रोहित वेमुलाने आत्महत्या करायला नको होती.

रोहित वेमुलाने आत्महत्या करायला नको होती.

रोहित वेमुलाने आत्महत्या करायला नको होती.

रोहित वेमुलाची संपूर्ण कहाणी समजून घेतल्यावर वाटते की, रोहित वेमुलाने आत्महत्या करायला नको होती. असे का वाटते. थोड सविस्तर पाहूयात.

रोहित वेमुला –

जन्म : ३० जानेवारी १९८९, मृत्यू : १७ जानेवारी २०१४. मृत्यूसमयी वय अवघे २५. हैदराबाद विश्वविद्यालयातील एक दलित विद्यार्थी. एक आंबेडकरवादी युवक. आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा (ए. एस. ए.) सक्रीय कार्यकर्ता. अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थी. कुटुंबातील सदस्य भाऊ आणि आई. आई शिलाईकाम करते. तर भाऊ विद्यार्थी आहे. रोहित एक विज्ञान, निसर्ग आणि कलेवर प्रेम करणारा प्रतिभावंत माणूस. संवेदनशील आणि बुद्धीमान व्यक्तिमत्व. रोहित महत्वपूर्ण राष्ट्रीय विषयावर बोलत असे, मृत्युदंड विरोधी त्याचे विचार होते.

घटना –

‘मुजफ्फरनगर बाकी है’ ही फिल्म दिल्ली युनिवर्सिटी मध्ये दाखवली जाणार होती. त्यास ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (ए. बी. वी. पी.) या जातीयवादी, फॅसीस्ट विद्यार्थी संघटनेनी विरोध केला. तर आंबेडकर स्टुडंट असोसिएशने फिल्मला पाठींबा दिला. आणि एबीवीपी ने फेसबुकवर एएसएला ‘गुंड’ असे संबोधले. सुशीलकुमार या एबीवीपीच्या प्रमुखाने स्वत:वर मारहाण झाली असल्याची खोटी केस एएसए विरुद्ध केली. त्यानंतर रोहित वेमुला सहित ५ जणांना एका सेमिस्टरसाठी निलंबित केले गेले. एएसएच्या विद्यार्थ्यांनी त्यास विरोध केला. युनिवर्सिटीच्या कुलगुरुने निर्णय मागे घेतला. आणि नवीन कमिटीद्वारे तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र कुलगुरू बदलला. नवीन आप्पाराव नावाच्या कुलगुरूने कमिटी गठण केली नाही. तर या ५ जणांना सरळ निलंबित केले. त्यांना हॉस्टेलमधून काढले. सार्वजनिक ठिकाणी येण्यास बंदी घातली. आणि त्यांची फेलोशिप रोखली. स्थानिक खासदाराने तर रोहित वेमुला आणि इतरांना जातीयवादी, अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी ठरविले. युनियन मिनिस्टर बंडारू आप्पारावला तसे पत्र लिहिले. आप्पारावने एम एच आर डी मिनिस्टर स्मृती इराणीला तसे पत्र लिहिले. आणि युनिवर्सिटी ते केंद्र सरकार असा दबाव जातीयवाद्यानी आणला. आपले मूल्यमापन माणूस म्हणून होत नाही. तर जात म्हणून होतेय हे रोहितला विलक्षणपणे खटकले. या प्रतिभावंतास ते सहन झाले नाही.

रोहितची मानसिक स्थिती आणि आत्महत्या

रोहितची मानसिक स्थिती यामुळे अस्वस्थ बनली. तो आतून व्याकुळ झाला. त्याने कुलगुरूला तसे पत्र लिहिले होते. वेळीच दखल घेतली असती तर पुढचा प्रसंग रोखू शकला असता. पण तसे घडले नाही आणि अखेर १७ जानेवारी २०१४ ला रोहितने गळफास लावून आत्महत्या केली.

पडसाद

ही घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली. खोलवर दु:ख आणि यातना देवून गेली. रोहितने मृत्युपूर्वी जे पत्र लिहून ठेवलंय ते अंगावर शहारे आणणार आहे. त्यावरून असं स्पष्टपणे जाणवतंय की हा किती प्रतिभावान होता. शास्त्रज्ञ, उमदा कलाकार आणि जिवंत मनाचा माणूस होता. त्याच्यावर झालेला हा अन्याय आणि त्यामुळे त्याने केलेली ही आत्महत्या. खरेतर युनिवर्सिटी आणि व्यवस्थेने केलेला रोहितचा हा खुनच होता. लोकांनीही तसाच अर्थ घेतला. युनिवर्सिटी आणि बाहेर असे देशभर आंदोलने झाली. त्याचे पडसाद संसदेतही उमटले.

कन्हैय्या पासून प्रकाश आंबेडकरापर्यंत सर्वांनी त्यानंतरच्या आंदोलनात सहभाग दर्शविला. त्याच्या कुटुंबीयानीही सहभाग दिला, देत आहेत. रोहित अजरामर झाला. अमर झाला.पुरोगामी विद्यार्थी आणि युवा संघटनेचा चेहरा झाला. पुढे जावून रोहितच्या कुटुंबीयांनी बौद्ध धर्मांतरही केले. यानिमित्ताने एबीवीपी, आरएसएस आणि भाजप चा असली चेहरा जनतेसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर आला.

चिंतन : रोहित वेमुलाने आत्महत्या करायला नको होती.

सर्व घटनाक्रम नीट जाणून घेतला की हे जाणवतंय की रोहितचं वय अवघं २५ होतं. तो बुद्धिमान आणि प्रतिभावंत होता. आणि मृत्युदंडाच्या शिक्षेस त्याचा विरोध होता. मग त्याने आत्महत्या करून स्वत:च स्वत:ला दंडित का केले? त्याने हे योग्य केले काय? कुणी कितीही हा खून होता असे म्हटले तरी मी त्यास खून म्हणणार नाही. मी एवढंच म्हणेन की आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. पण आत्महत्या ही रोहितने ठरवून केलेली कृती होती. आणि मी या कृतीचे समर्थन करत नाही, करणारही नाही. चळवळीला आत्महत्या करणारे कार्यकर्ते नको आहेत, चळवळीला संघर्ष करणारे कार्यकर्ते हवेत.

माघार घ्यायला नको होती.

माझी अपेक्षा होती की रोहित लढ्यात उतरलाच होता तर त्याने माघार घ्यायला नको होती. चिडून, बंडाने पेटून उठून जायला हवे होते. जेवढा जास्त अन्याय कराल तेवढा आगीने तप्त होवून प्रस्थापितांची राख करणारा आगीचा गोळा बनायला हवा होता. त्याने विद्यार्थी चळवळीचे स्वरूप धारण करायला हवे होते.

पी एच डी नसती झाली तरी चालली असती पण समाजाला असा आगीचा गोळा हवा होता. त्याच्या कुटुंबियांना तो हवा होता. त्याने आत्महत्या करून स्वत:, कुटुंब आणि समाजाचे नुकसान केले आहे. भले त्याची चळवळ त्याच्या मृत्युनंतर वेगवान, बलवान बनली असेल. पण त्याने जिवंत राहून ती तशी बनवायला हवी होती असेच मला वाटते. स्वत:ला संपवून त्याने चळवळीशी आणि क्रांतीशी द्रोह केला असेच मला वाटते.

मानसिकरित्याही कणखर बनवायला हवे.

आपण याठिकाणी हे लक्षात घावे की बाबासाहेबांनी विद्यार्थांना विद्यार्थीदशेत असताना चळवळीत सहभागी होवू नये. तर संपूर्ण लक्ष अभ्यासात घालावे असे सांगितले आहे. आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर संघटीत होवून संघर्ष करण्यास सांगितले आहे. मग मुकाट्याने आपण शिक्षणच घ्यायचे होते ना? काय गरज होती एबीवीपी विरुद्ध पंगा घ्यायची जर तो पंगा निभवायची धमक नव्हती तर? काय गरज होती संघटनेत सामील व्हायची? जर तो लढा शेवटाला घेवून न जाता स्वत:लाच संपवून घ्यायचे होते तर? स्वत:ला तयार करण्यात तो वेळ त्याने द्यायला हवा होता. केवळ पुस्तके वाचून माणूस घडत नाही तर माणसाने स्वत:ला मानसिकरित्याही कणखर बनवायला हवे.

अन्याय कुणावर नाही झाले? बाबासाहेबांवर नाही झाले का? दाभोलकर, पानसरे, कुलबर्गी यांची हत्या करण्यात आली. लक्ष्मण मानेंची बदनामी करण्यात आली. सचिन माळी आणि शितल साठेना नक्षलवादी ठरवून तुरुंगात ठेवले काही वर्ष. कन्हैय्या कुमार ला ही राष्ट्रद्रोही ठरवून तुरुंगात ठेवले. त्याचे ही निलंबन झाले. भीमा कोरेगाव घटने नंतर हजारो तरुणांना खोट्या केसेस करून तुरुंगात डांबले. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यास रासूका लावून तुरुंगात ठेवलंय अजूनही.

खोट्या केसेस म्हणजे आंबेडकरी चळवळीला नवीन आहे काय? कोण आहेत आंबेडकर स्टुडंट असोसिएशनची प्रमुख माणसे? प्रमुख नेत्यांना मानसिकरीत्या लढ्याला सज्ज बनवण्याची त्यांची जबाबदारी नव्हती काय? आत्महत्या होण्यापूर्वी समस्या निवारणासाठी संघटनेनी काय हालचाल केली? कोणाकोणाला संपर्क साधला? अन्य संघटनांची मदत घेतली की मोनोपॉलीसाठी एकटेच लढले? कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत समस्या, कौटुंबिक समस्या यावर कधी बोलले गेले काय? दलित विद्यार्थी चळवळी म्हणजे पोरखेळ आहे काय?

आत्मपरीक्षण करायला हवे

तरुण मित्रानो चळवळ म्हणजे स्टटंबाजी नव्हे. तो आहे आगीशी खेळ. दिवसेंदिवस हे फॅसिस्ट लोक अधिकाधिक विकृत स्वरूप धारण करतील. त्यांच्या खऱ्या रुपात अजून ते समोर आले नाहीत. लक्षात घ्या हे आहेत पेशवाई, मुसोलिनी आणि हिटलरचे चेले. ही आहेत माणुसकीचा गळा घोटणारी क्रूर आणि हिंस्र श्वापदे. रणनीती बदलेन, हत्यार बदलेन पण हत्यार टाकणार नाही ही लढवय्याची भूमिका हवी. सीमेवरील सैनिकापेक्षा देखील चळवळीतील कार्यकर्त्यांचे युद्ध जास्त कठीण आहे. चळवळीने कुठे तरी आत्मपरीक्षण करायला हवे आता तरी. दुरुस्त्या करायला हव्यात आता स्वत:मध्ये. अन्यथा दुसरा वेमुला पहावा लागेल.

रोहितच्या लढ्याला मी कमी लेखत नाही. मला अभिमान आहे की त्यांनी ही चळवळ नेटाने लढवली. रोहितला मानाचा जयभीम आणि क्रांतिकारी लाल सलाम. पण तरीही मी मानतो रोहित वेमुलाने आत्महत्या करायला नको होती.

चळवळीचा आयकॉन

कुणी काहीही म्हणो. पण मी तरी रोहित वेमुलाला चळवळीचा आयकॉन मानत नाही. रोहित मुळे कन्हैय्याला भले लढायची उर्जा मिळत असेल पण मला तर कन्हैय्या मुळेच लढायची उर्जा मिळते. रोहित मला निराशेच्या गर्तेत घेवून जातो. जिग्नेश आणि  शितल साठे मला बळ देतात. सचिन माळी आणि चंद्रशेखर आझाद (रावण) हेच मला चळवळीचे आयकॉन वाटतात. त्यांच्याकडे बघून माझ्यामध्ये ५६ हत्तींचे बळ संचारत. वाट्टेल ते झालं तरी मागं हटणार नाही ही प्रेरणा देतं. आपल्या हे लक्षात आले असेलच की रोहित वेमुलाने आत्महत्या करायला नको होती.

Image source : https://commons.wikimedia.org/wiki/File:Ambedkarwadi_Chatra_Sabha_Protest_against_Government_position_on_HCU_Dalit_scholar_Rohit_Vemula%27s_Death.jpg

रोहित वेमुलाने आत्महत्या करायला नको होती.
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *