वेध अंधश्रद्धेचा

वेध अंधश्रद्धेचा

वेध अंधश्रद्धेचा

वेध अंधश्रद्धेचा हा विषय बहुआयामी आहे. या विषयाकडे काहीजण भारतीय समाजातील अंधश्रद्ध मानसिकतेची कारणमीमांसा म्हणून पाहतील. काही जण श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक म्हणून पाहतील. तर काही जणांना बुवाबाजी, भूत, भानामती, फलज्योतिष अशा बाबींचा फर्दाफाश लेखात व्हावा अशी अपेक्षा असेल. काही जणांना परामानसशास्त्र, संमोहन, वास्तुशास्त्र या नावाने आधुनिकतेच्या नावाखाली ज्या अंधश्रद्धा समाजामध्ये वाढवल्या जात आहेत. त्याबद्दलचे विवेचन अपेक्षित असू शकेल.

आता मला यापैकी सर्वात जास्त व आवश्यक आणि महत्वाची बाब वाटते. ती म्हणजे वेध अंधश्रद्धेचा यावर लिहित असताना. भारतीय समाजातील अंधश्रद्ध बनलेल्या मानसिकतेची कारणमीमांसा करण्याची. अर्थात त्यामध्येही अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. आणि त्याबद्दल लिहावयाचे तर तो प्रत्येकी एक स्वतंत्र लेख होवू शकेल. या लेखाच्या मर्यादेत सूत्र रूपाने अंधश्रद्धेच्या मानसिकतेची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती गेली २८ अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत आहे. या कामाबद्दल भरपूर शिव्या आणि काही ओव्या आम्हाला मिळाल्या आहेत. याचे महत्वाचे कारण आमच्या समितीच्या नावात श्रद्धा हा शब्द आहे. ज्यावेळी अंधश्रद्धेबद्दल बोलले जाते. त्यावेळी ऐकणाऱ्या माणसाच्या मनात श्रद्धा हा शब्द प्रामुख्याने जोरदारपणे उमटतो. आणि त्याच्या लेखी ती श्रद्धा म्हणजे प्राधान्याने धर्मश्रद्धा असते. त्यामुळे वेध अंधश्रद्धेचा घेत असताना. माझ्या धर्मश्रद्धेवर आघात केला जाणार आहे का असे त्याला वाटते. आणि स्वाभाविकच घेण्याच्या या प्रयत्नालाच तो नकार देतो. धर्म ही मानवी समाजातील सुसंघटीत आद्य श्रद्धा आहे. त्यामुळे असे घडणे स्वाभाविक मानावयास हवे.

अंधश्रद्धा या कालसापेक्ष व व्यक्तीसापेक्ष असतात.

अंधश्रद्धेबद्दल बोलावयास सुरुवात केली. की पुढे येणारे प्रतिपादन साधारणपणे असे असते की, अंधश्रद्धांचे निर्मूलन व्हावयास हवे. मात्र असे ठामपणे व जोरदारपणे सांगणाऱ्या व्यक्तीच्या मनात ज्याबद्दल श्रद्धा आहे. त्या संदर्भात कृती करणे व चिकित्सा करणे सोडाच. साधे बोलणेही लोकांना स्वत:च्या श्रद्धेवरील हल्ला वाटतो. स्वाभाविकच एकाची श्रद्धा ही दुसऱ्याची अंधश्रद्धा असते. आणि तिसऱ्याला गंभीर वाटणारी अंधश्रद्धा ही चौथ्याच्या लेखी जीवनमरणाची श्रद्धा असते.याचे कारण अंधश्रद्धा या कालसापेक्ष व व्यक्तीसापेक्ष असतात.

सतीप्रथा

१९८५ साली देवराला येथे एक स्त्री स्वत:च्या पतीच्या निधनानंतर सदेह सती गेली. सती प्रथेच्या विरोधात कायदा होताच. परंतु देशभरातून जोरदार मागण्या आल्यामुळे तो कायदा आणखी कडक करावा लागला. कारण २० वे शतक संपत आलेले असताना. अशी अंधश्रद्धा भारतीय समाजात असणे. हे लोकांना अनुचित वाटले. परंतु त्या आधीच्या शतकातील प्रारंभीच्या काळी काय अवस्था होती? लॉर्ड बेटिंग याने १८२९ साली सतीप्रथेविरोधात कायदा केला. त्यावेळी अलाहाबादमध्ये प्रचंड मोर्चा निघाला. पतीच्या निधनानंतर सदेह सती जाणे ही आमची पवित्र धर्मश्रद्धा आहे. आणि त्यामध्ये इस्ट इंडिया कंपनीने दखल घेवू नये. श्रद्धेची कालसापेक्षता सिद्ध करण्यास ही बाब पुरेशी आहे. मागील शतकात श्रद्धा असलेली सतीप्रथा ही अवघ्या एका शतकात निखालस अंधश्रद्धा ठरली.

सत्यसाईबाबा

अंधश्रद्धेबाबतच्या व्यक्तीसापेक्षतेबद्दल असेच एक उदाहरण मला आठवते. सत्यसाईबाबा स्वत:ला चमत्काराचा दैवी अवतार समजत. आणि ते तसे आहेत त्यावर असंख्याची श्रद्धा होती. त्यांनी एकदा त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना त्यांच्या उपस्थितीत रिकाम्या हातातून सोन्याची साखळी काढली. हा चमत्कार त्यांनी असंख्य वेळेला केला होता. यावेळी झाले ते एवढेच की, पंतप्रधानांचा कार्यक्रम असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणावरून चारी बाजूंनी कॅमेरे आहेत. ही बाब सत्यसाईबाबा विसरले. आणि त्यांनी सोन्याची साखळी रिकाम्या हातातून निघाली. असे दाखवण्यासाठी काय हातसफाई केली हे स्पष्टपणे चित्रफितीत रेकॉर्ड झाले. ही चित्रफित त्यांचे परमभक्त त्यावेळचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण यांना आम्ही पाठवली. त्यानंतर शंकरराव चव्हाण यांची भेटही झाली. त्यांनी सत्यसाईबाबांच्या चमत्कार करण्याच्या दैवी शक्तीची चिकित्सा करण्यास स्पष्ट नकार दिला. ही झाली अंधश्रद्धेची व्यक्तिसापेक्षता.

श्रद्धा

श्रद्धा या शब्दाला मागे अंध हे विशेषण लावूनच अंधश्रद्धा हा शब्द बनतो. श्रद्धा या शब्दाचा ऑक्सफर्ड शब्दकोशातील अर्थ आहे. Belief in Divine Revelation किंवा Religious faith. याचाच अर्थ असा की, तुम्हाला या श्रद्धेसाठी पुरावा देण्याची गरज पडत नाही. मात्र अशी श्रद्धा ही अंध न मानता ती धार्मिक हक्क म्हणून मानण्याची तरतूद व स्वातंत्र्य भारतीय घटनेनेच प्रत्येक नागरिकाला दिले आहे. त्यामुळे हिंदू धार्मिक माणूस अत्यंत श्रद्धापूर्वक मूर्तीमधील देवाची पूजा करतो. तर त्याचाच मुस्लीम मित्र मूर्तीमध्ये परमेश्वर पहाणे ही निखालस अंधश्रद्धा मानतो. बौद्ध धर्मीय व्यक्ती आत्मा मानत नाही तर हिंदू धर्मातील व्यक्ती ८४ लक्ष योनीतून फिरणारा आत्मा मानण्यात सार्थकता मानते. या बाबत कठोर चिकित्सा करणे. हे बहुधा धार्मिक भावना दुखावणे मानले जाते. त्याला अंधश्रद्धा शब्द वापरणे. हे घटनेने दिलेल्या धर्म स्वातंत्र्यावरील हल्ला मनाला जातो.

यामुळे अंधश्रद्धेची व्याख्या महत्वाची ठरते. माझ्या मते त्यामध्ये चार भाग असतात. १. अंधश्रद्धेत कार्यकारणाचा अभाव असतो. २. शोषणाचा प्रभाव असतो. ३. अंधश्रद्धा म्हणजे पावित्र्य लाभलेली मानसिक गुलामगिरी असते. ४. अंधश्रद्धेत अनेकदा व्यवस्थात्मक हितसंबंध तयार झालेले असतात.

कार्यकारणभाव

विज्ञानाच्या प्रसाराने अंधश्रद्धा का गेली नाही? असा प्रश्न ज्यावेळी लोक विचारतात. त्यावेळेला अंधश्रद्धेचे हे गुंतागुंतीचे रूप लक्षात घेतले जात नाही. कार्यकारणभावाच्या अभावातून जी अंधश्रद्धा जन्म घेते. तिचा पराभव अटळ असतो. आदिम माणूस अग्नीला महादेवता मनात होता. त्याच्या जीवनात अग्नीला इतके महत्वाचे स्थान होते. की, त्याने असे मानणे हे त्या काळी चूक ठरवणे शक्य नव्हते. अग्नीची उपयुक्तता आपण सर्वच जण मान्य करतो. ती आजही तेवढीच आहे. मात्र आता कोणतीही गृहिणी काड्यापेटीतील काडी ओढून. गॅस पेटवण्यापूर्वी काड्यापेटीला हळदकुंकू वाहून त्यामधील अग्निदेवतेने प्रसन्न व्हावे. अशी आराधना करत नाही. अग्नीचे प्रगटणे हा घर्षणातून निर्माण होणाऱ्या कार्यकारणाचा साधा अविष्कार आहे. हे सर्वमान्य झाल्यामुळे हे घडले.

अंधश्रद्धेमधून शोषण होते हे उघडच आहे. अधिक भयानक गोष्ट ही की हे शोषण गरिबांचे अधिक होते. अंधश्रद्धा हे गरिबाला गरीब ठेवण्याचे कारस्थान आहे. मात्र अशा उघडपणे शोषण करणाऱ्या बाबींच्याबाबत अजूनही भारतात कोठेही कायदा नसावा. हे आश्चर्यकारक आहे.

जादूटोणा विरोधी कायदा

महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा व्हायला १८ वर्षे लागली. त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आपले प्राण द्यावे लागले. डाकिन प्रथा, अंगात संचार झाला असे भासवून पसरवली जाणारी दहशत. विषारी सर्पदंशावर मंत्राचा उपचार. दैवी शक्तीचा अविष्कार असे म्हणून चमत्कार करून लोकांना फसवणे. या सर्व बाबी जादूटोणा विरोधी कायद्यात दखलपात्र गुन्हा आहेत.

मानसिक गुलामी

तिसऱ्या टप्प्यावर अंधश्रद्धेविरुद्धचा संघर्ष अधिकच अवघड बनतो. कारण जो समुदाय त्या अंधश्रद्धेचे पालन करतो. त्याच्या लेखी ती शोषण करणारी मानसिक गुलामी नसतेच. तर ती पवित्रपुर्वक करावयाच्या आचरणाची बाब असते. म्हणूनच स्वत:च्या तब्बेतीला झेपत नसतानाही उपवास केले जातात. स्त्रीची मासिक पाळी म्हणजे काय? हे माहित असतानाही त्याच्याशी अपवित्रतेची भावना जोडली जाते. आणि या बाबींच्यावर बोललेलेही चालत नाही. मग कृती तर दूरच. शेवटच्या टप्प्यावर अंधश्रद्धा या हितसंबंध तयार करतात. आणि त्याची एक व्यवस्थाही तयार करतात. नारायण नागबली सारख्या निरर्थक पूजा हे त्याचे छोटे उदाहरण झाले.

जात

अधिक मोठे सर्वव्यापी गंभीर उदाहरण म्हणजे जात. या कल्पनेला लाभलेली मानसिकता. जात ही एक आर्थिक, सामाजिक शोषणाची व्यवस्था आहे यात शंकाच नाही. आणि त्या पातळीवर त्यासाठी करावयाच्या उपाय योजनाही आवश्यक आहेत. परंतु जातीच्या मानसिकतेमध्ये एक बाब ही आहेच .की प्रत्येक जात स्वत:ला अन्य सर्व जातींपेक्षा वेगळी समजते. ती स्वत:च्या जातीला अन्य काही जातीपेक्षा निश्चितपणे उच्च व आणखी काही जातींपेक्षा नीच समजते. आता सर्वस्वी जन्मावर निर्माण होणारी माणसातील ही प्रतवारी ही अंधश्रद्धाच आहे. परंतु आजही लग्न ठरण्यात कितीही अडचण आली. तरी ते जातीतच व्हावयास हवे. हे पहिले जाते. तसे न करणाऱ्या पोटच्या लेकीला थंड काळजाने मृत्युमुखी पालकच पाठवतात. यामधून आपल्याला जात या अंधश्रद्धेची व्यवस्था व हितसंबंध लक्षात येतात. आणि निवडणुकीचे राजकारण त्याला खतपाणी घालत असल्याने तर. आता ही बाब देखील प्रबोधनाच्या कक्षेबाहेर गेली आहे.

वेध अंधश्रद्धेचा घेताना याचा विचार करावयास हवा. की आजच्या विज्ञान युगात देखील अंधश्रद्धा इतकी बळकट कशी राहिली? याची अनेक कारणे आहेत. काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

आपल्या समाजात प्रश्न विचारायला प्रतिष्ठा नाही.

प्रश्न विचारणे म्हणजे संशय घेणे, उद्धट वागणे असे साधारण मानले जाते. पुन्हा असे विचारले गेलेले प्रश्न ते ज्यांना विचारले जातात. त्यांना त्यांची उत्तरे येत नसल्याने अडचणीची असतात. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांना ‘गप्प बैस देवासारखा.’ असे उत्तर पालक आणि शिक्षक देताना अनेकदा दिसते. आता ज्या समाजात देवच गप्प बसवण्यासाठी वापरला जात असून. त्या समाजात चिकित्सेला प्रतिबंध होणार हे उघडच आहे. सोमवार शंकराचा, मंगळवार देवीचा, बुधवार विठोबाचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार पुन्हा देवीचा, शनिवार मारुतीचा आणि रविवार ज्योतिबाचा हे कसे ठरले? कोणी ठरवले, का मानावयाचे?

उत्तरे शोधण्याचा प्रश्न

सर्वव्यापी सर्वशक्तिमान देव असा एकेका दिवसात बंदिस्त करायचा. या प्रश्नांची उत्तरे मिळणार नसतातच. कारण ते प्रश्न विचारण्याचीच परवानगी नसते. गणपतीला लाल फुलेच आवडतात. असे एकदा जाहीर झाल्यावर आणि तेथे शंकेला वाव नसल्यावर चिकित्सेचे फुल उमलण्याची शक्यताच नाहीशी होते. दीडशे कोटी किलोमीटर वरील शनी हा ग्रह तेथून आपली वक्र नजर पृथ्वीवर का व कशी ठेवतो? आणि त्याची शांती केल्यावर ती त्याला कशी पोहचते? व बहुतांशी गॅसचा बनलेला तो ग्रह शांत कसा होतो? याबाबत प्रश्न विचारलेला चालत नाही. मग त्याची उत्तरे शोधण्याचा प्रश्नच येत नाही.

अगतिकता, अस्थिरता, अदृष्याची भीती, अतृप्त कामनांची पूर्ती

या सर्व बाबी अंधश्रद्धा निर्माण करण्यासाठी महत्वाच्या ठरतात. आजच्या जगात माणसे झपाट्याने अगतिक होत आहेत. स्वत:च्या जीवनाची सूत्रे स्वत:च्या हातातून निसटल्याची जाणीव पदोपदी होते. मी अल्पसंख्यांक आहे. आजूबाजूच्या गावात अल्पसंखाकांची घरे पेटवत आहेत. माझे कसे होईल? महागाई प्रमाणाबाहेर वाढत आहे. हातातोंडाची गाठ पडणे अवघड मग मुलांचे शिक्षण आरोग्य झेपणार कसे? समोरच्या झोपडपट्टीत गुंड मुलींची छेड काढतात. माझी तरुण मुलगी रोज रात्री कामावरून त्या झोपडपट्टी समोरून येते. तिचे रक्षण कसे करू? असे असंख प्रश्न सामान्य माणसाला अगतिक करून अंधश्रद्धेकडे लोटत असतात.

वेध अंधश्रद्धेचा

वेध अंधश्रद्धेचा या मांडणीत स्वाभाविकपणे वेध अंधश्रद्धा निर्मूलनाचा असेही अभिप्रेत आहे असे मी मानतो. अंधश्रद्धा निर्मूलनाचा वेध घेणारी चतु:सूत्री पुढीलप्रमाणे

  • शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे.
  • वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार, व अंगीकार करणे.
  • धर्माची विधायक कृतीशील चिकित्सा करणे.
  • व्यापक परिवर्तनाशी स्वत:ला जोडून घेणे.

वरील चतु:सूत्रीच्या आधारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम गेली २८ वर्षे महाराष्ट्रात अखंडपणे कृतीशील चालू आहे. माणूस मारून विचार मरत नाहीत. हे सत्य अनिसने कृतीतून दाखवून दिले आहे.

या लेखाच्या निमित्ताने सुजाण वाचक आपल्या मनामनात वेध अंधश्रद्धेचा रुजवेल. आणि त्या अंधश्रद्धांचे निर्मुलन व्हावे. यासाठी आपापल्या ठिकाणी शक्य तेवढा सक्रीय बनेल. वा आम्हाला सहयोग देईल. तरच हा वेध अंधश्रद्धेचा सार्थकी लागला असे मला वाटेल.

Image source : https://en.wikipedia.org/wiki/Superstition

वेध अंधश्रद्धेचा

लेखक – प्रशांत एस. पोतदार, सातारा

राज्य प्रधान सचिव

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती.

मोबाईल – ९४२११२१३२८

ईमेल – prashantspotdar@gmail.com

 

About the author

Prashant Potdar

Hi,
I am Prashant Potdar.
State Principal Secretory of Maharashtra Andhashraddha Nirmulan Samitee
State Committee Member of Human Liberty Organization

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *