लेनिन पेरियार आंबेडकर

लेनिन पेरियार आंबेडकर : पोहोचवू आता घरोघर

 

लेनिन पेरियार आंबेडकर : पोहोचवू आता घरोघर

लेनिन पेरियार आंबेडकर आता घरोघर पोहोचविण्याची गरज निर्माण झाली आहे.  त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. वास्तविक नववर्षाची सुरुवातच मनुवाद्यांनी भीमाकोरेगाव हल्ल्या पासून केली. त्याही पूर्वीच्या उना गुजरात, आणि मुजफ्फरनगर उत्तरप्रदेश च्या घटनांची जखम अजूनही ओलीच आहे. मुस्लीम आणि आदिवासींवर होणारे हल्ले ही थक्क करून सोडणारे आहेत. किलो दोन कोलो तांदूळ चोरले. म्हणून एका भुकेल्या आदिवासीला केरळमध्ये ठेचून मारल्याची घटनाही काल परवाच घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या विशिष्ट समाज प्रवृत्तीचा (ब्राह्मणी वृत्तीचा) जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच.

आज त्रिपुराच्या बातम्या पहात होतो. मन अगदी विचलित झालं. एकतर माणिक सरकार पडेल आणि त्या जागी भाजप सरकार येईल हीच बाब खूप अस्वस्थ करणारी होती. भाजप वाल्यांचे असली चेहरे समोर येत असताना मन अगदी अस्वस्थ होत होत. लेनिनचा पुतळा तोडला जाणे. आणि त्याच बरोबर कम्युनिस्टांच्या घरावर हल्ले, मारहाण, जाळपोळ, पार्टी कार्यालयावर हल्ले इ. बाबी बघून मन अगदी सुन्न झाले.

ही घटना ताजी आहे तोपर्यंतच या भाजप वाल्यांनी तामिळनाडू मध्येही पेरियार यांचा पुतळा तोडून टाकला. आता उत्तर प्रदेशातही भाजपवाल्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तोडून टाकला. आणि आता गांधीजींचा देखील पुतळा यांनी केरळ मध्ये तोडला. दलित, शोषित, पिडीत, कष्टकरी यांच्या प्रतिमांना उद्ध्वस्थ करण्याचा जणू सपाटाच भाजपवाल्यांनी लावला आहे.

सरकार बदलल्याच्या दुसऱ्याच दिवशी असे हल्ले होणं. पुतळा पाडला जाणं. यावरून हे लक्षात येत की,किती सत्तेचा माज आला आहे. किती उतावळेपणा करत आहेत. खूप चीड आली होती. आणि वाटले हे सर्व पूर्ववत करावं. उलथवून टाकाव क्षणात या भाजप सरकारला. आणि पुन्हा कम्युनिस्टांच सरकार आणावं. लेनिन पेरियार आंबेडकर यांच्या विचारांचं राज्य आणावं. खूप विचार करत होतो. कोण जबाबदार आहे या सगळ्याला?

EVM मशिन :

खरंच भारतातील, त्रिपुरातील लोकांनी भाजपला निवडून दिलंय? की ही  EVM ची कमाल आहे? EVM ची कमाल आहे हे समजतंय. पण मग एवढ सगळ होवूनही जनता गप्प का? काय झालंय जनतेला? जनतेला काहीचं देणघेण नाही? जनता हतबल आहे? की जनता भाजपा वाल्यांच्या बाजूची आहे?

भारतभर आणि जगभर EVM मशिन हॅक होते. भ्रष्ट केली जावू शकते. हे सिद्ध झालेलं आहे. अनेकवेळा या बाबी रंगेहाथ पकडल्या गेल्या आहेत. अनेक पक्षांनी निवडणूक आयोगाला यासंबधात पत्र लिहिले आहे. अगदी सुप्रीम कोर्टातही याचिका सुरु आहेत. काही पक्ष आणि संघटना या विषयाला धरून आंदोलन ही करत आहेत. तरीही निवडणूक आयोग का ऐकत नाही? आणि का बॅलेट पेपर द्वारे मतदान घेत नाही? संशयाला खूप मोठा वाव आहे की निवडणूक अधिकारी भ्रष्ट आहेत. त्यांना या देशात भाजपचे सरकार आणायचे आहे. आणि लोकमत बाजूला पडून भाजप सत्तेत यावं. म्हणून ते जाणून बुजून मशिन मध्ये घोटाळे करत आहेत. हे केवळ पैशासाठी होत नसून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करू पाहणाऱ्यांच्या मनातील हे षडयंत्र आहे. आणि जर हे मशिन बंद पाडणारे राष्ट्रव्यापी आंदोलन उभे राहिले नाही. आणि मशिन बंद पाडले नाही. तर या देशात प्रतिक्रांती होण्यावाचून राहणार नाही. लेनिन पेरियार आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आणायचे असेल तर EVM मशिन बंद करावेच लागेल.

कम्युनिस्टांचे अपुरे आकलन किंवा हेकेखोरपणा :

जात या प्रश्नाचे कम्युनिस्टांचे आकलन अपुरे आहे. सर्वच प्रश्नांची उत्तरे यांना मार्क्स आणि लेनिन कडून हवी आहेत. यांच्या हे लक्षातच येत नाही. की क्रांतीसाठी जसा चीन मध्ये माओ हवा आहे. तसे भारतात फुले आंबेडकर हवे आहेत. यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या विचारांना दूर ठेवलं. समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही.असाही आरोप केला जातो की, उच्चवर्णीय ब्राह्मण कम्युनिस्टानी हे जाणीवपूर्वक केले. दलित, शोषितांना वर्गीय लढ्यात गुंतवून ठेवायचे. मात्र त्यांना जातीअंताच्या लढ्यापासून दूर ठेवायचे. यासाठी कम्युनिस्ट पक्ष वापरायचा. जातीअंत झाल्याशिवाय जातीत विभागलेला कामगार एक होईल का? झाला तरी ती एकी टिकेल का? आणि कामगार एक झाला नाही तर क्रांती यशस्वी होईल का? हे कम्युनिस्टानी लक्षातच घेतले नाही. त्यामुळेच हे फेक लोक आहेत असे कुणी म्हटलं तर काय उत्तर द्यावं हे सुचत नाही. क्रांती साठी आपणास लेनिन पेरियार आंबेडकर यांच्या एकजुटीच्या विचारांचे राज्य आणावे लागेल.

आंबेडकरवाद्यांचे अपुरे आकलन किंवा हेकेखोरपणा :

जसे कम्युनिस्टांचे जात या विषयाचे आकलन अपुरे आहे. तसेच आंबेडकरवाद्यांचे वर्ग या विषयाचे आकलन अपुरे आहे. बाबासाहेब सोई पुरता वापरायचा. गैर सोयीचा भाग फेकून द्यायचा किंवा लक्षच द्यायचे नाही. बाबासाहेबांची वर्गअंता विषयी काय भूमिका होती? कम्युनिस्टाबद्दल बाबासाहेबांची नेमकी मते काय होती? आणि ती तशी का होती? त्याचा अचूक अर्थ काय? हे समजूनच घ्यायचे नाही. मार्क्स, लेनिन चे नाव घेतले की विंचू चावल्या सारखे करायचे. आर्थिक प्रश्न, शेतकरी, शेतमजूर, कामगार, असंघटीत कामगार, छोटे व्यावसायिक यांचे वर्गीय प्रश्न आंबेडकरवाद्यांनी कधी समजूनच घेतले नाहीत. सोडवणे तर दूर. कायदे मंत्री असताना एखाद्या कम्युनिस्ट नेत्याप्रमाणे बाबासाहेबांनी कामगारांचे प्रश्न सोडवले. याचेही भान हे लोक ठेवत नाहीत. भक्ती एवढ्या स्तरावर पोहोचते की, बाबासाहेबांचे विचार आपणच पायदळी तुडवतोय याचेही मग भान सुटते.

कम्युनिझमला बाबासाहेबांचा विरोध होता की, कम्युनिस्टांच्या हिंसक मार्गाला? हेच समजून घेतले जात नाही. बाबासाहेबांच्या बुद्धामध्ये मार्क्सचा समावेश आहे. आणि कम्युनिझमचाही समावेश आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. एका अर्थाने पेरियार आणि भगतसिंग प्रमाणेच बाबासाहेब आणि बुद्ध हे भारतीय कम्युनिस्ट आहेत. यामुळे जातीअंत आणि वर्गअंत यासाठी लढणाऱ्या दोन प्रमुख राजकीय घटकांची एकी होत नाही. आणि त्यामुळे राजकीय टोक गाठता येत नाही. दलितांनी आता विभाजित न होता लेनिन पेरियार आंबेडकर यांच्या एकत्रीत  विचारांची मोट बांधणे आवश्यक आहे.

मुस्लीम समाज रस्त्यावर का नाही?

मुस्लीम लोक राजकीय दृष्ट्या जागरूक असून आपले शत्रू आणि मित्र कोण आहेत हे अचूकपणे ओळखतात. ही त्यांच्यातील जमेची बाजू आहे. आणि कोणाला मतदान करायचे आणि कोणाला नाही हे देखील ते उत्तमरीत्या जाणून आहेत.

भाजपचे सरकार आल्या पासून मुस्लिमांवर अनेक अत्याचार करण्यात आले. हिंदू मुस्लीम दंगली लावण्याचा खोडसाळपणा मनुवादी संघटना करत आहेत. बीफ (गाई चे मांस) खाणे, लव जिहाद इ. मुद्दे पुढे केले जातात. आणि मुस्लिमांना मारहाण, त्यांच्या कत्तली, बलात्कार, त्यांच्या घरांची, दुकानांची जाळपोळ करण्यात येते.

पूर्वी मुस्लीम समाज जशास तशी प्रतिक्रिया देत असे. मात्र आता तो खूप शांत झाला आहे. जशास तशी प्रतिक्रिया न दिल्याने दंगली घडविण्याचा मनुवाद्यांचा डाव उधळला जातो. हे खूप चांगले आहे. पण याचा लोकशाही मार्गाने निषेध व्हायला हवा. सरकारी कार्यालयापुढे संबधित अत्याचारीताना शिक्षा व्हावी. त्यांच्या वर कायदेशीर कार्यवाही व्हावी. म्हणून दबाव निर्माण करायला हवा. मात्र लोकशाही मार्गाने केली जाणारे आंदोलने इ. ची जाण अजूनही मुस्लीम समाजास आली नाही. किंवा त्यांनी त्यास अद्यापही सुरुवात केली नाही.

वास्तविक मुस्लिमांच्या प्रश्नांना राजकीय टोक येण्यासाठी मुस्लीम समाजाने आता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलने करायला हवीत. त्याशिवाय ही सरकारे वठणीवर येणार नाहीत.

आदिवासीमध्ये  राजकीय उदासीनता का?

आज वेगवेगळ्या समाज घटकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. आणि त्यांच्या निवारणासाठी लोक आंदोलने करत असतात. जसे की आदिवासी लोक आपल्या जमिन,जंगल आणि पाणी यावरील हक्कासाठी झगडत आहेत. जसजसे सरकार आणि बिगर आदिवासी लोक त्यांच्यावर हल्ले, अत्याचार करतील, त्यांना नागवतील. तसतसे त्यांचे लढे तीव्र होत जातात. लोकशाही मार्गाने ते आंदोलने करतात. मुंबई, दिल्ली येथे मोठमोठाले मोर्चे काढतात. पदयात्रा काढतात. प्रसंगी हातात बंदुका घेवून काही आदिवासी नक्षलवादी देखील बनले आहेत.

मात्र असे असले तरी. नक्षलवादी आदिवासी वगळता अद्यापही आपला राजकीय शत्रू कोण आणि राजकीय मित्र कोण हे आदिवासी ओळखू शकले नाहीत. त्यामुळे राजकीय शत्रू असणारे पक्ष – संघटना मध्ये काम करतात. त्यांना मतदान करतात. असे आदिवासी दिसून येतात. भावी काळात आदिवासी संघटनांनी याकडे गांभीर्यपूर्वक पहावयास हवे. आणि आदिवासींच्या राजकीय शिक्षणाचा कसून प्रयत्न व्हायला हवा.

भटकेविमुक्त राजकीय चळवळीपासून अलिप्त

दलित, आदिवासी नंतर चटकन लक्षात येणारा शोषित, पिडीत समाज घटक म्हणजे भटके विमुक्त समाज होय. दलित आदिवासी किमान काही अंशी तरी चळवळीशी संबधित आहेत. त्यांना किमान काही अंशी तरी राजकीय जाण आहे. मात्र भटके विमुक्त समाज अद्यापही या सर्व प्रक्रियेच्या संपूर्ण बाहेर आहे. कोलाटी, डोंबारी, माकडवाले, वैदू, फासेपारधी, वडार, कैकाडी इ. काही जाती सतत भटकत आहेत. शिक्षणाचा अभाव. त्यामुळे आपल्या प्रश्नांची, हक्कांची जाण नाही. हक्क कसे मिळवावे याचे ज्ञान असणे तर फार दूरची गोष्ट. शिक्षण नसल्यामुळे सक्षम नेतृत्व नाही. अन्य समाज यांचे नेतृत्व करू शकत नाही. कारण हे लोक सतत भटकत असतात. काही जाती अजूनही रानटी जीवन जगत आहेत. यांना स्वत:च्या प्रश्नांची जाण करून देणे आवश्यक आहे. पुरेसे संघर्षाला पेटून उठल्यानंतर त्यांना लोकशाही मार्गाने आंदोलने कशी करावीत? आणि आपले हक्क कसे पदरात पाडून घ्यावेत? हे शिकवायला हवे. त्यांना त्यांच्या राजकीय शत्रू आणि राजकीय मित्रांची जाण करून द्यावी लागेल. आणि योग्य असे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करावी लागेल.

ओबीसीमध्ये राजकीय आकलनाचा अभाव :

अत्याधुनिक यंत्रे आणि भांडवलदारांचे मोठमोठाले उद्योग यामुळे ओबीसींचे परंपरागत उद्योग नष्ट होत आहेत. महागडे उच्चशिक्षण, आणि नोकऱ्यांचा अभाव. व्यवसायातील तीव्र स्पर्धा आणि टिकाव लागण्याची शक्यता कमी. अशा कात्रीत हा समाज अडकला आहे. शेती करायला जमिनी नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच्या विळख्यात हा समाज आहे. मात्र ५२ % एवढ्या मोठ्या समुदायाने एकत्र येणे हीच मोठी समस्या आहे. आणि एकत्र आले तरी समान समस्यासाठी आंदोलन करणे ही दुसरी समस्या. शिवाय आपले राजकीय शत्रू आणि मित्र कोण हे यांना ओळखताच येत नाही. बहुतांशी प्रस्थापित, उच्चवर्णीय / वर्गीय पक्षांनाच हे आपले पक्ष समजतात. तर बऱ्याचदा हे लोक स्वत:ला उच्चवर्णीय असल्याचे समजून स्वजात-वर्गाच्या विरोधी जात-वर्गाच्या बाजूने उभे राहताना दिसतात.

सर्वहारा वर्गाच्या लढ्यांना राजकीय टोक का नाही?

याचा दोष बऱ्याचदा कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांना जातो. शेतकरी, कामगार, असंघटीत कामगार यांचे लढे आपण उत्तम लढविले. मात्र या वर्गाचे राजकीय शिक्षण ज्या प्रमाणात आणि जसे करायला पाहिजे होते तसे झाले नाही. जनतेला आपले राजकीय मित्र आणि शत्रू कळत नसतील. तर आपणही यामध्ये दोषी आहोत. आता तरुणांचे मोठ्या प्रमाणात केडर स्वरूपात ट्रेनिंग प्रोग्राम सुरु करण्याची गरज निर्माण झाली आहे. आशा वाटते की भविष्यात असे अनेक केडर कम्युनिस्ट पक्ष आणि संघटना जागोजागी उभारतील.

समग्र सर्वहारा वर्गाच्या एकजुटीचा अभाव :

यामध्ये कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी अशी उभी दुफळी तर आहेच. पण त्याशिवाय स्वमग्न तरुण पिढी ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.स्वत:, स्वत:चे कुटुंब आणि फार फार तर स्वजात यापुढे आम्हास काहीच दिसेनासे झाले आहे. इतरांचे मुडदे पडले, बलात्कार झाले, घरे जाळली किंवा वाट्टेल ते झाले तरी साधे उफ देखील आम्हास करवत नसेल तर अशा लोकांना माणूस म्हणावे काय ? असा प्रश्न पडतो. लोकांना थोडे संवेदनशील बनवण्यासाठी काहीतरी करायलाच हवे आपल्याला आता… काय करता येईल??? लेनिन पेरियार आंबेडकर घरोघरी कसे पोहोचवता येतील?

Image source : https://commons.wikimedia.org/wiki/File:Dr.Ambedkar_with_Periyar.jpg

लेनिन पेरियार आंबेडकर : पोहोचवू आता घरोघर
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *