शालेय संस्कार

शालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम

शालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम

मुलांवर शालेय संस्कार

बऱ्याचदा मुलांवर स्वत:चे आईवडीलच संस्कार करतात. की आपण ब्राह्मण, मराठा किंवा उच्च जातीचे आहोत. आपण श्रेष्ठ आहोत. पराक्रमी, ज्ञानी इ प्रकारचे आहोत. इतर जातीचे तसे नाहीत. म्हणून ते नीच किंवा कमी प्रतीचे आहेत. असे मुलांना शिकविणे सामाजीक दृष्ट्या चूक आहे. तरी उच्च जातीतील लोक मात्र असेच प्रकार मुलांना शिकवीत असतात. तसेच खालच्या जातीतील लोकही वरच्या जातीचे लोक आपल्याला कमी समजतात, आपला द्वेष करतात. असे शिकवत असतील. तर अशा दोन्ही जातींनी ते थांबवायला हवे. कारण यामुळे जातीजातीत द्वेष निर्माण होईल. जातीजातीत प्रेम निर्माण झाले. तरच या जाती एकत्र येवू शकतील. आणि योग्य प्रकारचे शालेय संस्कार मुलांवर होतील.

नवीन प्रयोगांद्वारे शालेय संस्कार

यामध्ये शाळा कॉलेज काहीशी निर्णायक भूमिका घेवू शकतात. अनेक शिक्षण संस्था आपल्या शाळांमध्ये काही नविन प्रयोग करत असतात. मात्र जात ही भावना नष्ट करण्याचे प्रयोग फारसे कुठे होत नाहीत. पूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या शाळा, कॉलेज आणि वसतिगृहात असे प्रयोग करत असत. सर्व मुलांना एकाच मोठ्या ताटात एकत्र जेवायला बसवणे. आळी पाळीने सगळ्यांना कामे सांगणे. सर्व जातींचे मिक्स ग्रुप बनविणे. यामुळे त्याकाळातील अस्पृश्यता नष्ट व्हायला मदत झाली.

आज अस्पृश्यता नष्ट झाली आहे. त्यामुळे आता त्याची आवश्यकता नाही. पण उच्च नीचतेची भावना, दुसरा व्यक्ती हा आपल्या पेक्षा वेगळ्या जातीचा आहे. त्याच्या आणि आपल्या नातेवाईकांमध्ये फरक आहे. आपले आपसात विवाह होऊ शकत नाहीत. ही भावना आणि संस्कार पुसून टाकण्याचे प्रयत्न बाल मनावर व्हायला हवेत. विशेषत: उच्च जातीत जन्माला आलेल्या मुलांवर हे संस्कार आग्रहाने व्हायला हवेत. यासाठी काही नवीन प्रयोग शोधून काढावे लागतील. मुलांना आरक्षण, विशेष सवलतींचे समता प्रस्थापित करण्यासाठीचे महत्व समजावे. यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग शाळेत व्हायला हवेत. आणि या माध्यमातून समतेचे शालेय संस्कार मुलांवर करायला हवेत.

शालेय विद्यार्थ्यांना जात विचारु नये

शाळेतच शिक्षक त्यांचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी मुलाना जात विचारतात. अशावेळी मुलांना आपली जात कोणती व इतरांची कोणती हे चटकन कळते. व आपल्या आणि इतरांच्या जातीचा स्तर देखील त्यांना समजतो. यासाठी शिक्षकांनी फक्त पालकांशीच संपर्क करावा. असे सक्त आदेश शिक्षकांना द्यायला हवेत. केरळमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी आपली जात आणि धर्म हा रकाना रिकामा ठेवणे पसंद केले आहे. हे इतर राज्यांनीही सुरु करायला हवे. तरच जात, धर्म विरहित समाजाचे शालेय संस्कार मुलांवर होतील.

मागास विद्यार्थ्यांना शिक्षकांनी करुणापुर्वक शिकवावे.

बऱ्याचदा हुशार, चुणचुणीत, देखण्या मुलांना शिक्षक पुढे बसवतात. त्यांचे कौतूक करतात. त्यांना विविध प्रकारची संधी उपलब्ध करून देतात. मात्र असे विद्यार्थी बऱ्याचदा उच्च जातीतून व उच्च वर्गातून आलेले असतात. त्यांना फ़ार लक्ष देण्याची आवश्यकता नसते. कारण त्यांचे आई वडील सुशिक्षित, घरची परिस्थिती चांगली, घरी वर्तमानपत्रे, पुस्तके, टीव्ही, संगणक इ. ची उपलब्धता असते. मात्र गरीब मागास घरात असे काही नसते. अडाणी व गरीब पालकांनी आपल्या मुलांना केवळ शाळेत घालणे. हीच मोठी बाब असते.

अशावेळी ही मुले मागे बसणारी. ढ समजली जाणारी असतात. आणि वह्या पुस्तकांचा अभाव असणारी अशी असतात. शिक्षकांनी करुणापुर्वक त्यांचेकडे जास्त लक्ष द्यायला हवे. त्यांना हुशार मुलांच्या बरोबरीला आणण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. आणि याद्वारे समतेचे शालेय संस्कार मुलांवर करायला हवेत.

शाकाहाराचे स्तोम बालमनावर माजवू नये.

कोणी काय आहार घ्यावा ही ज्याची त्याची आवड आहे. मात्र मी ब्राह्मण, सोनार, वाणी इ. जातीचा (जाणवेवाला) आहे. म्हणून मी शाकाहारी आणि म्हणून मी उच्च आहे. आणि बाकीचे शुद्र जातीचे असल्यामुळे ते मांसाहारी आहेत आणि नीच आहेत. असे मानणे. व शाकाहार चांगला, उच्च  व मांसाहार घाणेरडा, नीच असे संस्कार मुलांवर करणे. व त्यातून जातीय द्वेष मुलांमध्ये रुजविणे. कितपत योग्य आहे? याचा पालकांनी विचार करून मुलांवर समतेचे संस्कार करावेत.

आपण मांसाहार करत नाही. कारण आपणास ते आवडत नाही. किंवा बुद्धीस पटत नाही. असे कुणाचे मत असेल तर हरकत नाही. मात्र मांसाहार खाण्यायोग्य नाही. घाणेरडा आहे. ते खाणारे लोक पण मग घाणेरडे आणि कमी प्रतीचे आहेत. असे संस्कार करणे चूक तर आहेच. शिवाय हे संस्कार पुसून जावेत .यासाठी घर आणि शाळेतून सतत नव्या स्वरूपाचे शालेय संस्कार होण्याची गरज आहे.

विषयांच्या निवडीबाबत भेदभाव नसावा

अनेक शाळेत संस्कृत हा विषय शिकविला जातो. यामध्ये हुशार मुलांना संस्कृत विषय दिला जातो. बऱ्याचदा ब्राह्मण मुलांना जाणीवपूर्वक संस्कृत विषय दिला जातो. आणि बहुजन आणि ब्राह्मण हा भेद केला जातो. त्याच सोबत एनसीसी, स्काउट, समाजसेवा याबाबतीतही अशाच स्वरूपाच्या भेदभावांना मुलांना सामोरे जावे लागते. याबाबतीत निर्णय शिक्षकांनी त्यांचे मार्क, हुशारी व जात इ. पाहून घेवू नये. यावेळी मुलांनी संस्कृत शिकावे की हिंदी शिकावे. किंवा कोणता विषय निवडावा? हे सर्वस्वी मुलांवर सोडून द्यावे. तरच मुलांमध्ये भेदभाव रहित, समतेचे आणि योग्य निर्णय घेण्याचे शालेय संस्कार मूळ धरतील.

संस्कृत भाषा शाळेत शिकवू नये.

मुळात प्रश्न असा आहे. संस्कृत भाषा ही हिंदी भाषेला पर्याय कशी काय ठरू शकते? हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यासोबत इंग्रजीला राष्ट्रभाषेचा दर्जा का नको? पाली देखील भारतातील प्राचीन भाषा आहे. जगभरातील लोक पाली शिकतात. मग पाली का शिकवली जायला नको? उर्दू देखील अनेक लोक बोलतात. व्यवहारात वापरतात मग हिंदीला उर्दू किंवा पाली हा पर्याय का नको? फक्त संस्कृतच हा पर्याय का? असे प्रश्न उभे राहतात. तात्पर्य संस्कृत भाषा शाळेत शिकविण्यात येवू नये. आणि त्यामध्ये पुन्हा संस्कृत भाषेच्या तुकडीत ब्राह्मण मुले. अर्धसंस्कृत मध्ये वैश्य मुले आणि हिंदी भाषेसाठी शुद्र अतिशूद्र मुले अशी प्रतवारी करू नये. आणि मुलांमध्ये चुकीचे शालेय संस्कार करू नयेत.

निवडप्रक्रियेत भेदभाव नसावा

अनेकदा ब्राह्मण शिक्षक हे ब्राह्मण मुलांना जास्त मार्क्स देणे. त्यांचे वर्गात कौतुक करणे. ब्राह्मण मुलांनाच विविध स्पर्धेत सहभागी करून घेणे. ब्राह्मण मुलांनाच स्पर्धामध्ये नंबर देणे. असे करतात. यामुळे अन्य मुलांमध्ये आपण कमी आहोत अशी भावना निर्माण होते. यासाठी सर्व प्रकारच्या स्पर्धात सर्वाना सहभाग मिळावा. आणि भेदभाव न करता निवड व्हावी. यासाठी जातीय मानसिकता बाळगणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाही व्हायला हवी. आणि प्रेमळ, जातीभेद न करणाऱ्या शिक्षकांना शाळेत भरती करून घ्यायला हवे. तरच जातीअंताचे शालेय संस्कार मुलांवर होतील.

शासनाने मागास समाज घटक आणि मागास प्रदेशाकडे लक्ष द्यावे.

दलित, आदिवासी, भटके विमुक्त, खाण कामगार, ऊस तोड कामगार, वीट मजूर यांच्या मुलांची शाळेची मोठी अडचण आहे. काही अंशी दलितांनी स्वत:हूनच पुढाकार घेवून आपला शिक्षणाचा प्रश्न तात्पुरता का होईना सोडवला आहे. मात्र आदिवासी आणि भटकेविमुक्तांची मोठी अडचण आहे.

आदिवासी लोकांची वस्ती जंगलात असते. त्यामुळे त्यांच्या निवासी शाळा देखील जंगलात असतात. तिथे शिक्षक आळीपाळीने दांड्या मारतात. दारू पिऊन शाळेत येतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. शाळेत मुलांना जेवण व्यवस्थित मिळत नाही. अन्य सुविधा असत नाहीत. कित्येक शाळेत साधे पिण्याचे पाणी, शौचालये, बाथरूम इ. ची देखील सोय असत नाही. अन्य बाबतीत देखील बराच मोठा भ्रष्टाचार आहे. कारण तिकडे कोणी देखरेख करण्यास नाही. टार्गेट नाही. शासनाने या बाबींकडे गंभीरपणे दखल द्यायला हवी. आणि त्या बदलायला हव्यात.

आदिवासी, भटके विमुक्त, ऊस तोड कामगार, खाण कामगार यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा बिकट प्रश्न आजही आ वासून उभा आहे. या शाळात विद्यार्थी संख्या जास्त असली. तरी तिथे दोनच शिक्षक हा न्याय आहे का?

दुसऱ्या बाजूला शाळेत एक किंवा दोन विद्यार्थी असूनही त्या शाळा चालू आहेत. वास्तविक कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळांचा क्लब करायला हवा. जवळपासच्या गावातील मुलांना स्कूल बस सुरु करून द्यावी. व मुख्य शाळेत त्यांना आणून बसवावे. आणि उर्वरित शिक्षकांना मुख्य शाळेत भरती करावे. त्यामुळे मुलांना वर्गवार आणि विषयावर शिक्षक मिळतील. मुलेही चांगली शिकतील. व आनंदाने बसनी घरी जातील. त्या शाळांवरचा अनाठाई खर्च ही वाचेल. तो पैसा मुख्य शाळेत लावल्यास विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उत्पन्न होतील

तसेच असे अनेक शिक्षक यातून मिळतील की ज्यांना आता काम उरले नाही. त्यांना दुर्गम भाग, आदिवासी, भटकेविमुक्तांच्या शाळा, मजुरांच्या मुलाच्या शाळा इ. ठिकाणी रुजू करावे. त्याठिकाणी शिक्षकांची सोय करून त्या मुलांची गुणवत्ता सुधारावी. शासनाने योग्य निर्णय घेवून मुलांमध्ये समतेचे शालेय संस्कार घडवावेत.

अभ्यासक्रम बनवताना याचा विचार व्हावा…

आदिवासी, भटके विमुक्त यांच्या घरात ते वेगळी भाषा बोलतात. आणि शिक्षक त्यांना वेगळ्याच भाषेत शिकवतात. पुस्तकातही त्यांची बोली भाषा नसते. त्यांचे शब्द, त्यांचे अर्थ, सभ्यता या नागरी समाजापेक्षा वेगळ्या आहेत. हे लक्षात घेतले जात नाही.

नागरी मुलांचाच अभ्यासक्रम यांना देखील ठेवला जातो. त्यामुळे ही मुले मागे पडतात. यासाठी मुलांची बोली भाषा, त्यांच्या घरातील संस्कृती, व्यवसाय, समाजाच्या सवयी, त्यांच्या समाजाचे विशेष ज्ञान आणि अज्ञान या सर्व बाबींचा शिक्षणतज्ञांनी विचार करायला हवा. आणि अभ्यासक्रम, विषय आणि शिकविण्याची पध्दती निश्चित करायला हवी. एव्हाना त्यांचे शिक्षक हे त्यांची भाषा आणि संस्कृतीची जाणीव असणारे असायला हवेत. पण हे लक्षात घेतले जात नाही. आणि त्यामुळे त्यांची शिक्षणात प्रगती वेगाने होत नाही. ही एक प्रमुख समस्या आहे.

तसेच मागास घटकातील मुलांचा मानसिक कल, आवड निवड, सवयी यांचाही अभ्यासक्रम बनवताना विचार केला जात नाही. यामध्ये क्रांतिकारक बदल व्हायला हवा. यासाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करायला हवेत. मागास मुले मुख्य प्रवाहात येतील. आणि ते विकसित समाजातील मुलांशी स्पर्धा करू शकतील. त्या स्पर्धेत टिकू शकतील अशी घडावीत. यासाठी मुलांवर योग्य शालेय संस्कार व्हावेत. म्हणून शिक्षणपध्दती मध्ये अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे.

शाळेत जातीय भेदभाव नसावा

उत्तर भारतातील काही शाळांमध्ये दलित मुलांना वेगळे गणवेश बनविले जातात. दलित मुलांना स्वच्छतेची कामे सांगितली जातात. त्यांना स्वतंत्रपणे बसविले जाते. यामुळे जातीय भेदभाव तीव्र स्वरूप धारण करू शकतात. अशा शाळा आणि या शाळातील कर्मचारीवर्ग यांच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हायला हवी. तरच जातीय द्वेष आणि भेदभाव रहित समाज व्यवस्थेचे शालेय संस्कार मुलांवर रुजतील.

काळा गोरा भेद

कळत नकळतपणे समाजातील सर्वच घटक काळा गोरा हा भेद करत असतात. त्यामुळे असा भेद शिक्षक करत नाहीत. असे म्हणता येणार नाही. मुळात ब्राह्मण लोक हे गोऱ्या रंगाचे, निळ्या डोळ्यांचे, सरळ नाकाचे असतात. त्यामुळे असेच लोक सुंदर असतात. असा समज हजारो वर्षांपासून त्यांनी समाजमनावर रुजवला आहे. त्यामुळे समाजालाही गोरे लोकच सुंदर वाटतात. आणि काळे लोक हे कुरूप असतात. असा समज निर्माण केला आहे. त्यामुळे सामान्य लोक देखील तसेच समजतात.

वास्तविक शाळांमध्येही गोऱ्या मुलांना नाटके, गाणी, नृत्य, वक्तृत्व, खेळ इ. स्पर्धांमध्ये संधी दिली जाते. किंवा अशाच मुलांना उजवे माप दिले जाते. की जे अन्य काळ्या मुलांवर अन्याय करण्यासारखे आहे. आपण हे लक्षात घेवूयात. सरासरी काळी मुले ही मागासवर्गीय असतात. आणि रंगाच्या माध्यमातून अशा मागासवर्गीय मुलांवर अन्याय होतो. तो देखील शिक्षकांनी टाळायला हवा.

याउलट काळा रंग हा सुंदर रंग आहे. काळ्या रंगाचे लोक देखील सुंदर असतात. असेच शालेय संस्कार मुलांवर व्हायला हवेत. असे काही प्रयोग शाळांमध्ये सुरु होणे आवश्यक आहे.

Image Source -https://www.flickr.com/photos/jamorcillov/6108526728

शालेय संस्कार : जातीय द्वेष नव्हे जातीय प्रेम
लेखक :

सचिन मोरे

संस्थापक :

ह्युमन लिबर्टी

 

 

 

About the author

Sachin More

Hi,
I am Sachin More
President of Human Liberty Organization
Blogger at http://humanliberty.co.in/
YouTube Creator at Human Liberty Channel

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *