Me too Campaign

Me too Campaign – Human Liberty ची भूमिका

Me too Campaign – Human Liberty ची भूमिका

Me too Campaign बद्दल Human Liberty ची भूमिका पुढील प्रमाणे आहे. हॉलीवूड पासून सुरु झालेला Me too Campaign चा प्रवास बॉलीवूड मार्गे भारतात येवून पोहोचला. तनुश्रीने सुरु केलेले Me too Campaign चे वादळ बघता बघता सर्व हिंदी चित्रपट सृष्टीत फैलावले.

सुरुवात बोलण्या पासून

मुली आणि महिला बोलत्या झाल्या. हातातील स्मार्ट फोन आणि स्वस्त मोबाईल डाटा याने केलेली ही किमया. शिक्षणाने आलेले धाडस आणि कमावतेपणा मुलींना बोलते करत होता. भले आज उच्चभ्रू समाजातील, उच्च मध्यमवर्गीय, उच्चशिक्षित मुली महिला बोलत आहेत. पण कुठे तरी बोलायला सुरुवात झालीय हे हि नसे थोडके. शेवटी सुरुवात बोलण्या पासून होते. आणि त्याला धाडस लागतं. आणि ते या महिला दाखवू लागल्यायत.

Me too Campaign संदर्भातील असंख्य प्रकार

आपण बोलत नसलो तरी Me too Campaign संदर्भातील असंख्य प्रकार आपण सार्वजनिक ठिकाणी नेहमी पाहतो. गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यावर, ट्रेन मध्ये, बस मध्ये काही लफंगे पुरुष स्त्रियांशी कसे वागतात हे नेहमी पाहतो. फक्त आपण बोलत नाही. स्त्रियांना उगाचच स्पर्श करणे, धक्के मारणे, टोमणे मारणे, चेष्टा करणे हे प्रकार सर्रास घडतात.

फक्त अनोळखी लोकच नाही तर ओळखीचे मित्र, नातेवाईक लोकही असेच वागतात. अलीकडे वाढदिवसाला तोंडाला केक फासण्याचे आलेले फॅड असुदे किंवा रंगपंचमी असू दे. प्रत्येक ठिकाणी असे चान्स मारणारे नग निश्चित असतातच. द्विअर्थी बोलणे हा देखील त्यातलाच एक प्रकार.

हे सर्व आपण सार्वजनिक ठिकाणी पाहतो. मग ऑफिस, कार्यालयीन जागा इथे खूप काही घडत असणार. त्यातही बॉस, उच्च पदस्थ व्यक्ती आपल्या पॉवर चा गैरवापर करत असणार. मार्क वाढवून देतो म्हणून विद्यार्थिनीला प्रलोभन किंवा नापास करण्याची धमकी देणारे शिक्षक असोत.  प्रमोशनचे प्रलोभन देणारे किंवा कामावरून काढून टाकण्याची धमकी देणारे उच्च पदस्थ असोत. सर्व ठिकाणी मजबुरीचा फायदा हा उचलला जातो.

लैंगिक कारणावरून संधी नाकारणे हा देखील एक लैंगिक अत्याचारच

करियरचे मोठे टेन्शन असणाऱ्या दुनियेत तर हे सर्रास दिसून येते. मग फॅशनची दुनिया, फिल्म इंडस्ट्री, राजकारण इथे असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात चालतात. इथे दोघांवर अन्याय होतो. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झालेत अशी व्यक्ती किंवा जिने त्यास नकार दिला अशी व्यक्ती. टॅलेंट असूनही संधी मिळत नसताना डोळ्याने दिसत असते. आणि टॅलेंट नसणारी व्यक्ती रातोरात स्टार होताना डोळ्याने दिसत असते. लैंगिक कारणावरून संधी नाकारणे हा देखील एक लैंगिक अत्याचारच आहे असे मला वाटते.

फसलेल्या स्त्रिया

NGO, राजकीय पक्ष इ. ठिकाणी देखील असे प्रकार घडतात. पिडीत व्यक्तीचा किंवा कर्मचारी स्त्रीचा फायदा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे NGO चालक घेतच नसतील असे नाही. फक्त अजून अशा केसेस फारशा पुढे आलेल्या नाहीत. प्रोफेशनल सोशल वर्क च्या या युगात खूप काही घडत असणार. राजकीय प्रलोभने आणि त्यामधील फसलेल्या स्त्रिया अशी कित्येक उदाहरणे तुम्हाला भारतात सापडतील. बुवा तिथे बाया हे समीकरण काही नवीन नाही. एक असा बुवा बाबा दाखवा की ज्याच्या आश्रमात स्त्रियांवर लैंगिक अत्याचार घडत नाहीत.

परप्रांतीय

परप्रांतीय. हे एक वेगळेच समीकरण. सर्व जण नाहीत. पण एक दोघांमुळे सर्व प्रदेश बदनाम होतो. प्रचंड गरिबी मुळे मजबूर होवून तरुण मुंबईकडे धाव घेतात. रिक्षा टॅक्सी भाड्याने चालवायला घेतात. रात्र दिवस तिकडे काम करायचे. गाडीतच झोपायचे. सकाळी सुलभ शौचालयात फ्रेश व्हायचे. किंवा सोसायट्यामध्ये १२ – १६ – १८ तास काम करायचे. तिथेच झोपायचे. अशा अवस्थेत जगणारी हि माणसे. त्याला जोड काही जण झोपडपट्टीत राहतात. एका खुराडे वजा पत्र्याच्या खोलीत ८-१० जण राहतात. सर्वच बाबतीत झालेला कोंडमारा मग विकृत स्वरूपात बाहेर येतो.

मुलगे – पुरुष आणि Me too Campaign

फारसे बोलले जात नाही. मात्र अनेक तृतीयपंथी व्यक्तींनी आपल्या आयुष्यात लैंगिक अत्याचाराचा अनुभव घेतलेलाच असतो. child trafficking च्या बाबतीत प्रत्येक ३ बालकामागे २ मुली आणि एक मुलगा असतो हे वास्तव आहे. बायल्या म्हणून चिडवणे असो वा छेड काढणे असो आहे तर हा लैंगिक छळचं.

दलित आणि आदिवासी स्त्रियांचे भयानक वास्तव

त्याही पलीकडचे भयानक वास्तव आपणास पाहायला मिळते ते दलित आणि आदिवासी स्त्रियांच्या बाबतीत. छेडछाडी पासून ते बलात्कार पर्यंत. आणि सामुहिक बलात्कारापासून ते नग्न धिंड काढण्यापर्यंत. बलात्कारापासून ते गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसण्यापर्यंत. अत्यंत क्रूर आणि खुनशी लैंगिक कृत्ये सर्रास घडत आहेत आपल्या आजूबाजूला. आपले लक्ष कुठे आहे? हेच वास्तव आपण गुजरातच्या हिंदू मुस्लीम दंगलीच्या वेळी आणि असंख्य दंगलींच्या वेळी देखील पाहिले. अल्पसंख्यांक तरी कुठे सुटलेत यातून?

आई बहिणीवर लैंगिक अत्याचार करू अशा धमकी देणाऱ्या शिव्या

प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करताना आई बहिणीवर लैंगिक अत्याचार करू अशा धमकी देणाऱ्या शिव्या समाज वापरतो सर्रास. या शिव्या देखील लैंगिक अत्याचारच आहेत. मग त्या प्रस्थापितांनी दिलेल्या असोत वा विस्थापितांनी. शेवटी अत्याचार तर स्त्रीवरच होणार असतो.

कोण आहे जबाबदार?

कोण आहे जबाबदार? इथली जाती व्यवस्था असो किंवा ब्राह्मणी व्यवस्था असो. मूळ इथल्या मनुस्मृतीतच सापडेल. भटांनी इथले समाजमन विकृत बनवले आहे. स्वत:च्या बहिणीचे इतरांपासून संरक्षण करा आणि इतरांच्या बहिणींची छेड काढा हेच इथली संस्कृती आपणास शिकवत आलीय.

आपण चुकीचे संस्कार करतोय मुलांवर

लहानपणीच बंदुका, तलवारी, गाड्या, बॅट बॉल हे खेळ मुलग्यांसाठी तर भातुकली, बाहुली हे खेळ मुलींसाठी ही वाटणीच मुलांना पुढे जावून मवाली तर मुलींना अति सोशिक बनवत जाते. वाढलेल्या केसांच्या आणि फ्रॉक घातलेल्या मुलींना काय धड खेळता तरी निट येत असेल काय? याच मुली पुढे जावून घाबरट मुलींमध्ये रुपांतरीत होतात. तर मुले मवाल्यांमध्ये. आपण चुकीचे संस्कार करतोय. पिढ्यानपिढ्या पासून. हेच आपल्या लक्षात येत नाही आहे.

जिथे दाद मागायची ती पोलीस स्टेशने माणसाळलेली आहेत का?

अर्थात यावर दाद मागण्याची सुरुवात बोलण्यापासून होते हे अगदी खर आहे. बदनामीच्या भीतीने मुली स्त्रिया बोलत नाहीत. बोलून त्रासात जास्तच भर पडेल हि देखील भीती असतेच. शिवाय जिथे दाद मागायची ती पोलीस स्टेशने माणसाळलेली आहेत का? हा खरा प्रश्न आहे. तिकडे फक्त पैसे खाउंचा किंवा सत्ता धाऱ्यांचा बाजार आहे असाच समज सामान्य माणसांचा बनत चालला आहे. तिथे खरच दाद मिळते का? हाच खरा प्रश्न आहे. पोलीस हे बहुदा जातीवादी किंवा पुरुषी विचारांचेच असतात असेच वाटू लागले आहे.

स्मार्ट फोन आणि सोशल मिडीयानी जादू केली

पण स्मार्ट फोन आणि सोशल मिडीयानी जादू केलीय. नाही घेतली दाद तर नाही घेवू देत. पण आम्ही आमची सुख दु:खे शेअर करणार या मिडीयावर एकमेकांशी. आणि पाठिंबा देवून बळ देवू आम्ही एकमेकांना. ताकद वाढवू एकमेकांची. आणि लढू जसे जमेल तसे. हाच संदेश जणू Me too Campaign देतेय.

दलित, आदिवासी भटक्यांच्या वस्ती, तांड्या आणि पाड्यांवरील स्त्रियांपर्यंत

जरूर आहे ती या वास्तवाला अजून अधिक विस्तारण्याची. जरूर आहे हा मिडिया आणि स्मार्ट फोन आणि त्यातील डाटा दलित, आदिवासी भटक्यांच्या वस्ती, तांड्या आणि पाड्यांवरील स्त्रियांपर्यंत घेवून जाण्याची. जरूर आहे त्यांना हे शिकविण्याची की तुम्ही देखील दाद मागू शकता.

शेतमजुरीला जाताना, धुण्या भांड्याचे काम करायला जाताना, ऊस तोडीवर जाते वेळीला, इमारतींचे बांधकाम करायला जाताना होणाऱ्या अत्याचारांना वाचा आता फोडायला हवीय. अत्यंत भयानक वास्तव समोर येणार आहे. या समाजाच्या अस्सल क्रूर चेहऱ्याची चिरफाड होणे अजून बाकी आहे. Me too Campaign तिथेही आपले पाय बळकट करेल अशी आशा आहे. जरूर आहे ती यावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची.

बदनाम करून कार्यकर्तेपण संपविणे हा प्रस्थापितांचा एक डाव

जाता जाता शेवटचा पण एक महत्वाचा मुद्दा. चांगले पुरुष या Me too Campaign मुळे भरडले जाणार नाहीत याची आपण दक्षता घ्यावी. सामाजिक समतेसाठी जीवाचे रान करणाऱ्या पुरुषांना बदनाम करून त्यांना संपविणे हा देखील प्रस्थापितांचा एक डाव आहे. गौतम बुध्द सुध्दा यातून सुटले नाहीत तर आपण खूप सामान्य माणसे आहोत.

लक्ष्मण माने असो किंवा अन्य सामाजिक राजकीय कार्यकर्ते असोत. सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमीच अशा बदनामीला तोंड द्यावे लागते. कारण इज्जती शिवाय गमावण्यासारखे यांच्याकडे काहीच नसते. एकदा इज्जत गमावली की त्याचे कार्यकर्तेपण संपुष्टात येत जाते. आपण त्यांच्या ही पाठीशी उभे राहुयात. हा Me too Campaign चा गैरवापर नसून हा देखील एक लैंगिक अत्याचारच आहे असे मला वाटते.

Image source : https://www.flickr.com/photos/gipuzkoa/39238800080

Me too Campaign – Human Liberty ची भूमिका

Me too Campaign - Human Liberty ची भूमिका

लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *