मार खाल्ल्याशिवाय

मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का?

मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का?

मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का? याविषयी सविस्तर चर्चा करूयात. नुसते झिंदाबाद आणि मुर्दाबादचे नारे म्हणजे आंबेडकरवाद नव्हे. नुसते निळे झेंडे, नीळ, आणि जयभीम म्हणजे आंबेडकरवाद नव्हे. नुसते मोर्चे, आंदोलने आणि धरणे, उपोषणे म्हणजे आंबेडकरवाद नव्हे. नुसते आरक्षण, सवलती, आणि शिष्यवृत्ती म्हणजे आंबेडकरवाद नव्हे. नुसते अॅट्रोसिटी अॅक्ट आणि संविधान बचाओचे नारे म्हणजे आंबेडकरवाद नव्हे.

तर आंबेडकरवाद म्हणजे स्वत:ला बदलवणे. आणि त्या आधारे व्यवस्थेला बदलवणे. व्यवस्थेनी बदलले पाहिजे मात्र जर स्वत:मध्ये बदल घडवायची तयारी नसेल. तर अशी व्यक्ती आंबेडकरवादी आहे असे म्हणता येणार नाही.

जग बदलण्याची सुरुवात स्वत:पासून

जग बदलण्याची सुरुवात स्वत:पासून होते. आणि जग बदलवणे किती कठीण आहे हे स्वत:ला बदलविताना ध्यानात येते. दुर्दैवाने भारतीय समाज मग एससी, एसटी, ओबीसी का असेना बाबासाहेबांच्या मार्गावर चालताना दिसत नाही. संविधानाने दिलेले हक्क, अधिकार, सवलती, आरक्षण, तर घ्यायचे मात्र आंबेडकरवादाच्या विरोधी विचारसरणी आणि वर्तणुकीशी आपली नाळ तोडायची नाही.

अशी दुटप्पी वृत्ती बहुजन समाजात दिसून येत आहे. त्यामुळे अशा व्यक्ती आणि या व्यक्तींपासून बनलेला समाज स्वत:च्या आणि आपल्या भावी पिढ्यांच्या नाशास कारणीभूत होत आहे. रसातळाला जाण्यात स्वत:च भाग पडत आहे.

दु:खाची कारणे दूर करा

दु:ख मुक्त, शोषण मुक्त होण्यासाठी  बाबासाहेबांनी काही मंत्र बहुजन समाजास दिले आहेत. आपण हे लक्षात घेवूयात की बाबासाहेबांची चळवळ ही बुद्ध तत्वज्ञानावर आधारलेली आहे. बुद्ध म्हणतो जगात दु:ख आहे, दु:खाला कारण आहे, आणि जर हे कारण आपण दूर केले, तर दु:ख दूर होते.

ज्याला कोणाला दु:ख आहे त्याने आपआपल्या दु:खाची यादी बनवावी. त्यामागील कारणे शोधावीत आणि ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न करावा. बाबासाहेबांनी बहुजनांच्या दु:खाची कारणे शोधली. त्यातील काही व्यवस्थेशी संबंधित आहेत. तर काही त्या व्यक्तींशी संबंधित आहेत.

मनुस्मृती सारखे कायदे, राजकीय ताकद नसणे इ. बहुजनांच्या दु:खाची व्यवस्थेशी संबंधित कारणे आहेत. त्यावर त्यांनी राज्यघटना लिहिली. आणि मतांचा आणि निवडून येण्याचा अधिकार बहुजनांना प्राप्त करून दिला. लोकशाही मार्गाने आंदोलने करण्याचा अधिकार दिला. अर्थात त्यांनी व्यवस्थेशी संबंधित कारणे दूर केली.

दु:खाची कारणे

पण खरा मुद्दा आहे दु:ख मुक्त होण्यासाठी व्यक्तीनीही आपआपल्या पातळीवर आपल्या दु:खाची कारणे दूर करण्याचा. व्यक्तीची जात, व्यक्तीचा धर्म, व्यक्तीचे गाव, व्यक्तीचा गलिच्छ / अप्रतिष्ठित व्यवसाय, अस्वच्छ राहणीमान, व्यक्तीच्या समाज अमान्य खाण्यापिण्याच्या सवयी, व्यक्तीचे अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसन, मानसिक गुलामी इ. बहुजनांच्या दु:खाची कारणे आहेत. आणि ती कारणे दूर करणे हे बऱ्याच प्रमाणात त्याच्या स्वत:च्याच हातात आहेत.

बौद्ध समाजाची प्रगती वेगाने का?

बाबासाहेबांच्या मार्गाने पूर्वाश्रमीचा महार आणि आताच बौद्ध समाज चालत आहे. चालण्याचा प्रयत्न करत आहे. तो आपली दु:खाची कारणे दूर करत चालला आहे. त्यामुळे बौद्ध समाजाची प्रगती वेगाने होत आहे. बाबासाहेबांनी व्यवस्थेशी संबधित कारणे दूर केली त्याचा लाभ सर्वच जण घेत आहेत. संविधान, आरक्षण, सवलती, शिष्यवृत्ती हे सर्वांनाच मिळत आहे. मात्र तरी केवळ बौद्ध समाजच इतरांना मागे टाकून वेगाने पुढे का झेपावत आहे?

याचे कारण बाबासाहेबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट हा समाज आत्मसात करत आहे. तिची अंमलबजावणी आपल्या जीवनात करत आहे. बौद्धांमधील सर्वच जण करत आहेत असे नाही. पण जे करत आहेत त्यांची संख्या मोठी आहे. आणि जे करत आहेत त्यांच्या जीवनात उत्तरोत्तर फरक पडत आहे हे निश्चित. हा समाज बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वागून आपली दु:खाची कारणे व्यक्तिगत पातळीवर दूर करत आहे. आणि म्हणून उत्तरोत्तर दु:खमुक्त होताना दिसत आहे.

परंपरागत, गलिच्छ, अप्रतिष्ठित व्यवसायांचा त्याग आवश्यक

बाबासाहेबांचे महापरीनिर्वाण होऊन आता ६० वर्षे होऊन गेली. तरी बौद्धेतर समाज स्वत:मध्ये बदल घडवायला तयार नाही. बाबासाहेबांनी मेलेली जनावर ओढून आणण्यास विरोध केला. ती मेलेली जनावरे कापून खाण्यास विरोध केला. त्यावेळी गावाने टाकलेला बहिष्कार, केलेले अत्याचार सहन करून त्यावेळच्या महार समाजाने आपला व्यवसाय आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. कारण मेलेले गलिच्छ जनावरे ओढून नेणारी आणि ते खाणारी, त्याच्या कातडीपासून वस्तू बनवणारी माणसे गलिच्छ समजली जात असत. याचा उघडपणे अस्पृश्यतेशी संबंध आहे.

आजही महाराष्ट्राबाहेरील दलित समाज मेलेली जनावर ओढून आणत आहे. त्याच्या कातडीचे व्यवसाय करत आहे. आजही भंगी समाज मानवी मैला हाताने साफ करत आहे. आणि गटारात उतरून गटारे साफ करत आहे. आणि अन्य दलित, दलितेतर समाजही आपआपल्या परंपरागत अप्रतिष्ठित व्यवसायांना चिकटून बसला आहे.

देर आए दुरुस्त आए

गुजरात मधील दलितांना गाडीला बांधून ब्राह्मणवाद्यांनी दांडक्याने फटके दिले. गाडीला बांधून फरफटत नेले. तेंव्हा आता यांना अक्कल आली आहे. आणि मेलेली जनावरे ओढून आणण्याचा धंदा बंद करण्याची भाषा आता ते करू लागले आहेत.

अॅट्रोसिटी अॅक्ट हा सुप्रिम कोर्टाने कमजोर केला. आणि यानंतर मग आपले कसे होईल? या भीतीने वाल्मिकी समाज आता मैला हाताने साफ करणे, आणि गटारे साफ करण्याचे काम बंद करण्याची घोषणा करत आहे. असो देर आए दुरुस्त आए.

मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का?

तेंव्हा या सर्वांना म्हणावेसे वाटते, मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का? मार खाल्याशिवाय बाबासाहेब दिसणार नाहीत काय? त्यांचा मार्ग कोणता हे कळणार नाही काय? स्वत:हून दलित जातींनी आपआपले परंपरागत व्यवसाय (की जे अत्यंत गलिच्छ आणि अप्रतिष्ठित आहेत.) सोडून नवीन चांगल्या प्रतिष्ठित व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, कामधंद्यामध्ये पडायला काय हरकत आहे?

गलिच्छ नोकऱ्या करण्याचे डोहाळे लागलेत काय?

बौद्ध समाजातील कित्येक जण आजही संडास, मुताऱ्या साफ करणे, झाडू मारणे, कचरा उचलणे, गटारे साफ करणे इ. गलिच्छ कामे करत आहेत. का? तुम्ही पण फटके खायची वाट बघताय काय? कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये एवढा रोजगार आहे. सिक्युरिटीमध्ये रोजगार आहे. अन्य व्यापार, उद्योग, मजुरीचे काम आहे. ते सोडून गलिच्छ नोकऱ्या करण्याचे डोहाळे लागलेत काय?

भाकरीची नव्हे स्वाभिमानाची लढाई

लक्षात घ्या, बाबासाहेबांची लढाई ही स्वाभिमानाची आहे. भाकरीची नाही. भाकरीसाठी स्वाभिमान दावणीला बांधणारे तुम्ही लोक आंबेडकरवादी नाही आहात. मग तुम्ही कितीही जोरात जयभीम म्हणालात. किंवा कितीही निळे झेंडे उंचावलेत किंवा अंगभर नीळ फासून घेतलीत. तरी मी तरी तुम्हाला आंबेडकरवादी म्हणणार नाही.

दुसरा मुद्दा स्वच्छ राहण्याचा आहे. स्वच्छ अंघोळ, नीटनेटके कपडे, व्यवस्थित विंचरलेले केस, कापलेली नखे, नम्र आणि सभ्य भाषा या बाबीही लोकांनी स्वीकारायला हव्यात. ज्यांनी या बाबी स्वीकारल्या ते पुढे गेले. ज्यांनी नाही स्वीकारल्या ते लोक आजही नरकमय जीवनात सडत आहेत.

आपले अस्वच्छ, गलिच्छ व्यवसाय, गलिच्छ राहणीमान यामुळे सुशिक्षित, उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, समाज आपणास स्वीकारत नाही, जवळ करत नाही. ही सामान्य समज (कॉमन सेन्स) आपणास असायला हवी.

फासेपारधी समाजात अंघोळ न करण्याची प्रथा आहे. त्यांच्या अंगाचा अतिशय घाण वास येतो. त्यामुळे बसमध्ये किंवा बसस्टॉपवर त्यांच्या जवळही कुणी उभे रहात नाही.

लोकांना आपल्याशी हातमिळवणी करावीशी वाटावी, गळाभेट घ्यावीशी वाटावी, आपल्या घरातील अन्न आपल्या हाताने स्वीकारण्याची इच्छा व्हावी. यासाठी आपण आपले गलिच्छ व्यवसाय आणि गलिच्छ राहणीमान वाट्टेल ती किंमत मोजून सोडून द्यायला हवे. गटारे साफ करणाऱ्या, कचरा उचलणाऱ्या व्यक्तीशी शेक हँड कोण करेल? त्याच्या हातचे कोण कशाला खाईल?

बाबासाहेबांचा संदेश

वेळी बाबासाहेबांनी स्वच्छ अंघोळ करून या. कपडे स्वच्छ धुवून, जरूर तिथे शिवून या. महिलांनी केस नीट विंचरून या. असा सल्ला दलित समाजास दिला होता. हे आपण विसरता कामा नये.

त्याकाळातील तरुण पिढी बाबासाहेबांचे ऐकत असे. तसे वागत असे. मात्र दलित पँथरने पुढची पिढी बिघडवून ठेवली. केस वाढविणे, दाढ्या वाढविणे, भसाड्या भाषेत शिवराळ भाषणे करणे. यामुळे पुढच्या तरुण पिढीवर चुकीचे संस्कार झाले. की जे बाबासाहेबांच्या शिकवणुकीशी जुळणारे नाहीत. अशा लोकांना कोण इज्जत देईल?

तर तुमच्यावर होणाऱ्या अत्याचारास तुम्ही स्वत:च जबाबदार आहात.

आजही कित्येक दलित जाती मेलेली जनावरे ओढून आणत आहेत. कातडी सोलत आहेत. मृत मांस खात आहेत. अशांना मी तरी आंबेडकरवादी म्हणण्यास तयार नाही. अशा दलितांनी आपल्या कृतीतून आणि त्यागातून आपण आंबेडकरवादी आहोत हे सिद्ध करावे.

तुम्ही पोटापाण्यासाठी सोईचा बाबासाहेब स्वीकारणार असाल आणि गैरसोईचा नाकारणार असाल तर तुमच्यावर होणाऱ्या अत्याचारास तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. सुधारीत आंबेडकरवाद्यांनी तुमच्यासाठी मोर्चे काढावेत अशी अपेक्षा करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही.

शहराकडे चला

तिसरा मुद्दा आहे शहराकडे जाण्याचा. जातीव्यवस्था, अस्पृश्यता, पितृसंस्था या सर्व बाबी गावाशी संबंधित, सरंजामी म्हणजे जमिनदारीशी संबंधित आहेत. आधुनिक भांडवलशाही ही शहरात आहे. गावे, सरंजामशाही नष्ट करण्याचे निसर्गदत्त काम ती करत आहे. करत राहील. सोबत जातीप्रथाही संपुष्टात येईल.

यासाठी दलित समुदायाने शहराकडे येवून भांडवलदारांच्या कारखान्यात कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे. यामुळे जातीप्रथेचा आर्थिक आणि भौगोलिक पाया ठिसूळ होतो. कामगार म्हणून संघटीत होऊन एका बाजूला स्वतंत्र मजूर पक्षाप्रमाणे दलित वर्ग कामगार आणि सामान्य वर्ग कामगार असे प्रश्न हाताळावेत. लढे आंदोलने देवून समाजवाद प्रस्थापनेत आपला हातभार लावावा. हे शहराकडे चला या नाऱ्यामागील कारण आहे.

केवळ इतकेच नव्हे तर गावाकडे दलितांची ४ किंवा ५ घरे असतात. त्या घरांवर हल्ले करणे, अत्याचार करणे, बहिष्कार टाकणे हे गावातील बहुसंख्य सरंजामी समाजास सहज शक्य आहे. शहराकडे येवून संघटीत झाल्यास एक मोठा समाज एकवटला जातो. आणि मग बहुसंख्येत परावर्तीत झालेल्या या समाजास मग हात लावण्यास कोण धजावत नाही.

शिक्षण आरोग्य, रोजगार आणि राहणीमान उंचावण्याच्या अन्य सुविधा या फक्त शहरात उपलब्ध आहेत. म्हणून मोठ्या प्रमाणात शहराकडे येण्याची गरज आहे. जे शहराकडे आले ते विकसित झाले, होत आहेत हे सांगण्याची गरज नाही. गावाकडील सर्व आंबेडकरवादी चळवळ ही मुंबईवाल्यांच्या जीवावर आहे हे सांगणे न लगे. शहरात माणसाचा शैक्षणिक, आर्थिक आणि बौद्धिक विकास होतो. त्याचा फायदा अन्याय अत्याचारांवर दाद मागण्यासाठी होतो.

मार खाल्ल्याशिवाय हे सुधारणार नाहीत.

मात्र अद्यापही अनेक दलित लोक खेड्यात राहून पाटलाच्या शेतावर मजुरी करणे पसंद करतात. आणि मार खातात. दोन डगरींवर पाय ठेवल्यावर अजून दुसरे काय होणार? गावात अशा खितपत पडलेल्या दलितांनाही आंबेडकरवादी म्हणण्यास मी तयार नाही.

त्यांनी आपली घरे, जमिनी विकून शहरात घरे, दुकाने विकत / भाड्याने घ्यावीत. व शहरात रहावे. पण ते ऐकत नाहीत. मग अशांनीही अत्याचार झाल्यावर तिकडेच मरावे. मार खाल्ल्याशिवाय हे सुधारणार नाहीत. उगाच शहरी आंबेडकरवाद्यांना वेठीस धरू नये.

मुद्दा बौद्ध धर्मांतराचा

चौथा मुद्दा बौद्ध धर्मांतराचा आहे. मागे कांशीरामजीनी बौद्ध धर्मांतराची घोषणा केली होती. पण दुर्दैवाने बौद्ध धर्मांतराचा दिवस येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. पुढे मात्र धर्मांतर होऊ शकले नाही. मायावतींनी अनेकदा लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारण्याची धमकी ब्राह्मणवाद्यांना दिलीय. पण अद्यापही स्वीकारलेला नाही. जिग्नेश मेवानीने तर मुस्लीम धर्म स्वीकारण्याची धमकी दिलीय.

बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत, अशोक कालीन भारताप्रमाणे पुन्हा धम्मक्रांतीकडे जाण्याचे त्यांचे पाऊल ज्यांच्या लक्षात येत नाही. जे या कामात जाणून बुजून दिरंगाई किंवा दिशाभूल करत आहेत. अशा लोकांनाही मी खरे आंबेडकरवादी म्हणायला तयार नाही.

उत्तरप्रदेशात ब्राह्मणवाद्यांनी संत रविदास आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यांना काळे फासले. मुर्त्या तोडल्या. दलितांची घरे जाळली, खून केले. तेंव्हा आता यांना जाग आलीय आणि घरातील देव घराबाहेर काढून बुद्ध धम्म स्वीकारण्याच्या मार्गावर ते चालू लागले आहेत. अद्याप स्वीकारलेला नाही.

मार खाल्ल्याशिवाय अक्कल येणार नाही का?

म्हणजे मार खाल्ल्याशिवाय अक्कल येणार नाही का? तोपर्यंत ब्राह्मणांचीच गुलामी करत राहणार काय? महाराष्ट्रातही मातंग, चर्मकार, ढोर, भंगी व अन्य दलित जाती अद्यापही बुद्ध स्विकारण्यास तयार नाहीत.

स्वत:वर अत्याचार झाल्यावर मग बाबासाहेब आणि आंबेडकरवाद्यांची आठवण येते. तोपर्यंत ब्राह्मणी देव पूजा आणि ब्राह्मणी गुलामीत हे मशगुल राहतात. अशा मानसिक गुलामांचेही मांडलिकत्व आंबेडकरवाद्यांनी स्वीकारलेले नाही. हे यांना ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे.

स्वत:ची लढाई स्वत:लाच स्वबळावर लढावी लागेल. त्यासाठी स्वत:मध्ये बदल आणि त्याग करण्याची तयारी ठेवावी लागेल. अन्यथा आंबेडकरवाद्यांनी भटाळलेल्या दलितांसाठी कितीही पिढ्या खर्ची घातल्या तरी त्यांची प्रगती होवूच शकणार नाही.

आशा वाटते मार खाऊन का होईना दलित जाती लवकरात लवकर सुधारोत. मोदी, भिडे आणि त्यांच्या ब्राह्मणवादी संघटनांचे आणि जातीयवाद्यांचे खूप खूप आभार. असेच चांगले सडकून काढा या गुलामांना. त्याशिवाय त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव होणार नाही. मार खाल्ल्याशिवाय ते सुधारणार नाहीत. आणि ते बंड करून उठणार नाहीत.

फुटीरतेच्या शापावर भीमा कोरेगावचा हल्ला हे उत्तर

महाराष्ट्रातील दलितांनाही फुटीचा शाप लागला होता. याला जनताच जबाबदार. कोणा एका बुद्धिमान, कर्तुत्ववान, इमानदार नेत्याच्या मागे उभे राहायचे सोडून प्रत्येक नेत्याच्या मागे हे धावत सुटले.

आपल्या फुटीर वर्तनाने दलित जनतेने आपली राजकीय, आंदोलनात्मक ताकद घालवून घेतलीच. शिवाय इज्जतही घालवून घेतली. आणि स्वत:चे आणि आंबेडकरी चळवळीचे हसे करून घेतले. भीमा कोरेगावला हल्ला झाला. तेंव्हा मार खाल्ल्याशिवाय यांना अक्कल आली नाही. आणि आता मग हे सगळे लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभे राहिले.

शिकुयात आपण त्यांच्याकडून, शहाणपणाच्या गोष्टी चार

तिकडे दलितांच्या मागून भटके विमुक्त सुधारू लागले. आंबेडकरवादाच्या मार्गाने हळूहळू चालू लागले. आणि विशेष म्हणजे मार न खाता. खरंच त्यांच खूप कौतुक वाटत आहे.

वैदू समाजातील दुर्गा गुडीलेने यावर खूप काम केले आहे. जात पंचायती नष्ट करण्यासाठी तिची अविरत धडपड चालू आहे. इकडे कोल्हाटी समाजानेही मुलीना तमाशात नाचवणार नाही. हा निर्णय घेवून जात पंचायती बंद केल्या आहेत.

लक्ष्मण मानेंच्या पाऊलावर पाऊल ठेवून अनेक भटक्या विमुक्तांनी बुद्ध धर्मही स्विकारला आहे. शिक्षण घेत आहेत. आपण काहीतरी बोध घेवूयात त्यांच्याकडून. शिकुयात आपण त्यांच्याकडून, शहाणपणाच्या गोष्टी चार.

Image source : https://commons.wikimedia.org/wiki/File:MANUAL_SCAVENGING_1323873g.jpg

मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही का?
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

 

 

 

 

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *