Why we started Human Liberty?

क्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांत

क्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांत

क्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांतचा आपण या ठिकाणी परामर्श घेणार आहोत. बाबासाहेबांनी सुरु केलेल्या नवयान बुध्द धम्माचे तत्वज्ञान बौद्ध धर्मीय लोक आणि मार्क्सवादी लोक योग्य प्रकारे समजून घेत नाहीत. त्यामुळे यांच्यामध्ये प्रचंड वैचारिक गोंधळ निर्माण झाला  आहे. १.काही बौद्ध धर्मीय लोक कम्युनिझमचा विरोध करत आहेत. २. काही कम्युनिस्ट आंबेडकरवादाचा विरोध करत आहेत. ३. काही आंबेडकरवादी लोक बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांना सोबत घेवून जात आहेत. ४. काही कम्युनिस्ट लोक आंबेडकर आणि मार्क्स यांना सोबत घेवून जात आहेत. आणि बुद्धाला दूर ठेवत आहेत. ५. काही कम्युनिस्ट लोक जातीअंताची लढाई लढणारे कम्युनिस्ट पक्ष आणि आंबेडकरवादी यांना विरोध करत आहेत.

हा गोंधळ मूळ मुद्दा समजून न घेण्यामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे काय चूक काय बरोबर या गोंधळात सर्वच समतेचे पुजारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेआहेत. आणि एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत. ही गंभीर बाब आहे. कारण यामुळे क्रांती यशस्वी न होता क्रांतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. यावर हा वैचारिक गोंधळ ताबडतोबीने दूर केला नाही. तर फार मोठे चळवळीचे नुकसान होणार आहे. यासाठी या लेखामध्ये या विषयाचा परामर्श घेण्यात आला आहे.

भारतात क्रांती यशस्वी होण्यासाठी नवयान बुद्ध धम्म आवश्यक

भारतातील ब्राह्मणवाद हा जगातील अन्य सर्व शोषक वर्गा पेक्षा जास्त क्रूर आहे. कारण त्याने धर्माचे स्वरूप धारण केले आहे. आणि ब्राह्मणी धर्माद्वारे या देशातील लोकांना त्यांनी मानसिक गुलाम बनवले आहे. क्रांती यशस्वी करायची असेल किंवा टिकवायची असेल तर लोकांना ब्राह्मणांच्या मानसिक गुलामीतून मुक्त करावे लागेल. जर भारतीय लोकांना ब्राह्मणी मानसिक गुलामीतून मुक्त केले नाही. तर या देशात क्रांती कधीही यशस्वी होवू शकत नाही.

मार्क्स म्हणतो, विचार जेंव्हा समाजमनाची पकड घेतात तेंव्हा ते भौतिक शक्ती बनतात. या आधारावर भारतीय समाजमनावर ब्राह्मणी मानसिक गुलामीची वैचारिक पकड आहे. आणि तशाच स्वरूपाची भौतिक शक्ती या देशात हजारो वर्षापासून आहे. त्यामुळे लोक देव, धर्म, पूजा, जातीवाद, अस्पृश्यता, पुरुषप्रधानता या मध्ये मश्गुल आहेत. अशा वेळी साम्यवादाशी सुसंगत असा नवयान बुध्द धम्म जर लोकांनी स्वीकारला. तर कम्युनिस्टांशी सुसंगत असलेल्या विचारांची भौतिक शक्ती निर्माण होईल. आणि क्रांती यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होईल.

नवयान बुद्ध धम्म हा कम्युनिझमशी सुसंगत

भांडवलशाहीचा उदयही न झालेल्या काळात जन्मलेला बुद्ध हा भांडवलशाही संपवू पहाणाऱ्या मार्क्सला उत्तर देवू शकत नाही. असे असतानाही बाबासाहेब बुध्दास मार्क्सला उत्तर द्यायला लावतात. आणि ‘खाजगी मालमत्ता हे शोषणाचे मूळ आहे’ या मार्क्सच्या मूळ तत्वाच्या विरोधात बुद्ध नाही. हे बाबासाहेब जगाला सांगतात. इथेच बाबासाहेब बुद्धाला पुढच्या टप्प्यावर नेवून ठेवतात. आणि म्हणून बाबासाहेबांचा नवयान बुद्ध धम्म हा बुध्द आणि मार्क्सचे एकत्रित स्वरूप आहेच. शिवाय या दोघांच्या तत्त्वज्ञानाचा पुढचा टप्पा देखील आहे. हे खरे तर मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी दोघांनी समजून घ्यायला हवे. पण असे होताना दिसत नाही.

सुधारित मार्क्सवाद म्हणजेच नवयान बुद्ध धम्म

कम्युनिझम शांततेच्या मार्गाने प्रस्थापित करायचा की रक्तरंजित क्रांतीच्या माध्यमातून? क्रांती नंतर कामगार वर्गाची हुकुमशाही की व्यक्तीस्वातंत्र्यास मुभा असलेली लोकशाही? हा कम्युनिझम हुकुमशाहीचा दंडुका काढल्यावर टिकेल का? तो टिकवायचा असेल तर काय करावे लागेल? शासनसंस्था लयाला जाईल, तेंव्हा तिची जागा कोण घेईल? असे प्रश्न बाबासाहेब मार्क्सला विचारतात. आणि त्याला नवयान स्वरूपाचा बुद्ध धम्म असा पर्याय देवून बाबासाहेब मार्क्सवादाला पुढच्या टप्प्यावर आणून ठेवतात. बाबासाहेब मार्क्सवादाला विरोध करत नसून त्यातील त्रुटी दूर करतात. आणि दुरुस्त केलेला नवीन स्वरूपातील मार्क्सवाद म्हणजेच नवयान बुद्ध धम्म ते जगाला देतात.

कम्युनिस्टांचा बदललेला दृष्टीकोन

आजकाल कम्युनिस्ट बाबासाहेबांच्या जातीअंताच्या मार्गाचा विचार करू लागले आहेत. क्रांती यशस्वी व्हायची असेल. आणि ती टिकवायची असेल. तर भारतालाच नाही. तर जगालाही आंबेडकरवादाची गरज आहे हे त्यांनी ओळखलंय. वर्गअंताच्या लढया सोबत आपणास जातीअंताचा लढा देखील एकसाथ लढावा लागेल. हे त्यांनी ओळखलंय. आणि आता जातीअंताच्या लढ्यात कम्युनिस्ट लोक सक्रीय बनले आहेत.

टॉटस्कीवादी कम्युनिस्ट

दिवसेंदिवस कट्टरपंथीय पुरोगामी लोकांची मोठी संख्या जगात वाढत चालली आहे. यामध्ये काही टॉटस्कीवादी कम्युनिस्ट आहेत. जे भारतीय संदर्भ न पहाता. केवळ विरोधाला विरोध म्हणून स्टॅलिनवादी आणि लेनिनवादी कम्युनिस्टांना विरोध करत आहेत. भारतीय कम्युनिस्टांना कोणत्याही विदेशी नेत्यांची कॉपी पेस्ट भारतात करून चालणार नाही. तर माओ, चे किंवा अन्य नेत्यांप्रमाणे आपआपल्या देशातील भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर रणनीती ठरवावी लागेल. आणि क्रांतीचे योग्य नेतृत्व निवडावे लागेल. हे ते ध्यानातच घेत नाहीत. आणि आंबेडकरवाद हे भारतातील परिस्थिती साठी नेमके आणि अचूक उत्तर आहे. हे समजून घेत नाहीत.

आजही हे लोक जातीअंता साठी फक्त क्रांती हेच औषध आहे असे समजतात. क्रांती केल्यावर जात आपोआपच नष्ट होणार आहे. वर्गीय लढा लढणेच आवश्यक आहे. बाकी सर्व वेळेचा अपव्यय आणि कामगार वर्गाची दिशाभूल किंवा कामगार वर्गात फुट पाडण्याचे धंदे आहेत. असा समज करून भाकप आणि माकप चा कडवा विरोध ते करू लागले आहेत. आणि हे लोक लेनिनवादी कम्युनिस्टांच्या जोडीला आंबेडकरवाद्याना देखील झोडत आहेत. आणि त्यासाठी आपल्या लेखण्या आणि वाणी झिजवत आहेत. त्यांचा विरोध आता इतका टोकाला गेला आहे. की, स्टॅलिनवादी, लेनिनवादी कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी त्यांना भांडवलदारांपेक्षा मोठे शत्रू वाटू लागले आहेत.

कम्युनिस्टद्वेष्टे आंबेडकरवादी

बरोबर दुसऱ्या बाजूला आहेत कडवे आंबेडकरवादी. हे कडवे आंबेडकरवादी लोक बाबासाहेब हे भारतीय कम्युनिस्टांच्या विरोधात होते. की कम्युनिझमच्या विरोधात होते हेच समजून घेत नाहीत. यातला फरकच समजून घेत नाहीत. मुळात कम्युनिझम समजून घेतल्याशिवाय बाबासाहेब समजून घेता येत नाहीत. आणि कम्युनिझम बद्दल पूर्वग्रहदुषित नजरेने पाहिल्यावर तर बाबासाहेब बिलकुल कळत नाहीत. केवळ बाबासाहेबांनी कम्युनिस्टांना विरोध केला म्हणून हे देखील करू लागतात.

काही आंबेडकरवादी लोक कम्युनिस्टांचा शिरकाव आंबेडकरवादी चळवळीत होवू नये. ते घातक आणि धोकादायक आहेत. अशी भूमिका घेवू लागतात. इतक्या दिवसातून का होईना पण कम्युनिस्टांनी आंबेडकरवाद स्वीकारलाय. ते जातीअंताच्या लढ्यात उतरलेत. आणि अशावेळी मात्र आंबेडकरवाद्यांनी त्यांना नाकारणे .म्हणजे चळवळीचा घात करून घेणे होय. बऱ्याचदा या आंबेडकरवाद्यांना मार्क्सवादी आणि माओवादी यामधला फरक कळत नाही. त्यापुढे जावून माओवादी आणि नक्षलवादी यामधलाही फरक काळात नाही. सरसकट सगळ्या कम्युनिस्टांना हिंसेचे पुजारी समजून हे लोक कम्युनिस्टांना जातीअंताच्या चळवळी पासून रोखू पाहत आहेत.

क्रांतीशी किंवा आंबेडकरवादाशी द्रोह

स्वत: बाबासाहेबांनी वर्ग अंताचा लढा स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून लढताना लाल झेंडा हातात घेतला होता. आणि जातीअंताचा लढा लढण्यासाठी त्यांनी निळा झेंडा आपल्या हाती दिला आहे. हे लक्षात घेवून कम्युनिस्ट लोक जातीअंताचा लढा लढत असताना लाल झेंडा घेवून येत नाहीत. तर ते निळा झेंडा हातात घेत आहेत. अशा वेळी आपण स्वत: वर्गअंताच्या लढ्यात सहभागी व्हायचे नाही. आणि कम्युनिस्टांना जातीअंताचा लढा लढू द्यायचा नाही. असे वागून आपण क्रांतीशी किंवा आंबेडकरवादाशी द्रोह करत आहोत. याचे भान हा कट्टर आंबेडकरवादी ठेवू पहात नाही.

निळा आणि लाल झेंडा एकसाथ येण्याची गरज

अशा वेळी कट्टर कम्युनिस्टांनी आणि कट्टर आंबेडकरवाद्यांनी आपली कट्टरता बाजूला ठेवणे गरजेचे आहे. सर्व सर्वहारा वर्गाचा एकत्रित लढा लढणे आवश्यक आहे. तरच या देशात ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही नष्ट होऊन समतेचे राज्य प्रस्थापित होईल. यासाठी आंबेडकरवाद्यांनी वर्गीय लढा लढताना लाल झेंडा हातात घ्यावा. तर कम्युनिस्टांनीही जातीअंताचा लढा लढताना निळा झेंडा हातात घ्यावा. आणि एक साथ दोन्ही लढे एकत्र लढून क्रांती यशस्वी करावी. शेवटी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित झाल्याशी मतलब.

शिकलेले तरुण चळवळीत वैचारिक गोंधळ माजवत आहेत.

आपल्याला माहित नसलेली गोष्ट माहित करून घ्यावी. किंवा आपणास न समजलेली बाब विचारवंताकडून किंवा चळवळीतील सिनियर कार्यकर्त्यांकडून समजून घ्यावी. ही प्रवृत्ती सामान्य चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते.

मात्र आजकाल समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास इ. विषय घेवून BA, MA, MSW इ. शिकलेले काही तरुण आहेत. की ज्यांना चळवळीचा कसलाही अनुभव नाही. हे उच्चशिक्षित तरुण चांगले वकील, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर आणि व्यवस्थापक बनलेले आहेत. असे हे तरुण स्वत:ची अक्कल नको तिकडे पाजळू लागले आहेत. आणि असे करून ते चळवळीचा घात करू लागले आहेत. शिकून शहाणे झालेले हे तरुण. यांना आपल्या ज्ञानाचा आणि डिग्रीचा इतका अहंकार आहे. की ते लोक चळवळीतील कार्यकर्त्याकडून काही बाबी समजून घेणे कमीपणाचे समजतात.

ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे चळवळीत घालवलेली आहेत. आणि ज्यांनी अनेक पुस्तके वाचलेली आहेत. अनेक व्याख्याने, चर्चासत्रे, परिषदा, मेळावे, बैठका, लढे, आंदोलने, मोर्चे, धरणे इ. मध्ये आपला सहभाग नोंदवून आपली वैचारिक लेवल उंचावली आहे. अशांनाच हे उच्चशिक्षित लोक शहाणपणा शिकवू पाहतात. दुसऱ्या बाजूने ऐकून घेण्याची, किंवा मुद्दा समजून घेण्याची प्रवृत्ती यांच्यामध्ये दिसून येत नाही. तर माझे तेच खरे आहे. आणि ते सिद्ध करण्याचा खटाटोप अशी मंडळी सतत करतात. असे उच्चशिक्षित आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तरुण चळवळीसाठी मोठा अडथळा ठरत आहेत. यांनी स्वत: काहीही समजून घेतलेले नाही. तरी एरव्ही निष्क्रिय असलेले हे कन्फ्युज लोक ज्युनियर कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात मात्र फार सक्रीय आहेत.

या सर्व बाबींचा विचार करता. या उच्चशिक्षित तरुणांना आवर घालणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपली प्रबोधन मोहीम इतकी तीव्र करायला हवी. की असा वैचारिक गोंधळ माजवणारे लोक एकटे पडून संपून जातील. आणि दुसऱ्या बाजूला चळवळीची मोट बांधायला हवी. आणि एकत्रित लढा लढून क्रांती यशस्वी करायला हवी.

क्रांती : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांत
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

 

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *