श्रद्धा अंधश्रद्धा

श्रद्धा अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन

श्रद्धा अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन

श्रद्धा अंधश्रद्धा. नुकत्याच झालेल्या नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा अंधश्रद्धा बाबत काही मांडणी करण्याचा हा प्रपंच. याबद्दल काही बोलणे म्हणजे लोकक्षोभाचे धनी बनणे. या भीतीने बहुतेक सारे मौनात आहेत. खरे तर असे व्हावयास नको आहे.

तुकाराम महाराज

साडे तीनशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी या पर्वणीला उद्देशून लिहिले आहे ते असे.

आली आली पर्वणी | न्हाव्या भटा झाला धनी ||

वरवर बोई डोई दादी | अंतरी पापाच्या कोडी ||

यावर वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही.

नाशिकच्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी आपल्या सिंहस्थ या कवितेची सुरुवात

व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर ||

संताचे पुकार | वांझ गेले ||

यापासून सुरुवात करून शेवट

तुका म्हणे सारे | मायेचे माविंद ||

यापाशी गोविंद | नाही नाही ||

असा केला आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोन

विश्वास, अंधश्रद्धा, श्रद्धा असे तीन शब्द घेऊया. घड्याळाने वेळ दाखवणे, दिव्याने प्रकाश देणे याचा कार्यकारणभाव अगदी स्पष्ट आहे. म्हणून तो विश्वास. विश्वास म्हणजे कार्यकारणभावाचा प्रभाव. व अंधश्रद्धा म्हणजे शोषण करणारा कार्यकारणभावाचा अभाव. विज्ञानाच्या हरघडी वापरातून काही प्रमाणात वैज्ञानिक दृष्टीकोन लोकमानसात आला आहे. मात्र अंधश्रद्धा या शब्दात श्रद्धा हा शब्द येतो. तो अटळपणे धर्मश्रद्धा याच्याशी जोडलेला आहे. धर्म हीच सुसंघटीत आद्य श्रद्धा आहे.

मात्र वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रकाशात या धर्मश्रद्धा तपासून मानवाने माणूस म्हणून स्वत:ची वाटचाल चालू केली. यामुळे निखालसपणे सिद्ध झालेल्या गोष्टीबाबत तरी धर्मश्रद्धेला माघार घ्यावी लागली. कर्ता करविता देवच सर्वांचे रक्षण करील. अशी गाढ श्रद्धा असलेली व्यक्तीही आपल्या मुलाला पोलिओचा डोस न पाजता श्रद्धेच्या भरोशावर ठेवत नाही. ज्या ठिकाणी कार्यकारणभाव थेट प्रस्थापित होतो. तेथे श्रद्धेचे क्षेत्र आपोआप संकुचित होते.

व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार

याच्या पुढच्या टप्प्यावर अंधश्रद्धेचे आचरण करणारी व्यक्ती स्वत:च्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेते. बोटात अंगठी घातली, हातात गंडा बांधला, गळ्यात लॉकेट घातले, गृहाची शांती केली, नारायण नागबळीची पूजा केली. तरी या सर्व बाबी स्वत:चे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. इतरांनी त्याबाबत टीका करण्याचे कारण काय? या वरवर पाहता अचूक वाटणाऱ्या प्रश्नाचा प्रतिवाद नीट समजून घेतला पाहिजे.

संपूर्ण प्राणी सृष्टीत विकसित बुद्धी लाभलेला मनुष्य हा एकमेव प्राणी आहे. हि बुद्धी देवाची देणगी आहे. काही लाख वर्षाच्या उत्क्रांतीत माणसाच्या हजारो पिढ्यातील पूर्वजांनी कणाकणाने परिश्रमपूर्वक केलेला ज्ञानसंचय आहे. तो एकत्रितपणे आजच्या मानवाला उपलब्ध आहे. अशा वेळी हजारो पिढ्यांचा लाभलेला वारसा सोडून देऊन व्यक्ती अंधश्रद्धेला अगदी सहजपणे स्वीकारते. त्यावेळी तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न राहत नाही. तर  मानवी प्रगतीचा बळी देणाऱ्या वाटचालीतील ती खून बनते.

मानसिक गुलामी

मात्र अंधश्रद्धेची प्रक्रिया ही याही पेक्षा गुंतागुंतीची आहे. पावित्र्य व हितसंबंध यामुळे चिकित्सेला नकार देणारा. व चिकित्सेचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी अत्यंत स्फोटक ठरणारा भ्रम म्हणजे अंधश्रद्धा. हे त्याचे स्वरूप अधिक गंभीर आहे. चिकित्सा करणे शक्य असूनही पावित्र्याची पारंपारिक कल्पना व हितसंबंध यामुळे शोषण होणारी व्यक्तीच त्याला नकार देते.

मासिक पाळी ही खरे तर गर्भधारणेसाठी तयार झालेली गर्भाशयाची आतील त्वचा त्या महिन्यात गर्भधारणा न झाल्यास शरीराच्या बाहेर टाकण्याची एक अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. ती विशिष्ट वयात स्त्रीला प्राप्त होते. व विशिष्ट वयात थांबते. मात्र आजही सुशिक्षित नव्हे तर वैद्यकीय पदवीधर स्त्रियाही या काळात स्वत:ला त्यांच्यामते पवित्र वाटणाऱ्या धार्मिक असणाऱ्या कार्यासाठी अस्पर्श ठरवतात.

त्यांच्यावर लादलेले हे पावित्र्य उघडपणे पुरुषप्रधान व्यवस्था व धर्माचे हितसंबध यातून येते. मात्र आजही याबाबतची चर्चा नकोशी वाटते. कृती दूरच. याचा अर्थ अंधश्रद्धेची सर्वाधिक भयानकता म्हणजे ती मानसिक गुलामी निर्माण करते ही आहे.

अंधश्रद्धा ही समुदायाची भावना

या सर्वाबरोबरचा संघर्ष अवघड असतो. कारण व्यक्तीला व समाजालाही जाणीवे बरोबरच नेणीवही असते. परंपरा, पूजा, नवस, धार्मिक कर्मकांडे व अशा असंख्य बाबी व्यक्तीच्या व्यक्तिगत व सामाजिक नेणीवेचा भाग असतात. नेणीव म्हणजेच अंतर्मन चिकित्सेला उपलब्ध नसते. वैज्ञानिक दृष्टीकोन देखील अंतर्मनातील या अंधश्रद्धांवर प्रहार करण्यासाठी फारसा उपयोगी ठरत नाही. यासाठी नेणीवेतील या चुकीच्या बाबी प्रथम जाणीवेच्या पातळीवर खेचून आणाव्या लागतात. सर्वसाधारणपणे व्यक्ती त्याला अनुकूल नसते.

त्यानंतर पुढची पायरी म्हणजे या विचारांची चिकित्सा करणे. आणि प्रत्यक्ष कृती व प्रसंगी त्यासाठी संघर्ष हे सर्वात शेवटी घडते. अंधश्रद्धा थेट घातक नसतील. जसे सिंहस्थामध्ये विशिष्ट वेळेला विशिष्ट नदीत स्नान करणे. तर त्या अंधश्रद्धांना चिकित्सेला क्ष किरणात थेट उभे करायला व्यक्ती तयार नसते. अंधश्रद्धा ही समुदायाची भावना असते. व्यक्ती समुदाय प्रियच असते. त्यामुळे अंधश्रद्धांच्या पालनातून व्यक्तीला समुदायाबरोबर राहण्याचा आधार व आनंद दोन्ही लाभतो. हे सर्व गमावून अंधश्रद्धा दूर करण्याची गरज व्यक्तीला वाटत नाही.

मुल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा

श्रद्धेची एक समर्पक व्याख्या न्या. रानडे यांनी केली आहे. ती म्हणजे ‘उत्कटपणे कृतीशील झालेली विवेकशक्ती म्हणजे श्रद्धा.’ याचा अर्थ असा की श्रद्धेचा संबंध उत्कटतेशी म्हणजेच भावनाप्रधानतेशी असतो. आणि कोणत्याही माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भाग हा मोठ्या प्रमाणात भावनेचाच असतो. दुसरा मुद्दा असा की श्रद्धा ही कृतीशीलच  असते. स्फोटक असते. तिच तिची ताकद असते. आता कृतिशीलतेचे अचंबित करणारे दर्शन हे श्रद्धेचे आहे की अंधश्रद्धेचे हे कसे ओळखायचे? याचे उत्तर असे की, माणसाचा मुल्यविवेक उन्नत करते आणि ती श्रद्धा असते. व अवनत करते ती अंधश्रद्धा असते.

वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा कस लागणार

पंढरीची वारी हे श्रद्धेचे प्रतिक आहे. औपचारिक निमंत्रण नसताना वारकरी अनेक दिवस पाऊस, चिखल, वारा आमी प्रसंगी निवास व भोजन याची आबाळ सोसत पंढरीच्या दिशेने आपली वाटचाल करतात. त्यामध्ये लाभाची भावना नसते. नवस नसतोच नसतो. गर्दीमुळे मंदिराच्या कळसाचे दुरून घेतलेले दर्शनही त्याला पुरते. श्रद्धेच्या मुल्यविवेकाची ही एक बाजू झाली.

परंतु वारकरी संप्रदायाचा उगम झाला तो समतेची भावना कृतीशील करण्यासाठी. ‘विष्णुमय जग | वैष्णवांचा धर्म || भेदाभेद भ्रम | अमंगळ ||’ असे तत्वज्ञान वारकऱ्यांनी पुकारले. मात्र ते वारीचा काळ आणि चंद्रभागेचे वाळवंट ओलांडून गावात आले नाही. एक गाव एक पाणवठा झाला नाही. गावकुसा बाहेरची घरे सन्मानाने गावात आली नाहीत. आंतरजातीय विवाह अत्यंत आक्षेपार्हच मानले गेले. थोडक्यात गावातील उच्चनीचतेची जातीची उतरंड हळू शकली नाही. समतेच्या या निकषावर वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा अंधश्रद्धा चा कस लागणार आहे.

श्रद्धेचा आधार

व्यक्ती जीवनात अनेकदा कार्यकारणभावाला डावलून भावनेने निर्णय घेते. तो निर्णय बुद्धीच्या निकषावर चोखपणे बरोबरच आहे. असे सिद्ध करणे शक्य नसते. अख्ख्या गावाला त्राही भगवान करून सोडलेल्या गुंडांच्या विरोधात एखादा फाटका माणूस उभा राहतो. त्याचे प्रतिपादन असे की ‘देवाच्या कृपेने शेवटी न्यायाचा विजय होईल. व अन्यायाचा पराभव होईल अशी माझी श्रद्धा आहे.’ आता देव आहे का ही बाब निर्विवाद नाही. न्यायाचाच विजय होतो. असाही अनुभव नाही. गुंडाकडे पोलीस, पुढारी, पैसा, प्रेस या सगळ्यांचे पाठबळ असण्याची शक्यता उघडच जास्त आहे. हे सर्व लक्षात घेता या लढाईत संबंधिताचा आत्मघातच होईल हे कार्यकारणभावाने प्रसंगी पटवूनही देता येईल.

तरीही व्यक्ती श्रद्धेच्या आधारे संघर्ष कायम ठेवते याचा अर्थ काय? अर्थ असा की अन्याया विरुद्ध कृतीशील बनण्याचा मूल्यनिर्णय स्वत:ची बुद्धी व कार्यकारणभाव या आधारे नव्हे. तर श्रद्धेचे रसायन वापरून भावनेच्या पातळीवर ती फाटकी व्यक्ती घेते. या प्रक्रियेत जीवघेणा धोका आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या भीतीवर मात करून कृतिशीलता टिकवण्यासाठी ‘परमेश्वर न्यायाचा पाठीराखा आहे.’ या श्रद्धेचा आधार व्यक्ती घेते.

श्रद्धेच्या आधारे मुल्यानिर्मिती होऊ शकते. देव आणि धर्म या कल्पना त्याला हातभार लावू शकतात. परंतु अधिक श्रेयस्कर हे आहे की मूल्याची निर्मिती धर्माने नव्हे. विवेकाने व्हावयास हवी. विवेक हा देवाचा आवाज नाही. तर बुद्धीचा निष्कर्ष आहे. विवेकाने समजून उमजून माणसे मुल्यासाठी स्वत:चे जीवन पणाला लावतात याची अनेक उदाहरणे आहेत.

श्रद्धा अंधश्रद्धा

आता पुन्हा मूळ पदावर यायचे तर सिंहस्थाच्या स्नानाला श्रद्धा कशी आणि का मानावे? आज सर्व धर्मांची सर्व कर्मकांडे वाजत गाजत, साग्रसंगीत, भपकेबाज व अर्थशून्य करण्याची जणू एक लाट आली आहे. राजकारणी लोकांना हे हवेच आहे. समाजकारण करणारे या सर्वाला असलेले श्रद्धेचे पाठबळ पाहून गप्प आहेत.

आपल्या आजूबाजूला वर्षभरात कोणकोणते धार्मिक सण, उत्सव कशाप्रकारे साजरे होतात? याचा थोडा अंतर्मुख होऊन विचार केला. तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. धर्माचे व्यापारीकरण कधीच झाले होते. आता धर्माचे बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करण्याची अहमाहिका चालू आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी धर्मनिरपेक्ष ते करत आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेस सत्तेवर आली तर तेच करणार आहे. युती राज्यारूढ झाली तर त्यांचा तर तो घोषित कार्यक्रमच आहे.

अग्निपरीक्षा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. साधा पिवळा चकचकीत धातूचा तुकडा मिळाला. तरी आपण तो सोनाराकडे नेतो. सोनार बिनधास्तपणे तो आगीत टाकतो. तुकडा पितळेचा असेल तर वितळून जाईल. पण त्याने काहीच बिघडत नाही. सोन्याचा असेल तर आगीने उजळून निघेल त्यामुळेही काहीच बिघडत नाही. साध्या धातूला आपण जी अग्निपरीक्षा करावयास लावतो. ती समाजकारण आणि राजकारण ज्या आधारे चालते त्या मानसिकतेची करावयास नको काय? आता आपल्याला  श्रद्धा अंधश्रद्धा  लक्षात आली असेलच.

Image source : https://www.flickr.com/photos/eschipul/5075141841

श्रद्धा अंधश्रद्धा

लेखक – प्रशांत एस. पोतदार, सातारा

राज्य प्रधान सचिव

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती.

मोबाईल – ९४२११२१३२८

ईमेल – prashantspotdar@gmail.com

About the author

Prashant Potdar

Hi,
I am Prashant Potdar.
State Principal Secretory of Maharashtra Andhashraddha Nirmulan Samitee
State Committee Member of Human Liberty Organization

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *