटत नाही.

पुरोगामी ब्राह्मण एक प्रश्नचिन्ह ?

त्याही पलीकडे जावून बाबासाहेबांचा जयजयकार करण्यापेक्षा जय मूलनिवासी म्हणून लोकांना बाबासाहेबांपासून दूर घेवून जात असल्याचा गैरसमज देखील काही जयभीमवाल्या मंडळींच्या मनात आहे. पण मुळात मग काही पुरोगामी ब्राह्मण पण चळवळीत आहेत. ते सतत ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करत असतात. त्यांचे काय? हा देखील प्रश्न आहे. सच्चा आंबेडकरवादी अशा व्यक्तींना केवळ ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून बहिष्कृत करणार नाही. कारण फुले आणि आंबेडकरांच्या काळातही त्यांना ब्राह्मण मित्रांनी मदत केली आहे. त्यांच्या चळवळीमध्ये काम केले होते. महात्मा फुलेंना भिडे नावाच्या ब्राह्मण गृहस्थाने भारतातील मुलींची पहिली शाळा चालविण्यासाठी स्वत:चा वाडा देवू केला होता. बाबासाहेबांनी मनुस्मृती एका ब्राह्मण व्यक्तीच्या हस्ते जाळली. मात्र असे असले तरी, कांशीरामजी यांच्या संघटना या ब्राह्मण जातीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. मग तो ब्राह्मण पुरोगामी का असेना?

मी पूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे काम करत असे. डॉ. नरेंद्र दाभोळकर (पुरोगामी ब्राह्मण) यांच्या सोबत काम करणारा कार्यकर्ता म्हणून बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते माझा द्वेष करत असताना मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या दृष्टीने मी शत्रूला मदत करणारा व्यक्ती होतो. हे सर्व व्यक्तिगत पातळीवरून अनुभवून अभ्यासूनही कांशीरामजी यांना आंबेडकरी विचारांचे शत्रू वगैरे असे शब्द वापरणे मला पटत नाही. मतभेद, मतभिन्नता जरूर असतील. पण आंबेडकरवाद जनमानसात पोहोचविण्यात कांशीरामजी यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. हे नाकारून चालणार नाही असेच मला वाटते.

केडर बेस कार्यकर्ता

मी फारसा कधी बी एस पी, बामसेफ या संघटनामध्ये गेलो नाही. पण एक दोन वेळा त्यांचे ट्रेनिंग ऐकले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्याशी चर्चा केली आहे. त्यांची पत्रके, पोस्टर्स, भिंतीवरील स्लोगन वाचले, पाहिलेले आहेत. यु ट्यूब वर वामन मेश्रामांची भाषणे ऐकली आहेत. त्यांचे विचार पटो किंवा न पटो. पण ते अभ्यासपूर्ण बोलतात. खोटे बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्याला पुराव्यांची, दाखल्यांची ते जोड देतात. त्यांच्या चिकाटीला माझा सलाम, अविरत कष्ट करण्यालाही सलाम. अशा पद्धतीने काम करणारा केडर बेस कार्यकर्ता हा फक्त कांशीरामजींच्याच संघटनातून उभा राहिलेला दिसतो. नाहीतर संघटनेची दिशा धोरणे न कळलेली, आंबेडकरवाद न कळलेली, न वाचलेली, न समजून घेतलेली आणि कळवून, समजून न घेवू इच्छिणारी माणसेच मला या किंवा त्या आंबेडकरी पक्षात दिसतात.

कांशीरामजींची कारकीर्द

सर्व संघटना स्वतंत्रपणे स्थापन करण्यापूर्वी ते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे ते सक्रीय सदस्य होते.१९७१ साली कॉंग्रेस सोबत झालेल्या विषमतेवर आधारित समझोत्या वरून आणि पार्टी मध्ये झालेल्या वादातून त्यांनी हा पक्ष सोडला. आज त्यांनी (बामसेफ, बीएसपी इ.) देशव्यापी संघटना पक्ष उभे केले. देशाबाहेर संघटना पोहोचवली. आंबेडकरी विचार सरकारी कर्मचारी, ओबीसी, अल्पसंख्यांक, आदिवासी यांमध्ये पोहोचवला. त्यांनी स्वत:चा मिडिया (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक) निर्माण केला. अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते निर्माण केले. त्यांचे मानधन देता येईल, स्वखर्चावर कार्यालये थाटता येतील एवढा पैसा निर्माण केला. दान देणारे कार्यकर्ते निर्माण केले. त्यांनी स्वत:ची सत्ता आणली उत्तरप्रदेशात. ४ वेळा स्वत:चा मुख्यमंत्री बनवला. बीएसपी ही आज भारतातील तिसऱ्या नंबरची सर्वात मोठी पार्टी आहे. त्यांनी बुद्धीस्ट रिसर्च सेंटर चीही स्थापना केली. त्याच बरोबर त्यांनी दलित कामगारांना ‘पे बॅक टू सोसायटी’ या सिद्धांतानुसार पगाराच्या १० वा भाग समाजाला परत करण्याचे देखील आवाहन केले.

पुणे करार

कांशीरामजीच्या कार्याचा थोडा आढावा घेवू. पुणे पॅक्ट बद्दल बामसेफ आणि बीएसपीने खूप सभा घेवून जनजागृती केली. पुणे करार झाला ते चांगले की वाईट? हे थोडे बाजूला ठेवू. पण राजकीय आरक्षण असूनही सवर्णांच्या मतांवर अवलंबून असलेले सच्चे आंबेडकरवादी निवडून येतात का? प्रस्थापित सवर्ण नेत्यांची तळवी चाटणारे, कमी अक्कल असलेले, अभ्यास नसलेले, लाचार, संसदेत मुग गिळून गप्प बसणारेच का निवडून येतात? हा प्रश्न जेंव्हा पडतो. तेंव्हा वाटते. बामसेफ पुणे कराराला विरोध करते ते चूक नाही. कांशीरामजींच्या ‘द चमचा ऐज’ या पुस्तकाचे महत्व मग पटते.

बाकीच्यांनी काय केले?

आता बाकीच्यांनी काय केले? याचा परामर्ष घेवूयात. बाबासाहेबांनी स्वत: निर्माण केलेल्या संस्था विकसित करणे तर दूर, आहे त्यांची काय दुरावस्था आहे? आणि ती तशी का आहे? किती नवीन संस्था निर्माण केल्या आणि त्या कोणत्या अवस्थेत आहेत? त्या तशा का आहेत? कधी केला आपण विचार? तुमचे कर्तुत्व काय?

मंत्रिपद आणि खासदारकी साठी कुणी कुणाकुणाला भिक मागितली, लाचारी पत्करली? विधानभवनात, संसदेत अभ्यासपूर्ण वक्तव्य करण्यापेक्षा हास्यकविता करून कुणी, कसे स्वत:चे आणि दलित शोषितांचे हसे केले? पैसे खावून, गुंडगिरी करून जनतेला कुणी नाडले, बदनाम केले?

कोण शत्रू आणि कोण मित्र?

कुणा एका अभ्यासू आणि प्रभावी नेत्याच्या मागे सारी शक्ती उभी करायची सोडून १७ आंबेडकरी पक्षांच्या मागे कोण धावले? का धावले? आंबेडकरी चळवळ सर्व जातीधर्मात पोहोचवायची सोडून ती फक्त नवबौद्धापर्यंत मर्यादित कुणी ठेवली? का ठेवली? नवबौद्धानीही अभ्यास करून चळवळ गतिमान का नाही केली? आपल्या अर्धवट अभ्यासावर वाद घालत बसून अजून या पुढची पिढीही तुम्हाला अशीच वाया घालवायची आहे का? यापुढेही बाबासाहेब नवबौद्धेतरापासून दूर ठेवायचे आहेत का? कांशीरामजी सारख्या चळवळीच्या सच्चा मित्र आणि सहकाऱ्याना शत्रू समजणाऱ्यानो आणि तसा प्रचार करणाऱ्यानो हे लक्षात ठेवा. तुम्ही असे करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान करत आहात. त्यामुळे तुम्हीच खरे आंबेडकरी चळवळीचे शत्रू आहात…..

Image source : https://www.flickr.com/photos/71158895@N03/9412949817

कांशीरामजी : आंबेडकरी चळवळीचे सच्चे मित्र.
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *